यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र १५-२५८२०१२-३

पाटील स्मरणाचा कितीही धड असला तरी त्याला लिहितावाचता येत नव्हते.  त्यामुळे त्याला लेखक मदतनीस आवश्यक झाला.  या मदतनीसाला पटवारी, कुलकर्णी किंवा पांड्या म्हणत.  कुळे करणारा म्हणजे कुळावर, गावचा हिशोब लिहिणारा तो कुलकर्णी.  कुळकरण वतन सुमारे हजार वर्षांचे जुने आहे असे सांगतात.  बहुतेक कुलकर्णी ब्राह्मण, काही प्रभू, क्वचितच मराठे, लिंगायत व मुसलमान असत.  पाटीलकीच्या खालोखाल कुलकर्ण्याला महत्त्व होते.  पेशव्यांपासून तो खालपर्यंत सर्व ब्राह्मण सरदार त्याला बिलगले.  तो सर्व गावचे रेकॉर्ड ठेवी.  शेती, जनावरे, माणसे सार्‍यांची गणती ठेवी.  मुलकी कागदपत्रे, दिवाणी कामातील पंचायतीचे सारांश व फैसलेनामे, फौजदारी कामाचे कागद वगैरे सारी कामे कुलकर्णी करी.

सुप्रिया, हे थोडेसे सविस्तर सांगितले कारण त्याशिवाय यशवंतरावांनी काय बदलले हे कळणार नाही.  ते महाराष्ट्राचे शिल्कार होते म्हणजे काय ?  जुनी सारी व्यवस्था जन्माधिष्ठीत होती, वंशपरंपरेने आलेली होती.  ती बदलण्याचा प्रश्न होता.  घटनेमध्ये विकासाचा केंद्रबिंदू माणूस मानला आहे, पण वास्तवात जमीनदारी, वतनदारी, सरंजामदारी ठाण मांडून बसली होती.  घटनेत समता सांगितली होती पण प्रत्यक्षात विषमता होती.  पुढे मी मोठा झाल्यावर जेव्हा त्यांच्याशी बोललो, तेव्हा त्यांनी फार मार्मिक शब्दात एक प्रसंग सांगितला.  त्यावेळी पक्षात मोठी शिस्त होती.  पक्षाचे पार्लमेंटरी बोर्ड होते.  ते क्रियाशील होते.  पक्षातले सर्व आमदार पक्षकचेरीत बसून शासकीय विधेयकांवर विचारविनिमय करत.  प्रसंगी सर्वांच्या मनाचा कानोसा घेण्यासाठी पक्षाचे नेते सर्वांना बोलते करत.  ही परंपरा तुझे बाबा मुख्यमंत्री होते तोपर्यंत मी स्वतः पाहिली आहे.  पक्षातल्या आमदारांची एक बैठक बोलावण्यात आली होती.  चव्हाणसाहेबांनी 'पंचायत राज'चे विधेयक विधिमंडळात आणणार असल्याचे सांगितले.  आपल्या राज्यघटनेत संसद आणि विधिमंडळ अशी द्विस्तरीय शासनप्रणाली आहे.  संसद आणि विधिमंडळ अशी दोन धारांची शासनपद्धती घटनेने स्वीकारली आहे.  यशवंतरावांच्या मनात ती त्रिस्तरीय करायची होती.  सर्व सत्ता अधिकाधिक लोकांपर्यंत जाणार होती.  'सत्तेचे विकेंद्रीकरण' असे त्यांनी त्यांचे वर्णन केले होते.  विधेयकाचा सर्व तपशील साहेबांनी सर्व आमदार, मंत्र्यांना सांगितला.  लोकांनी आपली मते मांडावीत म्हणून त्यावर पक्षांतर्गत चर्चा सुरू झाली.  आमदार, जेष्ठ मंत्री सारे बोलू लागले.  आम्ही काय करायचे, मतदारसंघात पंचायत समितीच्या सभापतीने विकासाची कामे केली तर आम्हाला कोण विचारील, जिल्हा परिषदेने जिल्ह्याची कामे केली तर जिल्ह्यात आम्हाला कोण विचारील, आम्ही पुन्हा निवडून कसे येणार ?  एक ज्येष्ठ मंत्री म्हणाले, गावचा सरपंच कोण असणार, दिल्लीत कोणीही आले आणि गेले, कितीही शाह्या आल्या गेल्या, पण गाव राखले ते गावच्या पाटलाने.  त्या पाटलाचे काय होणार ?  सरपंच कुणीही झाला तर या पाटलाला कोण विचारणार ?  तुम्ही गाव मोडायला निघाला आहात.  लोकशाही आली तरी ती जुन्याच वाटेने येईल, नव्या वाटेने येणार नाही !  दुसरे एक मंत्री म्हणाले, मग निदान असे करा, तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभापतीला आमदार करा.  जिल्ह्यातला ज्येष्ठ नेता जिल्हापरिषदेचा अध्यक्ष करा आणि गावचा पाटील सरपंच करा.  म्हणजे, सगळ्यांनाच सोईचे होईल.  लोकशाही मान्य नसलेले जातदांडगे, धनदांडगे, सरंजामदार, वतनदार यांनी आता विधिमंडळातही प्रवेश मिळवला होता.  प्रत्येक पुरोगामी निर्णयात यांचा आडवा पाय असे.  हे सारे यशवंतरावांना ठाऊक होते.  महाराष्ट्राचे मन त्यांना समजत होते.  गावोगावच्या मिरासदारांच्या मिरासदार्‍या संपवायच्या तर कायदाच करावा लागणार.  त्यांचे जनतेच्या नाडीवर बरोबर बोट होते.  त्यांनी सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकले आणि म्हणाले, 'राज्य सर्वांचे आहे, ते सर्वांसाठी आहे आणि सर्वांनी एकत्र येऊन करायचे आहे.  ते कोणा जातिधर्माचे, गटाचे असणार नाही.  माझी भूमिका बेरजेची आहे, वजाबाकीची नाही.  सर्वांना बरोबर घेतले पाहिजे.  सर्वसामान्य माणसाला राज्य आपले वाटले पाहिजे.  त्यासाठी आपण सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे धोरण घेतले पाहिजे.  जुन्या व्यवस्थेबद्दल मला काही बोलायचे नाही.  नव्या विटीदांडूने नवा खेळ खेळला पाहिजे.  ही माझी भूमिका पक्षाला मान्य नसेल, तर उद्यापासून मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असणार नाही.'  असे निर्वाणीचे बोलल्यावर ग्रामीण भागातून नव्याने आलेले तरुण आमदार त्यांच्या बाजूने बोलू लागले.  वातावरण बदलून गेले.  त्यातून आताची त्रिस्तरीय व्यवस्था जन्माला आली.  जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती. दलित, आदिवासी, बलुतेदार, आलुतेदार पहिल्यांदा गाव नावाच्या व्यवस्थेत यामुळे सन्मानाने समाविष्ट झाले.  अजूनही भटक्या-विमुक्तांना या व्यवस्थेत थारा नाही.  तरी हे पाहिल्यावर यशवंतरावांच्या दूरदृष्टीचा महिमा समजतो.  स्त्रियांना या सर्व व्यवस्थेत शूद्राप्रमाणे गुलाम केले होते.  तुझ्या बाबांनी या भगिनींसाठी जिल्हा परिषदांची दारे उघडली.  हे 'पंचायत राज' आले नसते तर जुनेच बोके नव्याने खादीचे कडक कपडे घालून नव्या व्यवस्थेचे मालक झाले असते.  आज डोळे उघडे ठेवून पाहिले तर हे सरंजामदार, वतनदार सारा प्रदेश काबीज करत आहे.  पैसा परमेश्वर झाला आहे.  यशवंतरावांच्या क्रांतिकारक विचारांचा रोजच्या रोज पराभर होताना सामान्य माणूस पाहतो आहे.

ती. सौ. वहिनींना, बाबांना सप्रेम जयभीम.

तुझा,
लक्ष्मणकाका.