यशवंतराव चव्हाण (117)

यशवंतराव मित्र जाणत असत. मित्रासाठी योग्य ते करीत असत. पण राजकारण आणि खाजगी मैत्री याचा गोंधळ त्यांनी कधीही केला नाही. कोणत्याही पक्षाचा पुढारी व कार्यकर्ता असो किंवा कोणत्याही क्षेत्रात वावरणारी व्यक्ती असो, यशवंतरावांच्या कचेरीचा आणि निवासस्थानाचा दरवाजा त्याला मोकळा असे. महाराष्ट्रातल्या सर्व थरातील लोकांना यशवंतरावांच्या घरी मुक्तद्वार असे. त्या प्रत्येकाच्या मनाप्रमाणे होणे शक्य नव्हते, पण आपले मनोगत यशवंतरावांच्या कानावर घातले यातच अनेकांना मानसिक समाधान मिळत असे. लोकांच्या अनंत अडचणी असतात. त्यांना आपले मन कोणातरी जबाबदार व्यक्तीपुढे मोकळे करावेसे वाटते. सहानुभूतिने ऐकणारा आणि जमेल तेवढे सहाय्य करणारा, यशवंतरावांसारखा नेता ही लोकांची मानसिक गरज होती. म्हणूनच मराठी जनतेने त्यांच्यावर उदंड प्रेम केले. राजकीय मतभेद होऊनही सर्वांना यशवंतराव हे आपल्या आप्‍तासारखे वाटतात.

आपल्या स्वभावाविषयी यशवंतराव सांगायचे, ''माझा स्वतंत्र स्वभाव बनला आहे, तो स्वभाव आहे मिळते घेऊन पुढे जाण्याचा व नेण्याचा. कोणाला मुद्दाम दुःख द्यावे, कोणाचा अवमान करावा, हे माझ्या स्वभावात नाही. कोणी अवमान केला तरी त्यासाठी उगाच शत्रुत्व करावे, असे वाटत नाही. कटुता न ठेवणे आणि कटुता नसणारे वातावरण वाढविणे, हा माझा स्वभावधर्म आहे.''  अनेक राजकीय पेचप्रसंगात यशवंतरावांच्या भूमिकेने त्यांना प्रसिद्धी व सामर्थ्य दिले. विशेषतः अनुयायांचे बल त्यांच्या व्यवहारवादाने त्यांना लाभले. बुद्धीचा निश्चय झाला की ते भावनेला बळी पडले नाहीत. अक्षरशः नेत्रातून अश्रू वाहत असताना, कठोर निर्णय स्वीकारताना, त्याप्रमाणे प्रामाणिक वाटचाल करीत असताना मी त्यांना पाहिले आहे.

- वि. स. पागे
-------------------------

मा. कृष्ण मेनन याच्यानंतर संरक्षणमंत्री कोण होणार याबद्दल सार्‍यानाच औत्सुक्य वाटत होते. संरक्षण खाते बदनाम झाले होते आणि कोणीही ज्येष्ठ नेता वा मंत्री आपले राजकीय भवितव्य धोक्यात घालण्यास तयार नव्हता. पं. नेहरुंनी खंबीरपणे आणि जिज्ञासूपणे निर्णय घेतला आणि यशवंतराव चव्हाणांना संरक्षणमंत्रीपद स्वीकारण्याची विनंती केली. यशवंतरावांनीही पंतप्रधानांना साथ देण्यासाठी आपल्या राजकीय भवितव्याचा विचार न करता 'हो' म्हटले. नोव्हेंबर १९६२ मध्ये ते दिल्लीला आले.

लष्करात मनोधैर्य पुन्हा निर्माण करणे आणि लष्कर व संरक्षण मंत्रालय यातील संघर्षाची कारणे निपटून काढणे हे आपले प्रमुख्य कर्तव्य आहे, हे यशवंतरावांच्या त्वरित लक्षात आले. कृष्ण मेनन यांचा उद्दाम स्वभाव, अहंमन्य वृत्ती हे असंतोषाचे मूळ आहे हे त्यांनी ओळखले. आपल्या सौजन्यपूर्ण व्यक्तिमत्त्वाने आणि सुसंस्कृत वागणुकीने त्यांनी दिल्लीच्या राजकीय जीवनावर आपला ठसा उमटविला. त्यांची विद्वता आणि अभ्यासुवृत्ती यामुळे संरक्षण मंत्रालयात त्यांच्याबद्दल आतीव आदर निर्माण झाला. संरक्षण दलाला त्यांनी नैतिक बळ दिले. संरक्षण व्यवस्थेची पुनर्रचना केली. लष्करी अधिकारी व जवानांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी सुविधा निर्माण केल्या.

- ले. जनरल एस. पी. पी. थोरात