यशवंतराव चव्हाण (115)

वयाच्या १६ व्या वर्षापासून एखाद्या वारकर्‍याप्रमाणे यशवंतरावांनी देशभक्तीची पताका जी खांद्यावर घेतली ती अखेरपर्यंत सोडली नाही. १९३० पासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत चव्हाणांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागली. कारावासात त्यांनी देशभक्तीची पदे रचली आणि स्वातंत्र्य प्राप्‍तीनंतर अनेक पदे भूषविली. अशा या देशभक्ताचे आणि महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांचे नांव वगळून भारताचा इतिहास कुणालाच लिहिता येणार नाही.

यशवंतरावांच्या रक्तात समाजवाद मुरलेला आहे. राजे लोकांच्या तनख्याबाबत त्यांनी जे पुरोगामी धोरण स्वीकारले त्यावरून हे स्पष्ट झाले आहे. यशवंतरावांशी आमचे कितीही राजकीय मतभेद असले तरी आम्ही त्यांना मित्र मानतो आणि तेही आमच्याशी सदैव मैत्रीचे वर्तन ठेवतात. यशवंतरावांच्या बुद्धिमत्तेचा पल्ला केवळ राजकारणापुरताच मर्यादित नाही. ते साहित्यप्रेमी, कलाप्रेमी, नाट्यप्रेमी रसिक आहेत. संभाषण चतुर आहेत, शिष्टाचार निपुण आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रसन्न आहे. म्हणूनच त्यांच्याविषयी आम्हाला आपुलकी वाटते.

यशवंतराव ग्रंथप्रेमी होते. उत्कृष्ट ग्रंथांचा संग्रह करणे ही त्यांची खास आवड होती. मुंबईत मलबार हिलवरील बंगल्यावर आणि दिल्लीत १ रेसकोर्सवरील बंगल्यावर त्यांनी आपले जे वैयक्तिक ग्रंथालय उभे केले होते. त्यात उत्तमोत्तम ग्रंथ सांपडायचे. त्यांची वाचनाची संवयही जरा वेगळी होती. त्यांचा एखादा ग्रंथ काढून पाहिला की त्यावर टाचलेला कागद असे. हा ग्रंथ मी संपूर्ण वाचलेला आहे, चांगला आहे, जरूर वाचावा. प्रशासकीय कामाच्या प्रचंड गर्दीत ते वाचायला कसा वेळ काढीत कुणास ठाऊक !

- आचार्य अत्रे
---------------------

यशवंतराव हे कुशल व कर्तबगार प्रशासक होते. त्यांनी महाराष्ट्राला व देशाला स्वच्छ प्रशासन दिले. सत्तेचा कधीही गैरवापर केला नाही. विरोधकांना विश्वासात घेऊन पावले टाकण्याची त्यांची नीती होती. त्यामुळे विरोधकांनाही त्यांच्याबद्दल आदर वाटायचा.

प्रशासन हे लोकाभिमुख असावे अशी ते काळजी घेत. एक आदर्श मुख्यमंत्री म्हणून लोक त्यांचे नांव घेतात. त्यांची लोकशाहीवर नितांत निष्ठा होती. समाजवादाबद्दल त्यांना आस्था होती. आपल्या जवळचे जे काही चांगले असेल ते महाराष्ट्रासाठी, देशासाठी द्यायला हवे असे ते सांगत. ते स्वतः खेड्यात जन्मलेले आणि गरिबीत वाढलेले. त्यामुळे त्यांना ग्रामीण भागाबद्दल आणि गरिबांबद्दल विशेष ओढ वाटत असे.

कृषि-औद्योगिक समाजरचना केल्याशिवाय ग्रामीण भागाचा कायापालट होणार नाही अशी त्यांची धारणा होती. अशा प्रकारची संकल्पना मांडणारे, सहकारातून समाजवाद आणण्याचा प्रयत्‍न करणारे ते देशातील पहिले राजकारणी म्हटल्यास चूक होणार नाही. सहकारी सूत गिरण्या, सहकारी तेलगिरण्या, सहकारी साखर कारखाने उभे करण्यात आले. त्यांचे जाळे विणण्यास प्रोत्साहन देऊन यशवंतरावांनी महाराष्ट्राचा चेहरामोहराच बदलून टाकला ही सत्यस्थिती आहे. महाराष्ट्राचे प्रशासन स्वच्छ रहावे, कार्यक्षम असावे, गतिमान राहावे यासाठी ते सातत्याने प्रयत्‍नशील राहिले. यामुळेच महाराष्ट्र शासनाची सदैव प्रशंसाच होत होती.

सत्तेचे विकेंद्रीकरण ही यशवंतरावांची महाराष्ट्राला अमोल देणगी होय. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांची निर्मिती झाली. सत्तेच्या विकेंद्रीकरणातून सामान्य जनता विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यास या उपक्रमाने चालना मिळाली. ग्रामीण नेतृत्व तयार करण्यास मदत होऊ लागली. हा प्रयोग नव्हे तर प्रयत्‍न ठरला आणि महाराष्ट्रात अल्पावधित यशस्वी ठरला.

- वसंतदादा पाटील