यशवंतराव चव्हाण (102)

इंदिराजींनी या निवडणुकीत चांगले यश संपादून त्या सत्तारूढ झाल्या. त्यांनी आपले मंत्रिमंडळ बनविले. तथापि या मंत्रिमंडळात यशवंतरावांचा मंत्री म्हणून समावेश केला नाही. १९८२ मध्ये ते इंदिरा काँग्रेसमध्ये परतल्यावर त्यांना आठव्या वित्त आयोगाचे (फायनान्स कमिशन) अध्यक्ष केले. इंदिराजींच्या महाराष्ट्रातील हस्तकांनी १९८० च्या निवडणुकीत यशवंतरावांना पराभूत करण्याचा अटोकाट प्रयत्‍न केला. तथापि त्यांना ते जमले नाही. यशवंतरावांबद्दल जनतेला जी आपुलकी, प्रेम वाटत होते, त्यांचा जो लोकसंग्रह होता, त्यांची जी राजकीय पुण्याई होती ती त्यांना उपयोगी पडली. महाराष्ट्रातील त्यांच्या नेतृत्त्वाची पाळेमुळे उखडून टाकण्याचा दिल्लीकरांचा डाव उधळला गेला आणि महाराष्ट्रातील कृतघ्न नेते-कार्यकर्ते उघडे पडले. यशवंतरावांच्या निवडणुकीतील यशानंतर आणि त्यांनी मुख्य प्रवाहात फेरप्रवेश केल्यावर श्रीमती गांधींच्या मनातील आकस दूर होईल असे सर्वांना वाटत होते. तथापि तसे घडू शकले नाही. यशवंतरावांना सत्तेपासून दूर ठेऊन इंदिराजींनी त्यांचेशी राजकीय सल्लामसलत सुरू ठेवली. दोघांच्या गांठीभेटी होऊन चर्चा-विचारविनिमय होणे हा क्रम बरेच दिवस चालू होता. यशवंतरावांच्या राजकीय शहाणपणाचा, परिपक्वतेचा उपयोग करून घ्यायचा पण सत्तेच्या वर्तुळापासून त्यांना बुद्धिपुरस्सर दूर ठेवायचे असा इंदिराजींचा खाक्या दोन-अडीच वर्षे चालू होता. यशवंतराव दिल्लीत एक प्रकारे अपमानित जिणे जगत होते.

पन्नास वर्षांहून काळ त्यांनी काँग्रेस पक्षासाठी अनेक खस्ता खाल्या होत्या. तुरुंगवास भोगला होता, संसाराकडे दुर्लक्ष केले होते, रक्त अटविले होते. त्या काँग्रेसची दुःस्थिती पाहून यशवंतराव रोज हळहळायचे, जीवाला लावून घ्यायचे. व्यक्तिवाचक काँग्रेसला, व्यक्तिवाचक नेतृत्वाला लोकांनी डोक्यावर घ्यावे याचा अर्थच त्यांना कळेनासा झाला. इंदिराजींची काँग्रेस हाच मुख्य प्रवाह आहे याला मतदारांनी मान्यता दिल्यावर त्या मुख्य प्रवाहात सामील होण्याखेरीज दुसरा मार्गच उरलेला नव्हता. इंदिरा काँग्रेसमध्ये परतण्याची इच्छा त्यांनी प्रकट केली, तथापि त्यासाठी त्यांना कांही महिने ताटकळत बसावे लागले. केंद्रातील सत्ताधारी इंदिरा काँग्रेसचे पदाधिकारी यांनी यशवंतरावांना पूर्वीची प्रतिष्ठा प्राप्‍त करून देण्याबाबत खळखळ केली. यशवंतराव एकाकी पडले. या काळात त्यांच्या मनावर चोहोबाजूंनी प्रहार होत राहिले. त्यांच्यावर कौटुंबिक संकटे या काळातच कोसळली. कर्तासवर्ता डॉक्टर पुतण्या राजा चव्हाण याचे अपघातात निधन झाले. पत्‍नी सौ. वेणूताईंना काळाने हिरावून नेले. स्वीय सचिव श्रीपाद डोंगरे यांचेही निधन झाले. मनाने यशवंतराव खचून गेले. आंता कुणाकरिता आणि कशाकरिता जगायचे अशी भाषा खाजगीत करू लागले. जगण्याची उमेदच ते संपवून बसले. वेणूताईंच्या आठवणीने डोळ्यातून अश्रूधारा वहायच्या आणि घराला देवघर बनविलेल्या पत्‍नीच्या आठवणीने मन विव्हळायचे. हे दुःख थोडे की काय म्हणून इंदिराजींच्या हत्येची त्यांत भर पडली.

इंदिराजींशी त्यांचे मतभेद झाले होते, प्रसंगी दुरावाही निर्माण झाला होता. तथापि इंदिराजींच्या हत्येचा त्यांना जबरदस्त धक्का बसला. एकामागून एक घडलेल्या घटनांचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला होता. त्यांना बरीच वर्षे किडनीचा विकार होता. एका किडनीवर ते तगून होते. ती किडनीही काम करेनाशी झाल्यावर प्रकृती एकदम ढासळली. जगण्याची इच्छाच संपली. व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आणि पक्षापेक्षा देश मोठा या भूमिकेशी घट्ट राहून यशवंतरावांनी मुंबईत आणि दिल्लीत काम केले. इंदिराजींना काँग्रेसचे अध्यक्ष करा असा आग्रह १९६० मध्ये नेहरूंजवळ धरला.