पत्र - १६
दिनांक ०४-०९-२०१२
चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.
मी १९६९ ला फलटण सोडले. कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयाच्या लेबर स्कीममध्ये प्रवेश घेतला. राजकारणाचा आणि राजकारण्यांचा संबंध राहिला तो फक्त वर्तमानपत्रातल्या बातम्यांपुरता. पोटासाठी काम आणि उरलेला वेळ कॉलेज, अभ्यास यात जाऊ लागला. कोल्हापूरला गेलो तो गळ्यातल्या गंड्यादोर्यासह. खिशात काळूबाईच्या अंगार्याच्या पुड्या घेऊन. मी कोल्हापूरला गेलो नसतो, फलटणला राहिलो असतो, तर कदाचित शिकलो असतो, पण माणूस झालो असतोच असे नाही. परंपरांच्या जोखडात अडकलेला एक, असेच झाले असते. लग्न, पोरेबाळे या संसाराच्या परंपरागत चक्रात अडकलो असतो. कोल्हापूरने मला नवा जन्म दिला. माझा पुनर्जन्म झाला. अंगारे, धुपारे, नवस, सायास, कर्मकांड, देव, दैव, धर्म असल्या लचांडातून मी मुक्त झालो. अंगातला देव केव्हा गेला हे मला समजलेच नाही. मी हळूहळू बदलत गेलो. मला सापडले ते शाहू महाराज, म. ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर. या महापुरुषांच्या विचारांची ओळख झाली ती या कोल्हापूरच्या मातीत. जातीपातीच्या पलीकडे घेऊन जाणारे गुरुजन, सहकारी, मित्र आणि शाहू छत्रपतींच्या पुरोगामी क्रांतिकारक विचारांची शिदोरी घेऊन जगणारे हजारे लोक. कोल्हापूर सर्वार्थाने क्रांतिकारक. जीव लागला तर जिवाला जीव देणारे आणि दुसर्या टोकाला गेले तर ढुंकूनही न पाहणारे साधेभोळे लोक. समतावादी, परिवर्तनशील विचारांनी माझी जडणघडण झाली ती या लाल मातीत. मी जगभर गेलो तरी आजही माझे आवडीचे गाव कोल्हापूरच आहे. त्याचे कारण या गावाने मला कार्यकर्ता म्हणून, माणूस म्हणून घडवले. वि.स. खांडेकर तथा भाऊ यांच्याबरोबर राहण्याचा माझ्या आयुष्यातला काळ खरेच मंतरलेला काळ. पुस्तकांशी माझी ओळख झाली ती भाऊंच्या घरी. ज्ञानसागराच्या तीरावर मला उभे राहता आले. त्यातले काही चार थेंब माझ्याही आयुष्याचे सोने करून गेले. मी राष्ट्र सेवा दलात गेलो, शशी भेटली, लग्न केले. सेवादलाने माझे तरुण मन बंडखोर केले. समाजवादी विचारांचे संस्कार या कोवळ्या वयात झाले. लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा या मूल्यांवर मला माझे आयुष्य उभे करता आले. मन एका विचाराने भारावून गेले. जातिधर्मापलीकडे गेलो. माझे कुटुंब आंतरभारती झाले. अगदी कोकणस्थ ब्राह्मणापासून पूर्वास्पृश्य समाजापर्यंत माझे कुटुंब सोळा-सतरा जातींनी व्यापले. आणि आता आम्ही सारे कुटुंबीय तथागत भगवान बुद्धांच्या वाटेने गेलो आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला रस्ता खर्या अर्थाने आपलासा केला. तो परिवर्तनाचा बिंदू म्हणजे कोल्हापूर. तुझ्या बाबांशी माझी नाळ जुळली ती या विचारांच्यामुळे. तुझ्या लग्नात मी, महानोर, अरुण मेहता, अरुण गुजराथी, विठ्ठलभाई मणियार असे कितीतरी जातीचे आम्हा-वरबाप म्हणून फेटे बांधून महाराष्ट्रातल्या लोकांचे वेगवेगळ्या गेटवर स्वागत करत होतो ते या विचारांमुळेच. आपल्या एकुलत्या एका लेकीचे लग्न लाखो माणसांच्या साक्षीने शरदरावांनी बारामतीत केले तो खरे तर इतिहास होता. आंतरजातीय विवाहाला लाखो लोक जमले होते. कुठेही विषादाचा सूर निघाला नाही. शाहू छत्रपतींच्या नंतर एवढे धाडसी पाऊल तुझ्या बाबांनी उचलले. त्याचा आम्हा मित्रांना फार अभिमान.
आज तुझे कौतुक करताना मनापासून आनंद होतो तो यासाठी. त्यांनी मला काही गुळखोबरे दिले नाही. मी धर्मांतराचा निर्णय केला. ते काळजीत होते. मला न सांगता ते अनेक गोष्टी करीत होते. राज्यात कुठेही साधा दगड सभेत आला नाही. मी राज्यभर फिरत होतो. पोलिस संरक्षण न घेता बोलत होतो. त्याचे कारण आमचे अंतरीचे नाते. नात्यात ते कधीच राजकारण आणत नाहीत. त्याचे कारण यशवंतराव चव्हाण साहेबांकडून आम्हाला मिळालेला वारसा आहे. सर्व विचारांच्या लोकांशी त्यांचा स्नेह आहे तो व्यक्तिगत पातळीवर. बाळासाहेब ठाकरे त्यांचे मित्र असतात आणि अगदी टोकाचे डावे, उजवे कम्युनिस्ट ही त्यांचे तेवढेच मित्र असतात. व्यक्तिगत नात्यामध्ये ते कधीही राजकारण आणत नाहीत.
तर, मी आता मोठा होऊन, आंतरजातीय लग्न करून पुन्हा कोल्हापुरातून सातारला आलो होतो. पण आता मी पूर्वीचा राहिलो नव्हतो. राजकारणात होतो, समाजकारणात होतो. समाजवादी परिवाराने आम्हांला काँग्रेसविरोधाची संथा दिली होती. परिवर्तन, क्रांती, बदल या विचारांनी भारावून मी काम करू लागलो होतो. काँग्रेसचे राजकारण प्रस्थापित व्यवस्थेला जोपासणारे होते. यशवंतराव त्यांचे नेते होते. मी व्यवस्था परिवर्तनाची स्वप्ने पाहत होतो. भाबडेपणा गेला होता. यशवंतरावांबद्दल पूर्वी जसा भाबडा जिव्हाळा होता तसा तो राहिला नव्हता. वयाबरोबर वर्ग जाणिवा आल्या होत्या. वाचनाने मन घडत होते. काँग्रेस विरोध मनात पक्का बसला होता. जातजाणीव काय असते ते समजू लागले होते. समाजवादी विचरांनी भारावून गेलो होतो.