यशवंतराव चव्हाण (118)

राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रात ज्या ज्या जबाबदार्‍या यशवंतरावजींनी स्वीकारल्या, त्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. आपल्या देशाच्या सर्वांगीण विकासाचे एकमेव उद्दिष्ट त्यांनी आपल्यासमोर ठेवले होते. देश स्वतंत्र झाल्यानंतर यशवंतरावांनी एकामागून एक उच्च पदे भूषविली. स्वातंत्र्य म्हणजे काय आणि त्याचा लाभ कोणाला मिळायला पाहिजे याची त्यांना स्पष्ट कल्पना होती. स्वातंत्र्य ही प्रतिष्ठेची, त्याचप्रमाणे आर्थिक विकासाची बाब आहे आणि त्यामुळे स्वातंत्र्यप्राप्‍तीनंतर विकासाचे जे युग सुरू झाले, त्यात समाजातील गरिबातल्या गरीब व्यक्तीला विकासाची फळे उपभोगता आली पाहिजेत यावर त्यांनी भर दिला. यशवंतराव २५ वर्षे महाराष्ट्रातील समाजजीवनाशी एकरूप झाले होते.

कारखान्यात, जिल्हा सहकारी बँकांत, सहकारी साखर कारखान्यात, कापूस कारखान्यात ठळक जागी यशवंतरावाचे छायाचित्र आढळून येते. स्वतंत्र भारतात लोकांच्या गरजांबद्दल प्रशासनाने अधिक आदर-आपुलकी दाखवावी म्हणून सत्तेचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक होते. स्थानिक विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात जिल्हा परिषदा स्थापन करण्यात आल्या. यशवंतरावांच्या प्रयत्‍नांचे हे फळ होय. यशवंतरावांनी लेखन-भाषण इत्यादी मार्गाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनावर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविला. त्यांचे तत्त्वज्ञान आणि अनेक विषयावरील त्यांचे विचार, याबद्दल योग्य तो आदर बाळगून, आपण त्यांचा अभ्यास केला पाहिजे. त्यातून आपणास निश्चित मार्गदर्शन मिळू शकेल.

- नीळकंठराव कल्याणी
----------------------------

राजकारणातील एक पट्टीचा मुत्सद्दी, राजकारणी पण मित्र मानला त्याच्याशी क्षत्रिय बाण्याने मित्रत्व जपणारा, राजकारणातील गणित सरळ नसते म्हणून सतत जागरूक, कदाचित जास्त सावध व पराकाष्ठेचा स्वच्छ नेता म्हणून यशवंतरावांकडे पाहावे लागेल. स्वातंत्र्यापूर्व काळात स्वार्थाचा विचार सुचत नसे, कारण तशी संधीच नसे. तथापि प्रचंड सत्ता आणि सत्तेभोवती हरहमेशा घोटाळणार्‍या कनक, कांता, मदिरा, मदिराक्षी यांच्या खार्‍या महासागरात पाहेत असताना यशवंतवारांच्या शरीराभोवती जणू घामापासून दूर अलिप्‍ततेचे जन्मजात कवच त्यांना लाभले होते. प्रचंड व्यवहार त्यांच्या हातून आणि त्यांच्या सहीने झाले. तथापि त्यांच्या दिशेने कुणा टीकाकाराने वा संशयी निरिक्षकाने बोट उचलले नाही. पंतप्रधान शास्त्रीजींच्या संगतीत शोभणारा हा त्यांचा संरक्षणमंत्री होता.

प्रीती संगमावरील या गरुडाने १९५२ मध्ये मुंबईला सह्याद्रीवर यशस्वी झेप घेतली. तेथून आपले विशाल बळकट पंख पसरून ते हिमालयाच्या मदतीला धांवले. पंडितजींनी हांक मारली आणि गरुड झेपावला. तेव्हांपासून महाराष्ट्राचे 'थोरलेसाहेब,' संरक्षण, गृह, अर्थ, परराष्ट्र व्यवहार अशी तोलामोलाची खाती सांभाळत एक उत्कृष्ट दमदार कारभारी म्हणून मान्यता पावले. ते एकदा म्हणाले, ''पंडितजींचे आम्हा तरुणांना आकर्षण आहे. तथापि पटेल आणि पंडित पंत यांना पाहिल्या-अभ्यासल्याशिवाय कारभारी अर्धाच राहिला असे होते.''