यशवंतराव चव्हाण (110)

परिशिष्ट

प्रिय सौ. वेणूबाईस --

संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारण्याकरिता दिल्लीला गेल्यानंतर यशवंतरावांनी १९६३ मध्ये भारताची हद्द ओलांडून प्रथमच विदेश दौरा केला. त्यानंतर ताश्कंद करारासाठी ते १९६६ मध्ये शास्त्रींबरोबर ताश्कंदला गेले. त्यानंतर १९७० ते ७७ या आठ वर्षांच्या कालावधीत अर्थमंत्री, परराष्ट्रव्यवहार मंत्री म्हणून त्यांनी जगाच्या पाठीवरील कित्येक देशांचा दौरा केला. १९७७ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि परदेश भ्रमण थांबले. विदेश यात्रेवर असताना यशवंतराव मुक्कामाच्या ठिकाणी वेळ काढून सौ. वेणूताईंना पत्रे लिहीत. त्यात प्रवासवर्णन, स्थळांचे वर्णन तर असायचेच पण त्याचबरोबर चर्चेसंबंधीचे, वाटाघाटीसंबंधीचे छोटे टिपण पण असायचे. व्यक्तीच्या स्वभावाचे, मैत्रीचे, सुंदर चित्रण पण असायचे. यशवंतरावांचे प्रवासवर्णन म्हणजे ललित साहित्याचा एक सुरेश आकृतिबंधच. विदेशात त्यांनी लिहिलेल्या या पत्रसंग्रहात त्या त्या देशाच्या व प्रदेशाच्या निसर्गाचे वर्णन आहे, इतिहास आहे, कला-संस्कृती आहे, राजकारणाचा, अर्थकारणाचा घेतलेला वेध पण आहे. वस्तुसंग्रहालयांबरोबरच रंगमंदिरांना, पुस्तक भांडारांना भेटी देऊन आपली रसिकता, कलाप्रेम आणि वाचनाची आवड याची प्रचिती यशवंतरावांनी आणून दिली. विदेश भेटीत राजकारण आणि अर्थकारण हा महत्त्वाचा भाग असायचा, त्याचबरोबर यशवंतराव तत्त्वचिंतनही करीत असायचे हे त्यांच्या काही पत्रांवरून हे स्पष्टपणे दिसून येते. त्यांच्या पत्रलेखनातून उच्च ध्येयवाद, तात्त्वि चिंतन, साहित्य कौशल्याचे मनोहारी चित्र पाहावयास मिळते. हा पत्रसंग्रह भारताच्या ४० वर्षातील राजकीय इतिहासात महत्त्वाची, मोलाची देणगी ठरणारा आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

सौ. वेणूताईंची प्रकृती नाजूक, अस्वस्थ असायची. केंद्रीय मंत्री म्हणून यशवंतराव विदेश यात्रेला निघाल्यावर पत्‍नी सौ. वेणूताई त्यांच्यासमवेत असणार हे क्रमप्राप्‍त आणि उचित होते. तथापि सौ. वेणूताईंची प्रकृती तोळामासा. यशवंतरावांच्या कार्यक्रमात, गांठीभेटीत, चर्चा-वाटाघाटीत आपल्या प्रकृतीच्या काळजीचा अडसर नको म्हणून सौ. वेणूताईच पतिसमवेत जाण्याचे नाकारीत. ही स्थिती यशवंतरावांना अस्वस्थ करायची. तथापि नाइलाज व्हायचा. सौ. वेणूताईंना पत्राद्वारे विदेशदर्शन घडवावे म्हणून यशवंतरावांनी परदेशातून पत्रे लिहिण्यास सुरुवात केली. या पत्रात भारताचा एक दूरदर्शी, बहुश्रुत, प्रज्ञावंत मुत्सद्दी या रूपांत यशवंतरावांचे दर्शन घडते. या पत्रातील लेखनाद्वारे एका मुत्सद्याचे, विचारवंताचे अभ्यासपूर्ण आणि अनुभवसंपन्न असे विचारधन उपलब्ध होऊ शकले आहे.