यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र १७-६९२०१२-२

याच दरम्यान यशवंतरावजी चव्हाणसाहेब सातारच्या सर्किट हाउसवर आहेत हे आम्हाला समजले.  त्यावेळी ते परराष्ट्रमंत्री होते.  आम्ही पंधरावीस जण तात्काळ सर्किट हाउसकडे पळालो.  दाभोळकरांना निरोप पाठवले.  नरूभाऊ तिथे आले. शासकीय विश्रामगृहाच्या पटांगणात पाय ठेवायला जागा नव्हती.  सगळीकडे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते.  दाभोळकरांना ओळखत असल्याने पुढार्‍यांनी त्यांना वाट काढून दिली.  आम्ही त्यांच्या मागे गर्दीतून वाट काढत दारापर्यंत गेलो.  दार लावलेले.  बाहेर कार्यकर्त्यांची रेटारेटी सुरू.  पोलिस मोठ्या कष्टाने गर्दीला शांत करीत होते.  आतल्या हॉलमध्ये जिल्ह्यातले आमदार, खासदार मंत्री असे खासे लोक.  नरूभाऊंनी एका कागदावर नाव लिहून आत पाठवले आणि पाचच मिनिटांत सारे चित्र बदलले.  हॉलमधले सारे पुढारी बाहेर येऊ लागले.  आम्ही हॉलमध्ये गेलो तर साहेब एकटेच खुर्चीत बसलेले.  हसून आम्हा सर्वांना बसायला सांगितले.  आम्हाला ते ओळखत होते.  त्यांनी नावानिशी उल्लेख सुरू केले.  आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांची नावे साहेबांच्या लक्षात आहेत.  त्यांनी नावाने आपल्याला बोलावून जवळच्या खुर्चीत बसवले, त्यानेच केवढा आनंद झाला होता.  तो काही सांगता येणार नाही.  एका बाजूला पार्थ, एका बाजूला मी.  समोरच्या कोचावर किशोर बेडकिहाळ, डॉ. दाभोळकर, बाळासाहेब थोरात, चंद्रकांत शेडगे, विजय मांडके असे पंधरा वीस जण बसलेले.  'बोला पार्थ, काय काढलंत ?'  पार्थने सारा वृत्तांत सांगितला.  साहेब फार गंभीर झाले.  एकच मुका मुलगा साक्षीला होता.  बाप मारून टाकलेला रेल्वे रुळावर.  मातंग समाजातली ही भगिनी.  'मी मोर्चाचा सारा वृत्तांत वाचला आहे.  माझ्या मतदारसंघातल्या उपेक्षित मुलीवर अशी वेळ येत असली तर मी कदापि सहन करणार नाही.  आरोपीला तात्काळ अटक झालीच पाहिजे.'  पार्थ म्हणाला, 'पण, काहीतरी मार्ग काढला पाहिजे.  मार्ग काढल्याशिवाय आम्ही आपल्याला उठूच देणार नाही.'  'तेच म्हणतो मी.  आपण उठायचेच नाही.'  दाभोळकर म्हणालो, 'साहेब माफ करा, आपल्याला न सांगता घेरावा करावा लागतोय.' 'दाभोळकर, अहो प्रसंगच असा आहे, उपचार कसले बघायचे ?  तुमचा घेराव आता उठणार नाही, पण घेराव म्हणजे घेराव.  लघुशंकेलासुद्धा कुणी उठायचे नाही.'  साहेबांनी बेलचे बटण दाबले.  तात्काळ माणूस आत आला.  'जिल्हाधिकारी, एस.पी. ना बोलवा.'  दोन्ही अधिकारी नम्रपणे साहेबांपुढे उभे.  डॉ. दाभोळकरांनी प्रसंग सांगितला.  एस.पी. म्हणाले, 'साहेब, प्रयत्‍न सुरू आहेत.  तात्काळ अटक होईल.'  'अहो तात्काळ कसले ?  या कार्यकर्त्यांनी मला घेराव केला आहे.  आणि माझ्या मतदार संघात एका उपेक्षित भगिनीवर अत्याचार होतो आणि आरोपी सापडत नाही ?'  तोवर पार्थने आरोपी कुठे लपला आहे हे एका कागदावर लिहून कागद माझ्याकडे दिला.  मी तो साहेबांकडे दिला.  त्यांनी वाचला.  मला हळूच म्हणाले, 'नक्की आहे ना ?'  मी मानेनेच होकार दिला.  आता साहेबांचे रूपच बदलले.  ते अधिकार्‍यांना संतापूनच बोलले.  'कार्यकर्त्यांना ठावठिकाणा माहीत असतो नि पोलिसांना, प्रशासनाला नसतो ?  हे काय चाललं आहे ?  आरोपीची प्रॉपर्टी जप्‍त करा, जोपर्यंत आरोपी साडत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही.  हा कागद घ्या.'  एस.पी. फारच खजील झाले.  त्यांनी कागद घेतला नि 'सर, सर' म्हणत बाहेर गेले.

साहेबांनी जिल्हाधिकार्‍यांना सूचना दिल्या.  तेवढ्यात एक जिल्ह्यातले मोठे पुढारी हॉलमध्ये आले.  आम्ही 'घेराव' केलाय.  हे एव्हाना बाहेर गेले होते.  काँग्रेसचे पुढारी संतप्‍त झाले होते.  कार्यकर्तेही पेटले होते.  आत आलेले पुढारी दाभोळकरांना म्हणाले, 'काय डॉक्टर, साहेबांना घेराव केला आहे ?'  दाभोळकर बोलण्याऐवजी साहेबच म्हणाले, 'हो घेराव केलाय.  मी त्यांना घेराव कबूल केलाय.  आता आरोपी सापडेपर्यंत मी इथंच बसून राहणार.  तुम्ही निघा.'  'साहेब, मूठभर माणसं...' साहेब शांतपणे म्हणाले, 'माणसं किती हा प्रश्न महत्त्वाचा नाही.  सामाजिक न्यायाचे प्रश्न संख्येने सोडवायचे नसतात.  इथं तर अन्यायच अन्याय आहे.'  पुढारी खाली मान घालून बाहेर गेले.  पंधरा वीस मिनिटात एस.पी. आत आले.  'साहेब, आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.  आपण घेराव उठवावा अशी विनंती आहे.  जिल्हाधिकार्‍यांकडे साहेबांनी पाहिले.  ते म्हणाले, 'सर, आरोपीला आताच ताब्यात घेतले आहे.'  साहेब हसले.  'चला दाभोळकर, उठवायचा का घेराव ?'  आम्ही सारे उभे राहिलो.  घेराव उठवला.  साहेबांचे आभार मानायला पार्थ प्रयत्‍न करू लागला.  साहेबांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला.  'अरे, आभार मानायचे, तर पोलिसांचे माना.  माझे कशाला ?'  आमचे लोक बाहेर निघाले.  साहेब म्हणाले, 'लक्ष्मण, भेटत जा.'  मी 'होय साहेब' म्हणून बाहेर गेलो.  मनात असते तर साहेबांनी पाच मिनिटांत आम्हाला बाहेर काढले असते.  कार्यकर्त्यांची मोठी फौज होती.  आमदार, खासदार, मंत्री होते.  त्यांना काय अशक्य होते ?  पण ज्या पद्धतीने त्यांनी विषय हाताळला ती पद्धती एका कुटुंबवत्सल पित्याची होती.  दीनदुबळ्यांना न्याय द्यायचा, तर माया लागते.  मायाच नसेल तर लोकशाही असली काय, नसली काय.  गरिबांना सारे सारखेच.  छत्रपती शाहू महाराज राजेच होते.  अपार करुणेनं भरलेलं त्यांचं हृदय लोकशाहीपेक्षा मोठं होतं.  यशवंतराव त्यांचे वारसदार होते.  वारसा चालवायला पोटच्या पुत्राची गरज असत नाही, हेच खरे.

ती. सौ. वहिनींना, बाबांना सप्रेम जयभीम.

तुझा,
लक्ष्मणकाका