एके दिवशी पार्थ फारच बेचैन होता. तो दारात आला तोच धुमसत. पायरीवरच चबसला. शशीने घरात बोलावले. मी जेवत होतो. जेवण उरकून निघालो, त्याच्या गाडीवर बसलो. तो फार वैतागला होता. 'पेपर बघितला नाहीस का ?' मी म्हटले 'अजून नाही. का ? काय विशेश ?' 'कोरेगाव तालुक्यात टकले बोरगाव नावाचे गाव आहे. रातच्याला तिथे होतो. प्रकरण मोठे भयानक आहे.' तोवर आम्ही माझ्या ऑफिसच्या दारात आलो. तो म्हणाला 'दोन मिनिटात ये.' मी सही करून लगेच बाहेर आलो. गाडीवरून शेजारच्या हॉटेलमध्ये गेलो. तो पैलवान. त्याला चहाचे वावडे. माझे तसे नव्हते. मी पक्का चहाबाज. मी चहा सांगितला. तो सांगू लागला. 'टकल्या बोरगावात अण्णा भिशाचं घर आहे. त्याची बायको मंगल भिसे. मजुरी करतात. दोन बारकी मुकी पोरं आहेत. मंगल भिसे तरुण आहे. ती एका पोराला घेऊन गावच्या खाली ओढ्याला जळाण येचायला गेली होती. ती जळण येचत होती. पोरगं संगतीला होतं. बरीच लाकडं एकत्र बांधली. तवर कोण हायरं तिकडं म्हणत घाडगे नावाचा शेतकरी हाक मारू लागला. मंगल त्याला दिसली. दिवस उन्हाळ्याचे होते. दुपारी एक-दोन वाजायची वेळ. घाडगे म्हणाला, ''जरा माझी पाठ खाजवून दे''. तो आंब्याच्या झाडाखाली बसला होता. तो बापासारखा. ती सरळपणाने पाठ चोळायला गेली. त्यानं दंडकी काढली. मंगल पाठ चोळू लागली. मळाचं लॉट निघत होतं. पण घाडग्याच्या इचारातला मठ मंगलला दिसत नव्हता. त्यानं तिला मुरगाळली. कोंबडीसारखी. बोंबलायलाबी वेळ दिला नाही. पोरगं बोंबलत व्हतं. पण मुकं ते मुकं. ते काय करणार ? घाडग्यानं डाव साधलाता. मंगलनं स्वतःला सोडवून घेतलं. पळत बोंबलत निघाली घराकडं. घाडगे सांगीत व्होता, बोललीस तर वंशाला दिवा ठेवणार न्हाय. त्वांड बंद ठिव. तसंच झालं. ती गप घरी आली. रातच्याला अण्णाला सांगितलं तसा स्फोट झाला. अण्णानं मांगूड्यात सार्यांना सांगितलं. अख्खा मांगवाडा पेटून उठला. दोन दिवसात मला कुणकुण लागली. मी जाणार होतो, पण, रातच्याला अण्णा भिसेचं प्रेत रेल्वे रुळावर पडलंत. पेपरात आलंय छापून ते वाचून सुन्न झालोय. संध्याकाळी सुटलं, की गाठू बोरगाव.
दिवसभर डोस्क्यात नुसता जाळ झालाता. कामात लक्ष नव्हतं. केव्हा एकदा पाच वाजतात, असं झालतं.'
सुप्रिया तुला सांगतो, 'जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे' असे म्हणतात ते खोटं नाही. या देशातला भोगवटा जन्माधिष्ठित आहेत. जिवाची तगमग होत होती. पाच वाजता पार्थ आला. आम्ही बोरगाव गाठले. मांगवाड्यात स्मशानशांतता. एक भयानक सन्नाटा. माणसांची जेवणेखावणे चालली होती. मोटारसायकलचा आवाज ऐकून सारी भराभरा जमली. अण्णा भिसेच्या दारात पोराटोरांनी गर्दी केली. नातेवाईक जमले. झाला प्रसंग मोठा गंभीर होता. मंगल पोरांना पोटाशी घेऊन, पाय पोटाला धरून बसलेली. डोळ्यांना धारा लागलेल्या. पार्थला बघून हंबरडा फोडला, तसं अंगावर काटा उभा राहिला. आम्ही सांत्वन केले. पार्थने सार्या दलितांना एकत्र येण्याचे आवाहन केले, 'मातंग-बौद्ध सारे एकवटून कामाला लागू. सातारला मोर्चा काढू. भिश्यांनला न्याय मिळालाच पाहिजे.' मोर्चाची तारीख ठरली. आम्ही रात्री साडेअकरा-बारा वाजता सातारला पोहोचलो. पोरांचे चेहरे आठवले की, जीव तुटायचा. समाजवादी युवक दलातले आम्ही सारे कामाला लागलो. माध्यमांनी मोठी साथ दिली. रोज दोनतीन गावे, असा सपाटा सुरू झाला. सारा भाग ढवळून काढला. 'मंगल भिसेला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपीला अटक करा' या मागणीसाठी प्रचंड मोर्चा निघाला. मी, पार्थाने एकापेक्षा एक सरस मोर्चे काढले असतील, पण हा मोर्चा इतका प्रचंड होता की, त्याचे रेकॉर्ड आजही कोणी मोडू शकलेले नाही. सातार्यातला सर्वांत मोठा मोर्चा बाया, पोरं, पोरी, म्हातार्या-कोतार्या, तरणी पोरं-माणसांनी सारा रस्ता फुलून गेला होता. प्रचंड मोठा मोर्चा, जिल्हाधिकारी कचेरीवर सभा सुरू झाली तरी शेवटचे टोक राजवाड्यावरच होते. वर्तमानपत्रांनी मोठी दखल घेतली. अधिकार्यांनी आरोपीला पकडण्याचा कसोशीने प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. पण, प्रत्यक्ष काहीच होईना. पार्थ फारच अस्वस्थ होता. काय करावं ? आम्ही आरोपीला ओळखत होतो. तो कुठे आहे ते आम्हाला रोज समजत होते. पण पोलिसांना सांगूनही ते पोहोचण्यापूर्वी आरोपीला खबर मिळायची नि तो फरार व्हायचा.