यशवंतराव चव्हाण (108)

दौंडच्या जगन्नाथ पाटसकर यांना काँग्रेसचे तिकिट देऊन असेंब्लीवर निवडून आणण्याचे जे कसब यशवंतरावांनी दाखविले ते दुर्मिळच. जगन्नाथ म्हणजे वृत्तपत्र विकणारा एक साधा, सरळ, गरिब कार्यकर्ता. गळ्यात पिशवी आणि पिशवीत वृत्तपत्रे. एस. टी. मोटार स्टँडवर सदैव हजर. जगन्नाथाला काँग्रेसचा अतिशय अभिमान. अशा गरिब कार्यकर्त्याला जाणीव ठेवून यशवंतरावांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. यांत कुणाचे कांही बिघडण्याचा किंवा काँग्रेस पक्षाची हानी होण्याचा प्रश्न नव्हता. नेत्याची दृष्टी किती विशाल असावी लागते आणि मन किती मोठे असावे लागते याची ही दोन्ही बोलकी उदाहरणे. जिल्हा परिषदांचे पदाधिकारी, पंचायत समित्यांचे पदाधिकारी, साखर कारखाने, गिरण्यांचे अध्यक्ष निवडताना शैक्षणिक पात्रतेबरोबरच त्या व्यक्तीचे कार्य, अनुभव या बाबींचाही विचार केला जावा असा पायंडा यशवंतरावांनी घालून दिला. यांतूनच काँग्रेसला तरुण रक्ताचे, सुशिक्षित, सुविद्य असे नवे 'केडर' मिळाले आणि संघटना बलवान झाली.

यशवंतराव कार्यकर्त्यांच्या शिबिरावर विशेष भर देत. ते म्हणायचे, ''कार्यकर्ते राजकीयदृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या जाणकार आणि कृतिशील व्हायचे असतील तर त्यांचे शिक्षण शिबिरातून होण्याची गरज आहे. प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी, विविध बाजू मांडल्या जायला हव्यात. काँग्रेस पक्ष हा कांही 'केडर' पक्ष नाही. ती एक जनतेची चळवळ आहे. (मास मुव्हमेंट). या चळवळीत कुणालाही सहभागी होता येते. पक्षात आलेल्या कार्यकर्त्याला माहिती असणे, त्याचे शिक्षण केले जाणे गरजेचे आहे.''  राहुरी, महाबळेश्वर, खुलताबाद, आळंदी अशी एकामागून एक कितीतरी शिबिरे घेण्यास यशवंतरावांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला प्रोत्साहित केले. या शिबिरांत सरकारी निर्णयावर, धोरणांवर कार्यकर्त्यांनी कितीतरी वेळा कडाडून टीका केली. या टीकेबद्दल यशवंतरावांनी कधीही गैरसमज करून घेतला नाही की राग मानला नाही. वाद-संवादाला ते महत्त्व द्यायचे. कृषि-उद्योग, लघुउद्योग याबद्दल त्यांचा आग्रह असायचा. म्हणूनच कृषि मालावर प्रक्रिया करणार्‍या सहकारी कारखानदारीला त्यांनी उत्तेजन दिले. एम. आय. डी. सी. ची स्थापना करून जिल्ह्या-जिल्ह्यात कारखानदारी उभी राहण्यास सर्वतोपरी साहाय्य केले. कृषि विद्यापीठे स्थापन करून देशातील आधुनिक ज्ञान शेतकर्‍याचे दारापर्यंत पोहोचविण्यासाठी व्यवस्था केली. दलित-आदिवासी यांच्या विकासासाठी समाज कल्याण खात्यास महत्त्व प्राप्‍त करून दिले. गरिब-दुर्बलांचे यशवंतराव आशास्थान बनले.

महाराष्ट्रातील गांवे, तेथील कार्यकर्ते, कर्ती माणसे, गांवाचे प्रश्न हे यशवंतरावांच्या दीर्घकाळ स्मरणात रहायचे. दौर्‍यात खूप दिवसांनी एखाद्या गांवात गेले की ते जुन्या माणसांची विचारपूस करायचे. ''आबा काय म्हणतात, महिपतीचे कसे काय चाललं आहे'' असे ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षाला विचारले की तो अवाक व्हायचा. एकदा नगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर मोटारने जात असताना त्यांनी शिरूरला गाडी थांबवायला सांगितले. धनराज नहार नांवाच्या कार्यकर्त्याला निरोप पाठविला. धनराज आल्यावर त्याला विचारले, ''नहार, १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांच्या घरी मी भूमिगत अवस्थेत राहात होतो ते तात्या आहेत का ?''  ''नाहीत'' असे धनराजने उत्तर दिले. ''चला, त्यांच्या घरी जाऊ, पत्‍नी, मुलाबाळांना भेटू, त्यांचे क्षेम विचारू.''  असे म्हणत यशवंतराव शिरूर गांवच्या एका टोकाकडील वस्तीकडे निघाले. कार्यकर्त्यांची गडबड उडाली. त्या घरी पोहोचल्यावर यशवंतराव कांबळ्यावर बसले. प्रेमाने-आदराने दिलेला चहा प्यायचे. घराची एकूण अवस्था पाहिल्यावर स्वीय सचिव डोंगरे यांना जवळ बोलावून मुलाच्या हातात गुपचूप हजार रुपये ठेवा असे सांगितले. यशवंतराव हे 'माणूस' म्हणून फार मोठे होते. असा नेता, साहित्यिक, रसिक राज्यकर्ता पुन्हा होणे नाही.