यशवंतराव चव्हाण (104)

कराडच्या नागरिकांना आणि सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांना-लोकांना मुंबई अंत्यविधी व्हावा हे मान्य झाले नाही. त्यांनी पंतप्रधानांना तारा करून, टेलिफोन करून त्यांच्याकडून कराडला अंत्यसंस्काराची परवानगी मिळविली. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना तसे कळविले. दादांची इच्छा होती की, मुंबईत मोठ्या इतमामाने अंत्यसंस्कार करावेत. तथापि लक्ष्मणशास्त्री जोशी, कराडचे नगराध्यक्ष श्री. पी. डी. पाटील यांनी दादांचे मन वळविले. कराडच्या प्रीति संगमावर अंत्यविधी होणे कसे औचित्यपूर्ण ठरेल हे त्यांना पटवून दिले. या सर्व घडामोडीनंतर कराडला प्रीति संगमावर अंत्यविधी करायचा असा निर्णय झाला. हवाई दलाच्या खास विमानाने दिल्लीहून आणलेला पार्थिव देह वायुदलाच्या खास हेलिकॉप्टरने राजभवनाच्या हेलिपॅडवर आणण्यात आला तेव्हां सेनेच्या तिन्ही दलातील जवानांनी आणि पोलिसांनी आपल्या बंदुका उलट्या करून शोक सलामी दिली. नंतर फुलांनी सजविलेल्या तोफगाडीवर पार्थिव देह ठेवण्यात येवून मिरवणुकीने ''सह्याद्रि'' अतिथीग्रहावर आणण्यात आला. तोफगाडी गेटमधून आंत आली तेव्हा अनेकांचे हंबरडे कानी पडले. असेच दृष्य कराडमध्येही पहावयास मिळाले. तारीख २७ ला मुंबईहून हेलिकॉप्टर जेव्हा कराडला आले आणि पार्थिव देह खाली उतरविण्यात आला तेव्हां हजारो हुंदके ऐकून आणि डोळ्यातून वाहाणार्‍या अश्रूधारा पाहून अनेकांचे जीव गलबलून गेले. विमानतळापासून ''विरंगुळा'' या निवासस्थानापर्यंत शोकाकूल लोकांची दुतर्फा गर्दी जमली होती. अंत्यदर्शनासाठी लोक सकाळपासूनच रांगा लावून होते. यशवंतरावांचा तिरंगी ध्वजात गुंडाळलेला पार्थिव देह पाहण्याची पाळी आली असे ओक्साबोक्शी रडत लोक चरणावर फुले वाहात होते, चरणावर डोके ठेवीत होते.

अंत्ययात्रा दुपारी एक वाजता ''विरंगुळा'' बंगल्यातून निघाली. प्रीति संगमावर अंत्ययात्रा पोहोचण्यापूर्वी लक्षावधी लोक नदीकांठी मिळेल तेथे जागा पकडून उभे होते. घरावर आणि झाडावर देखील माणसे उभी होती, बसलेली होती. सारे कराड गांव तर हजर होतेच पण त्याचबरोबर शेजारच्या तालुक्यातील, जिल्ह्यातील लोकही अंत्यविधीसाठी आवर्जून उपस्थित होते. सुमारे चार ते पांच लक्ष लोक हजर होते असा अंदाज वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केला होता. संगमावरील दोन एकर जागा स्वच्छ साफसूफ केलेली होती. नदीच्या बाजूला एक प्रशस्त चौथरा बांधलेला होता. त्यावर चंदनी चिता रचलेली होती. चितेला अग्नी देण्यात आल्यावर निळ्या-तांबड्या ज्वाळा वर झेपावू लागल्या. त्यावेळी जो आकांत कानी पडला तो कित्येक दिवस कानात घुमत होता. अग्नीनारायणाने आपले काम केले. सायंकाळी सहा वाजता यशवंतरावांचा देह भस्मीभूत झाला. महाराष्ट्राचा हा महापुरुष चिरनिद्रेसाठी संगमावर निरंतरचा पहुडला.

प्रीतिसंगमाबद्दल यशवंतरावांना लहानपणापासून आकर्षण होते. या परिसरासंबंधी त्यांच्या मनाला एक प्रकारची ओढ होती. संगमाचा परिसर नितांत सुंदर बनावा, ते आकर्षक स्थान बनावे अशी त्यांना तळमळ वाटायची. नगराध्यक्ष पी. डी. पाटील यांचेशी याबाबत यशवंतराव अधूनमधून बोलायचे. मुंबईहून पत्र लिहून आपले विचार कळवायचे. एका पत्रात यशवंतरावांनी म्हटले होते, ''कराडचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे प्रीतिसंगम. परंतु तेथे जाण्यासाठी नीट रस्ता नाही की वातावरण अनुकूल नाही. घाटाच्या समोर खड्डे आहेत, अस्वच्छता आहे, परिसर उपेक्षित आहे. स्वामीच्या बागेची जागा ताब्यात घेवून तेथे सुंदर उद्यान बनविता येईल. भुईकोट किल्ल्याचा तट दुरुस्त करता येईल आणि संगमाचे अलौकिक दृष्य पाहण्यासाठी तटाचा उपयोग करता येईल. हा परिसर प्रवाशांचे आकर्षण ठरावे.''