यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र १६-४९२०१२-२

हे रसायनच काही और होते.  त्यांनी आम्हाला बिलकूल अडवले नाही.  सारे शांतपणे ऐकले.  आम्ही सुरुवातीला तावातावाने बोलू लागलो.  तरी ते शांतच होते.  आमचा आवाज आपोआपच खालच्या पट्टीत आला.  त्यांनी सारे समजावून घेतले.  अधिकार्‍यांना आदेश दिले.  हसत स्वागत केले.  तोंडभरून कौतुक केले.  वर प्रत्येकाची चौकशी केली.  हसत दारापर्यंत पोहोचवायला आले.  आम्ही सारे मनातून आनंदून गेलो होतो.  निदान मी तरी खूपच भारावून गेलो होतो.  ज्या माणसाला लहानपणापासून मी लांबून पाहत आलो होतो त्या माणसाला मी आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहत होतो.  मी त्यांच्याशी बोललो.  अगदी जवळून.  मला किती आनंद झाला होता, हे शब्दात सांगता येत नाही.  ही खरी त्यांची-माझी पहिली भेट.  पुढे सातारच्या वर्तमानपत्रामध्ये बातमी आली.  कासचा फुटलेला पाट तात्काळ दुरुस्त झाला.  शहराला नियमित पाणीपुरवठा सुरू झाला.  रेशनिंग, रॉकेलच्या काही व्यापार्‍यांवर कारवाई झाली.  पण स्थिती फारशी सुधारली नाही.  

ते सर्किट हाउसवरून निघाले, ते थेट एका कार्यकर्त्याच्या घरी.  कोणालाही न सांगता.  ही त्यांची पद्धत होती.  कार्यक्रमाला जाण्याअगोदर ते गावात कुणाच्या घरी वाईट प्रसंग घडला आहे, कोण आजारी आहे, कोणाला भेटले पाहिजे याची योजना मनाशी करून येत असावेत.  बबनराव उथळे त्यांचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते.  शिवाजी उदय मंडळाचे संस्थापक, अत्यंत सरळ चारित्र्याचा माणूस.  ते आजारी होते.  साहेब तडक त्यांच्या घरी.  बबनराव उथळ्यांना कल्पनाही नव्हती.  तोच त्यांच्या दारात साहेबांच्या गाड्यांचा ताफा दाखल.  बबनराव उथळ्यांची भलतीच तारांबळ उडाली.  त्यांनी स्वागत करायच्या आत साहेबांनी त्यांना मिठी मारली.  'काय म्हणते डिस्क ?  चालणे सुरू आहे की नाही ?'  बबनराव अवाकच झाले.  साहेब चौकशीला आले, त्यांना काय काय झाले, सारे माहीत !  बबनराव अगदी आतून हलून गेले होते.  खुशाली विचारून साहेब पंधरावीस मिनिटांत बाहेर पडले.  बबनराव मात्र साहेबांना अंतःकरणात कायमचे ठेवून बसले.  आजही ते यशवंतरावांना कधी विसरले नाहीत.  फार निष्ठावंत.  दिवस कसेही आले, नि गेले.  साहेबही गेले.  पण त्यांच्यावरच्या निष्ठा बबनरावांसोबतच जातील.  कार्यकर्ते जोडण्याची साहेबांची रीतच काही और होती.

ती. सौ. वहिनींना, बाबांना सप्रेम जयभीम.

तुझा,
लक्ष्मणकाका