यशवंतराव चव्हाण (119)

व्यवहार आणि तत्वनिष्ठा यांची सांगड घालताना त्यांना अनेकवेळा फार मोठी कसरत लागली. नेहमीच यश लाभले असे नाही. पण देशाची एकता, संसदीय लोकशाही, आर्थिक, सामाजिक विषमतेतून शासनामार्फत समतेकडे नेण्याचा त्यांचा प्रयत्‍न, व्यक्तिनिरपेक्ष कारभार्‍याला आवश्यक असा सद्‍भाव आणि सहिष्णुता या गुणांची त्यांना जन्मजात देणगी होती. त्यातच त्यांचे राजकारणी व मुत्सद्दी म्हणून यश सामावलेले आहे. हृदयाला भिडणारे गोड बोलणे, अथांग श्रोतृसमुदाय डोलत ठेवणे हे त्यांचे आणखी वैशिष्ट्य. इतिहासाशी लगट करत दृष्टांत द्यावेत, पुर्वसुरीच्या संतमहंतांचे ॠण मान्य करीत पुढे जावे, लोकांनी थट्टाउपहासाने प्रतिशिवाजी म्हणावे, इतकी निष्ठा तुळजापूर-प्रतापगडच्या भवानीच्या आणि शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे चरणी.

- नरुभाऊ लिमये
-------------------------

यशवंतरावांची व्याख्याने भावनात्मक आवाहनाने बहरलेली असत. निर्णय नेहमीच सर्वसामान्य समाजाच्या हिताचे असत. आर्थिक व बुद्धिवादी थरातील लोकांशी समजूतदारपणाचे, प्रेमाचे, सभ्यतेचे त्यांचे वर्णन असे. मित्रांशी खाजगीत प्रेमाचे पण सार्वजनिक व्यवहारात कांटेकोरपणाचे संबंध असत. त्यांचे व्यक्तिमत्व व नेतृत्व जटिल स्वरूपाचे होते. याला खंबीर आधार मात्र होता. भारताविषयीचे अपार प्रेम, महाराष्ट्राविषयीचा अभंग आशावाद, बहुजन समाजाबद्दल जिव्हाळा, समाजवादाची सुस्पष्ट दिशा, मागेपुढे, वर खाली पाहण्याची सूक्ष्म नजर, मागे येणार्‍यांबाबत जबाबदारी, नेत्यांविषयी आदर, सफल राजकीय महत्त्वाकांक्षा, पण तिचाही सुखाने त्याग करता येईल असा देशबांधवांच्या सेवेचा सोस.

महाराष्ट्राच्या सर्व भागातल्या, सर्व थरातल्या लोकांना यशवंतराव हे एखादे अपील कोर्ट आहेत असे वाटे. या प्रत्येकाच्या मनाप्रमाणे होणे शक्य नव्हते. पण आपले मनोगत यशवंतरावांच्या कानावर घातले यातच अनेकांना मानसिक समाधान मिळत असे. व्यक्तिगत दुरावा व कटुता ठेवण्याचा वा वाढविण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. या स्वभावाला अनुसरूनच त्यांचे वागणे, बोलणे होते. मराठी भाषा दणकट, काहीशी रांगडी. पण ती मृदू, मुलायम होऊ शकते, हे महाराष्ट्रात आधुनिक काळात ज्यांनी दाखवून दिले त्यात यशवंतरावांचा क्रम फार वरचा लागेल.

कारावासात असताना, वाचन व चर्चा याद्वारे यशवंतरावांनी आपल्या मनाची मशागत केली होती. अखेरपर्यंत त्यांचे ग्रंथप्रेम कमी झाले नाही. मराठी व इंग्रजी पुस्तके ते आवडीने घेत व चोखंदळपणे वाचीत. परदेशात जात तेव्हांही पुस्तकांच्या दुकानात वेळ घालवून खरेदी केल्याशिवाय ते परत येत नसत. तरुणपणी कर्‍हाडहून कोल्हापूरला जाऊन पिटात बसून त्यांनी नाटके पाहिली. म्हैसूरकर महाराज, भागवतबुवा, बाबा आळतेकर यांची संगीत भजने व औंधाचा दाजी गुरवाचा पखवाज ऐकण्यात अनेक रात्री घालविल्या. गडकर्‍यांच्या नाटकातले संवांद त्यांनी पाठ केले होते. 'राजसंन्यास' हे तर त्यांचे आवडते नाटक होते. कुस्ती आणि क्रिकेट खेळाचीही त्यांना आवड होती.

- गोविंदराव तळवलकर,
संपादक