यशवंतराव चव्हाण (107)

महाराष्ट्रातील खासदार दरवर्षी १२ मार्चला यशवंतरावांचा वाढदिवस दिल्लीत साजरा करायचे. राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्या निवासस्थानातील हिरवळीवर हा कार्यक्रम व्हायचा. अनंतराव पाटील, शिवाजीराव देशमुख, अण्णासाहेब कवडे, देवराव पाटील, आबासाहेब कुलकर्णी आदि खासदार या कार्यक्रमासाठी पुढाकार घेत. केंद्रिय मंत्री, खासदार, दिल्लीतील विविध क्षेत्रातील प्रमुख मंडळी आवर्जून उपस्थित रहात. पंतप्रधान इंदिरा गांधी याही थोडा वेळ येऊन भाग घेत. यशवंतरावांना शुभेच्छा देत, सर्वांशी बोलत आणि परत जात. वाढदिवसाचा कार्यक्रम दरसाल नियमाने पार पडत असल्याबद्दल इतर राज्यातील खासदार कौतुक करायचे. यशवंतराव दरवर्षी हिवाळी अधिवेशनात सर्व मराठी व इतर राज्यातील निवडक खासदारांना आपल्या निवासस्थानी आग्रहाने भोजनाला निमंत्रित करीत असत. यामागे त्यांचा उद्देश हा असे की खासदारांच्या अडचणी-प्रश्न ऐकून घ्यावेत, त्यांना आवश्यक ती माहिती द्यावी. दोन-अडीच तासांचा अवधी खेळीमेळीने गप्पागोष्टीत जायचा. यशवंतराव अबोल आहेत, रिझर्व्हड् आहेत, फारसे मिसळत नाहीत हा गैरसमज दूर होण्यास यामुळे मदत व्हायची.

यशवंतरावांना वाचनाचा जसा छंद होता त्याप्रमाणेच लेखनाची आवड होती. अधून मधून ते लिहित. भाषणामधून जे विचार ते मांडीत असत. ते आपल्याला फार आवडले अशा प्रतिक्रिया त्यांचे स्नेही, सहकारी त्यांना कळवीत. त्यांचे चिंतनाचे प्रमुख विषय राजकारण-समाजकारण असत. साहित्याच्या क्षेत्रातील आपली भूमिका रसिक वाचकाची आहे असे ते सांगत. यशवंतराव म्हणायचे, ''शब्दांच्या सामर्थ्यावर आणि सौंदर्यावर आपला नितांत विश्वास आहे. साम्राज्यशाही धुळीला मिळविण्याचे संहारक सामर्थ्य शब्दांत आहे. कल्पना, विचार, आणि शब्द यांचा त्रिवेणी संगम ही मानवी इतिहासातील जबरदस्त शक्ती आहे. शब्द हे साहित्यिकांचे प्रमुख शस्त्र मानले जाते. तसेच राजकारणाचे प्रमुख माध्यम पण शब्दच आहेत.''  यशवंतरावांनी आपल्या लेखनात आणि राजकारणात शब्दांचा योग्य आणि परिणामकारक वापर करून लेखनाला समृद्धी प्राप्‍त करून दिली आणि राजकारणाला योग्य असा घाट दिला. महाराष्ट्राचे राजकारण करताना त्यांनी कटु शब्दांचा वापर कधी केला नाही की दुसर्‍यांच्या भावनांना, प्रतिमांना धक्का दिला नाही.

कार्यकर्त्यांची कदर करणे हे यशवंतरावांचे वैशिष्ट्य होते. त्यांना माणसांची पारख होती. पारखून घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या अंगच्या गुणांचा ते संघटनेसाठी आणि समाजासाठी उपयोग करून घेत. असेंब्लीच्या निवडणुकीत मामासाहेब मोहोळ, नामदेवराव जगताप, नामदेवराव मते या तिघा नामदेवांना काँग्रेसची उमेदवारी दिल्याबद्दल कित्येकांनी नाके मुरडली. तिघेही चांगल्या मतानीं निवडून आले. एके दिवशी एका शहरी, विद्वान नेत्याने यशवंतरावांना विचारले, ''जगताप, मते, मोहोळ यांचा तुम्हाला असेंब्लीत काय उपयोग होणार आहे. त्यांचे शिक्षण बेताचे आणि संसदीय कामाचा आवाकाही बेताचा.''  यशवंतरावांनी शांतपणे उत्तर दिले, ''काँग्रेसच्या दोनशे आमदारांत मला पांच-दहा नामदेव सहज चालतील. ज्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात तुरुंगवास भोगला, संघटनेसाठी खस्ता खाल्ला, लोकांच्या अडीअडचणीला जे धांवले, ज्यांच्याबरोबर लोक आहेत त्यांची जाण ठेवायला हवी कां नको !  शिक्षणानेच माणूस शहाणा होतो असे नाही. असेंब्लीवर निवडून आलेले तिघेही नामदेव शहाणे आहेत. समाजाला, राष्ट्राला उपयोगी पडणारे आहेत.