सौ. वेणूताई ही पत्रे आवर्जून वाचीत. ती वाचताना आपण जणू काही हे सारे डोळ्याने पाहात आहोत याचा त्यांना आनंद मिळायचा. शिष्टमंडळातील मंत्री-अधिकार्यांची तसेच यजमान देशातील यजमानांची, पाहुण्यांची, लंचला किंवा डिनरला सपत्निक उपस्थिती असायची. यशवंतराव मात्र एकटेच असायचे. याचे शल्य यशवंतरावांपेक्षा वेणूताईंना अधिक जाणवायचे. त्या म्हणायच्या, ''माझी तब्येत चांगली धडधाकट असती तर मी नसते का गेले त्यांच्याबरोबर परदेशात ! तब्येत अस्वस्थ असताना बरोबर जायचे म्हणजे यशवंतरावांच्या कामात, गांठीभेटीत, चर्चेत, प्रवासात अडथळे, अडचणी निर्माण व्हायच्या. म्हणूनच मी परदेश प्रवास टाळीत आले आहे. ती उणीव यांची पत्रे भरून काढीत आहेत. वाचनाचा तसा यांना छंद त्याप्रमाणेच वेळात वेळ काढून पत्रे लिहिण्याची फार हौस.'' यशवंतरावांची सारी विदेश पत्रे सौ, वेणूताईंनी आपल्या बॅगमध्ये नीटपणे जपून ठेवलेली होती. त्यांच्या निधनानंतर काही दिवसांनी बॅग उघडून पाहिली असता, फाईल केलेली बरीच पत्रे हाती लागली. यशवंतरावांनी ती स्नेही पत्रकार रामभाऊ जोशी यांच्या स्वाधीन केली. रामभाऊंनी 'विदेश प्रवास' या शीर्षकाखाली पुस्तकाद्वारे ती प्रकाशित केली. रामभाऊंच्या या कार्यामुळे हा पत्रसंग्रह पुस्तक रूपाने वाचायला मिळतो. त्याचबरोबर प्रवास वर्णनाचा आनंद पण मिळतो.
पितृसुखाला लहानपणीच पारख्या झालेल्या यशवंतरावांचे मातोश्री अक्कांनी संगोपन आणि शिक्षण अनेक अडचणी सोसून केले. अक्कांच्या मायेमुळे, मार्गदर्शनामुळे यशवंतराव मोठे झाले. मोठेपणात यशवंतरावांनी मातृप्रेमाचा विसर कधी पडू दिला नाही. अक्कांच्या दुःखद निधनानंतर सौ. वेणूताईंनी यशवंतरावांना सातत्याने समर्थ साथ दिली. यशवंतरावांच्या कर्तृत्वात, नेतृत्वात, संस्कारात मातोश्रींचा जसा मोठा हात होता तितकाच महत्त्वाचा आणि मोठा वांटा सौ. वेणूताईंचा होता. फलटणच्या मोरे यांच्या सुखी घरातून १९४२ च्या जून महिन्यात चव्हाणांची सून म्हणून वेणूताईंनी गृहप्रवेश केला आणि जवळजवळ दहा वर्षांचा काळ कौटुंबिक संकटांशी तोंड देण्यात घालविला. थोरले दीर गणपतराव यांचा तुरुंगवास, यशवंतरावांचा भूमिगत संचार, गणपतरावांचे गंभीर आजारपण, दीरांची घरात चार लहान मुले, वृद्ध सासू, आर्थिक दुरावस्था यांतून संसाराची वाटचाल करताना त्यांनी देशभक्त पतीलाही आवश्यक ती साथ दिली. वाईट दिवसांनंतर चांगले दिवस आल्यावरही त्यांनी पैशाचा, कपडे-लत्ते-दागिन्यांचा मोह कधी धरला नाही. मोठेपणा कधीही मिरविला नाही. पतीच्या जीवनाशी त्या समरस झाल्या, एकरूप झाल्या आणि आदर्श गृहिणीची प्रतिमा निर्माण करताना यशवंतरावांची प्रतिमाही काटेकोरपणे सांभाळली. प्रकृतीने त्यांना साथ दिली नाही, तथापि त्यांनी त्याबद्दल कधी तक्रार केली नाही. पुतण्यांचे शिक्षण केले, त्यांची लग्ने लावून दिली, त्यांचे संसार उभे केले. दीरांची मुले, सेवकांची मुले या सगळ्यांना आईची माया दिली. दिल्लीतील त्यांचे निवासस्थान मुलाबाळांनी सदैव भरलेले असायचे. सौ. वेणुताई धार्मिक वृत्तीच्या होत्या. श्रद्धाळू होत्या. पण आपल्या धार्मिकतेचे त्यांनी कधी प्रदर्शन केले नाही. यशवंतराव भावनाविवश होऊन म्हणायचे, ''वेणूबाईने फार सहन केले. माझ्या मागे सावलीसारखे उभे राहून मला सदैव साथ दिली.''