यशवंतराव चव्हाण (103)

शास्त्रीजींच्या निधनानंतर इंदिराजींनी पंतप्रधान व्हावे यासाठी खटपट केली, आपली शक्ती त्यांच्या पाठीशी उभी केली. केंद्रात वीस वर्षे एकत्र राहून इंदिराजींच्या समवेत राष्ट्राला पुढे नेण्याचा जिद्दीने प्रयत्‍न केला. कुणाबद्दल कधीही शत्रूत्वाची किंवा सूडाची भावना बाळगली नाही. इंदिराजी गेल्यावर पाठोपाठ भारताचा हा सुपूत्र, महाराष्ट्राचा लाडका नेता, शेकडोंचा सन्मित्र आणि सहकारी २५ नोव्हेंबर १९८४ रोजी सर्वांना मागे ठेऊन परत न येण्याच्या प्रवासाला निघून गेला. दिल्लीत सूर्यास्त झाला, सह्याद्रिवर सूर्यास्त झाला.

१९८५ च्या लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली होती. सातारा मतदार संघातून निवडणुकीसाठी अर्ज भरण्याकरिता १९८४ च्या नोव्हेंबर अखेरीस सातार्‍याला जाण्याचे यशवंतरावांनी ठरविले होते. मुंबईत २२ व २३ असे दोन दिवस राहून पुण्याला एस. एम. जोशी यांच्या सत्कार समारंभास हजर राहायचे आणि मग सातारला जायचे असे त्यांनी पुण्यातील नेत्यांना कळविले होते. तारीख २६ नोव्हेंबरला ते निवडणूक अर्ज दाखल करणार होते. तथापि २३ नोव्हेंबरपर्यंत ते मुंबईत पोहोचलेले नाहीत असे समजल्यावरून पुतण्याने रात्री दिल्लीला फोन लावला. त्यावेळी समजले की यशवंतरावांची प्रकृती अचानकपणे बिघडली असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. नोव्हेंबर २४ चा एकच दिवस मध्ये गेला आणि तारीख २५ ला रात्री दिल्लीहून दुःखद बातमी येऊन धडकली की यशवंतरावांचे निधन झाले. दिल्ली-मुंबई-पुणे-सातारा या योजलेल्या प्रवासाऐवजी एका वेगळ्या परत न येण्याच्या प्रवासासाठी यशवंतरावांनी प्रस्थान ठेवले. नियतीने त्यांचा असा प्रवास ठरविलेला होता हे तारीख २५ ला त्यांच्या ध्यानीमनीही आले नव्हते. दुसर्‍या दिवशीच्या वृत्तपत्रांतून निधनाची दुःखद बातमी सार्‍या महाराष्ट्राला, देशाला आणि जगाला समजली. त्यांच्या आकस्मिक जाण्याने कोट्यवधी लोक हळहळले. माणूस ठरवितो एक आणि घडते दुसरेच याची प्रचिती आली. मनुष्य किती पराधीन असतो याचा प्रत्यय आला.

पंतप्रधान राजीव गांधी यांनी यशवंतरावांचा पार्थिव देह दिल्लीहून मुंबईला नेण्यासाठी खास विमानाची सोय केली. तारीख २६ नोव्हेंबरला विमानाने दिल्ली सोडली आणि मुंबईकडे झेप घेतली. पार्थिव देहासह विमान जेव्हा मुंबई विमानतळावर उतरले तेव्हां हातात छोटी ऍटॅची घेऊन विमानातून उतरणारे यशवंतराव दिसले नाहीत. त्यांचा पार्थिव देह पहावा लागला. शवपेटी जेव्हां विमानाबाहेर काढण्यात आली तेव्हा विमानतळावर जमलेल्या हजारो लोकांना आपले हुंदके आवरणे, अश्रू थोपवून धरणे कठीण होऊन बसले. ''हे असे कसे घडले, यशवंतराव आम्हांला सोडून असे अचानक कसे गेले'' असे उद्‍गार अनेकांच्या तोंडून बाहेर पडले. ''सह्याद्रि'' या त्यांच्या पूर्वीच्या निवासस्थानी अचेतन देह आणण्यात आला. मुख्यमंत्री या नात्याने ''सह्याद्रि'' वर वावरणारे, लोकांशी बोलणारे, हंसणारे यशवंतराव त्या दिवशी चिरशांत पडून होते. त्यांच्या दर्शनासाठी हजारो लोकांनी रांग लावलेल्या होत्या. त्यात मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, सिने कलावंत, नाट्यकलावंत, साहित्यिक, श्रीमंत, गरिब, मालक, कामगार, हिंदू-मुस्लिम-पारशी-ख्रिश्चन या सार्‍या धर्माचे, जातीजमातीचे लोक होते. मुंबईतील आणि महाराष्ट्रातील विविध शहरातील बाजारपेठा, शाळा कॉलेजे, शासकीय-निमशासकीय कार्यालये त्या दिवशी बंद ठेवण्यात आली. मुंबईत शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात यावा असा आदेश पंतप्रधान राजीव गांधी यांनी मुख्यमंत्री वसंतरावदादा पाटील यांना दिला होता. त्या दृष्टीने राज्य सरकारकडून हालचाली पण सुरू झाल्या होत्या. अंत्यदर्शन आणि अंत्यविधी यासाठी ठिकठिकाणाहून असंख्य स्त्री-पुरुष मुंबईत येऊन दाखल झाले होते.