यशवंतराव चव्हाण (120)

त्या काळात केंद्रीय मंत्रीपद मोठे तपश्चर्येचे मानले जात असे. पंतप्रधान नेहरूंनी राज्याच्या मुख्यमंत्र्याला दिल्लीला आग्रहाने बोलावून घेऊन आपल्या मंत्रिमंडळात मंत्रीपद देणे अधिकच भूषणावह होते. नेहरूंनी यशवंतरावांना पाचारण करून संरक्षण मंत्रालयाची सूत्रे त्यांच्या हातात सोपविली. १९६२ च्या चीनच्या आक्रमणाच्या वेळी भारताच्या पदी नामुष्की पत्करावी लागल्यावर कृष्ण मेनन यांना राजीनामा द्यावा लागला आणि देशाच्या संरक्षणाची जबाबदारी यशवंतरावांवर टाकण्यात आली. मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून आला. यशवंतरावांबद्दलच्या अपेक्षा खूप खूप वाढल्या.

ऑक्टोबर १९६२ ते डिसेंबर १९८४ असा हा २२ वर्षांचा काळ यशवंतराव दिल्लीत होते. केंद्रात १९६२ मध्ये मंत्रिपदाचा दर्जा प्राप्‍त झाल्यावर पुढील बावीस वर्षांच्या संपूर्ण काळात मंत्रीपद त्यांना चिकटून राहिले. विरोधी पक्षनेते म्हणून मंत्रीपदाने, उपपंतप्रधान म्हणून मंत्रीपदाने, अर्थ आयोगाचे अध्यक्ष म्हणून मंत्रीपदाने त्यांना सोडले नाही. सन १९८० ते ८२ अशी दोन वर्षे मात्र त्यांनी राजकीय विजनवास काढला. दोन दशकातील त्यांच्या मंत्रीपदाचे तीन कालखंड पडतात. पहिला नेहरू-शास्त्रींचा काळ, नंतर काँग्रेसमध्ये दुसरी फूट पडेपर्यंतचा (१९७७ अखेर) काळ आणि तिसरा १ जानेवारी १९७८ ते २५ नोव्हेंबर १९८४ पर्यंतचा. हे तिन्ही कालखंड योगायोगाने सात वर्षांचे राहिले. या तीन कालखंडात यशवंतरावांची तीन रुपे साकारली. या दरम्यान त्यांनी तीन पंतप्रधानांचे मृत्यू पाहिले. नेहरू गेले तेव्हा यशवंतराव पन्नाशीत होते. शास्त्रीजी गेल्यानंतर यशवंतरावजींचे नांव पंतप्रधानपदासाठी घेतले जात होते. त्यावेळी इंदिरा गांधींना पाठिंबा देण्याच्या त्यांच्याच भूमिकेमुळे ही संधी त्यांनी स्वतः घालविली. दिल्लीतील सत्तेचे राजकारण कसे चालते याचा त्यांना पहिल्या दहा वर्षात चांगलाच अनुभव आला.

यशवंतराव तात्विक भूमिका घेऊन चालत आणि त्या भूमिकेसाठी झीज सोसण्याची तयारी करीत. कष्ट उपसण्याची उमेद दाखवित. त्यांच्या मनात धरसोडपणा नसे. यशवंतरावांनी आपली मूल्ये कायम सांभाळली. आपले मोल दिल्ली करीत नाही याची त्यांना खंत वाटायची पण त्याची तमा त्यांनी कधी बाळगली नाही. केंद्रिय मंत्री ना. यशवंतराव चव्हाण यांच्यापेक्षा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव मोठे होते. मुख्यमंत्र्यापेक्षा माणूस म्हणून यशवंतराव त्याहूनही मोठे होते. माणूस कसा असावा तर यशवंतरावांसारखा, मुख्यमंत्री कसा असावा तर यशवंतरावांसारखा. आम्हा दिल्लीकरांना वाटायचे की, केंद्रीय मंत्री यशवंतरावांसारखा असावा, रहावा आणि उरावा. ते भाग्य आम्हांला लाभले नाही.

- मो. ग. तपस्वी
पत्रकार, दिल्ली