यशवंतराव चव्हाण (109)

यशवंतरावांनी संरक्षणमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यावर चीनने एकतर्फी युद्ध थांबविले. त्यानंतर थोड्या दिवसांनी महाराष्ट्रातील कांही पत्रकार, कांही लेखक, साहित्यिक यांना यशवंतरावांनी लडाखची युद्धभूमी पाहण्यासाठी तिकडे पाठविले. त्यांची नेण्याची-आणण्याची, निवासाची, विशिष्ट स्थळे दाखविण्याची सगळी व्यवस्था केली. वसंत सबनीस, ग. दि. माडगूळकर आदि मंडळी प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्यासाठी तिकडे रवाना झाली. लडाख प्रदेश किती बिकट आहे, भारतीय जवान किती प्रतिकूल परिस्थितीत आक्रमणास तोंड देत होते, संरक्षण व्यवस्थेत आपण कुठे कमी पडत होतो ही माहिती संग्रहित करून लेखक मंडळी परतली. त्यांनी या अमोल संधीबद्दल यशवंतरावांचे आभार मानले. प्रसार, प्रचार, प्रसार माध्यमे, लेखक यांनाही महत्त्वाची भूमिका बजावता येते, त्यासाठी त्यांचा योग्य तो उपयोग करून घ्यायला हवा हे यशवंतरावांनी या उपक्रमातून पटवून दिले.

महाराष्ट्र परिचय केंद्राचे वतीने दिल्लीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जायचे. कधी संगीताचा कार्यक्रम, तर कधी चांगले मराठी नाटक वा सिनेमा यांचे आयोजन केले जायचे. यशवंतराव आवर्जून हजर रहायचे. संगीताची त्यांना विशेष आवड असायची. पंडित भीमसेन जोशी आकाशवाणीवर गायनाच्या कार्यक्रमासाठी दिल्लीला आले असताना यशवंतरावांनी त्यांना आपल्या निवासस्थानी पाचारण केले. निमंत्रितांसाठी गायनाचा कार्यक्रम करावा, अशी विनंती केली. भीमसेननी ती मान्य केली. यशवंतरावांनी निवडक मंत्री, खासदार, अधिकारी, स्नेही यांना निमंत्रित केले. वेळ रात्री नऊ ते बारा असे कळविले होते. साडेनऊ-दहा वाजले तरी पंडित भीमसेन यांचे आगमन झाले नाही. निमंत्रित ताटकळत बसले होते. स्वीय सचिव डोंगरे यांना भीमसेन उतरलेल्या हॉटेलात पाठविले. पंडितजी ''एकच प्याल्यात'' रमलेले होते. डोंगरेंनी त्यांना आठवण दिली, तयार केले आणि साथीदारांसह १ रेसकोर्स रोडवर हजर केले. पंडितजी मागील दरवाजाने आंत गेले. गार पाण्याने तोंड धुतले. कपडे व्यवस्थित केले आणि हॉलमध्ये दाखल झाले. सर्वांचा जीव भांड्यात पडला. भीमसेनजींनी बैठक मारून गायनाला सुरुवात केली ती श्रोत्यांना डोलावतच. बंदिशी, तुकोबांचे अभंग, गझल यांची बरसात करीत निमंत्रितांकडून वाहवा मिळविली. रात्री दीड-दोन पर्यंत कार्यक्रम चालला. नभोवाणीमंत्री के. के. शहा यांनी पंडितजींची पाठ थोपटली. गायनापूर्वीचा किस्सा सगळेजण विसरून गेले.