'दाभोळकर, अहो मला चार माणसांत बोलता येत नाही. तिथं मी काय करणार, माझा तो पिंडच नाही. आपण भलं आपलं काम भलं. मी असल्या भानगडीत नाही. आपल्याच्यानं ते होणारच नाही.' महाराज म्हणाले.
'महाराजसाहेब, खूप मोठी संधी आलीय.' मी म्हणालो.
'ते खरंही असेल हो. पण मला शक्य नाही.'
महाराज काही तयार झाले नाहीत. ते आपला हेका सोडेनात. आम्ही गेल्या पावली माघारी आलो. पुढे खूप उलथापालथी झाल्या. अभयसिंहराजे यांना जनता पक्षाने सातारा विधानसभेचे तिकीट दिले. प्रचार सुरू झाला. महाराज स्टेजवरून दोनतीन वाक्ये कशीतरी बोलत. 'मला मते द्या' म्हणत. अत्यं लाजरेबुजरे सभ्य गृहस्थ. बाकी भाषणे करायला महाबळेश्वरकर, दाभोळकर, आमच्या संघटनेचे आम्ही सर्वजण. तात्या मांडवेकर, बळीभाऊ कदम असा संच होत गेला. प्रचार सुरू झाला. मध्यंतरी एकदा चव्हाणसाहेब जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते. मी आवर्जून भेटायला गेलो होतो. ते त्यांच्या सूटमध्ये बसले होते. बाकी एकदोघे होते. ते गुपचूप बाहेर गेले. मी त्यावेळी पत्रकारिता करीत होतो. साहेबांनी वातावरण विचारले. मी त्यांना सांगितले. काँग्रेसने घोरपडे गुरुजींना उमेदवारी दिली होती. त्याचा प्रचार चांगला होता. पण राजांचे पारडे जड होते. साहेब मला म्हणाले, 'लक्ष्मण, मी अनेकांना सांगितलंय, पण कुणी ऐकत नाही. आम्ही तात्या मांडवेकरांनासुद्धा सांगितलं. तुम्हाला घोरपडे नको असतील तर त्यांना पाडा पण विषाची परीक्षा पाहू नका. आपल्या पाच-दहा पिढ्यांचं नुकसान होईल. मी मोठ्या मेहनतीनं सत्ता विकेंद्रीकरणाचा निर्णय केला आहे. सत्ता खाली झिरपत गेली पाहिजे. ती गोरगरिबांपर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत गेली पाहिजे. तुम्ही जे करता आहात तो सत्ता उर्ध्वगामी करीत आहात. ती एकदा आपल्या हातून गेली ना, तर पाच-दहा पिढ्या हातातून निघून जाईल. आम्ही फार पोळलो होतो. आता दिवसच फिरताहेत.'
साहेब काय म्हणत होते हे माझ्या अकलेने तेव्हा समजत नव्हते कारण काँग्रेसचा तत्कालीन स्थितीत राग आला होता. त्याची प्रतिक्रिया उमटत होती. आम्हाला आणीबाणी नको होती, काँग्रेस नको होती. पण आपल्या हातातून सत्ता जाते आहे, याचे भान त्यावेळी नव्हते, आणि आता ते म्हणाले, तशी पाच-दहा पिढ्या परत खाली सत्ता अधोगामी होईल, असेही होणार नाही. साहेबांनी किती जाणीवपूर्वक राजकारणाचा विचार केला होता. लोकशाहीत कुणी राजा नाही, कुणी रंक नाही, कुणी अमीर नाही, कुणी गरीब नाही. लोकशाहीत लोक महत्त्वाचे. शाही नाही. म्हणून ते आयुष्यभर लोकभावनेचा आदर करीत आले. 'आपण मुख्य प्रवाहात राहिलं पाहिजे' म्हणजे काय ते आता समजते. त्यावेळी डोक्यात क्रांती झाली होती ! एक निर्णय चुकला, तर त्याची किती शिक्षा होते ते पाहण्यासारखे आहे. आज त्यांचे प्रत्येक कथन म्हणजे सुविचार झाला आहे. बहुजनांची सत्ता लोकांनी बहुसंख्य असूनही अल्पसंख्याकांच्या हाती दिली आहे. अल्पसंख्य असलेल्या जाती आणि बहुसंख्याक जाती ही गोष्टच त्यांना मान्य नव्हती. ते म्हणायचे, घटना जात मानत नाही. आपण ती मानतो. जेवढ्या लवकर तिचा लोप होईल, तेवढे चांगले.
वसंतराव नाईक १२ वर्षे मुख्यमंत्री का राहिले हे चव्हाणसाहेबांचे मन समजल्याशिवाय आपल्याला समजू शकत नाही, हेच खरे. अभयसिंह निवडून आले, मंत्री झाले, उत्तम वक्ते झाले. कारभार चांगला करू लागले. काँग्रेसमध्ये आले. पंचवीस वर्षे त्यांनी नेतृत्व केले. आता त्यांचा मुलगा आमदार आहे. तेही चांगले काम करीत आहेत. आता ते 'सेट' होतील. तेही पंचवीस वर्षे निवडून येतील. तोपर्यंत त्यांचा मुलगा पंचवीस वर्षांचा होईल. मग तोही आमदार होईल. मंत्री होईल. आपल्या लोकशाहीच्या नावाने चांगभले ! गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. पण ते म्हणाले म्हणून काय झाले ? त्यांचे सारे ऐकलेच पाहिजे असे थोडेच आहे. आपली लोकशाही वंशपंरागत चालेल. त्याने काय बिघडते ? लोकशाहीच आहे. काही लोकांनी, काही लोकांसाठी, काही लोकांकरवी चालवलेली !!
ती. सौ. वहिनींना, बाबांना सप्रेम जयभीम.
तुझा,
लक्ष्मणकाका