मानवाचं सत्त्व पाहण्यासाठी देव वाट्टे ते रूप धारण करतो व दान देणार्याला स्वर्ग प्राप्त होतो, असं दानाचं महत्त्व सांगितलं आहे. चोर्या करायच्या, भीक मागायची जगण्यासाठी, अंधारातली ही प्रेतं- जीव जात नाही म्हणून भुताखेतांच्या गोष्टी आळवीत, देवधर्माच्या नावानं ठेचा खाऊन जगत असायची. मरण येत नाही म्हणून जगायचं. किंवा मरेपर्यंत जीव मुठीत धरून जगायचं. स्वातंत्र्यांचा सूर्य उगवला, अज्ञानाचा अंधार दूर झाला. अशा संधिकाळात यशवंतरावांनी आपलं राजकारण केलं आहे. जुनी व्यवस्था मोडायची. नव्यानं नवं जग उभं करायचं.
तर काय सांगत होतो, अंधाराची कळा, पिढ्यांचा अंधार. त्या दिवशी सकाळच्या पारी तान्या रामोशी मोठ्या खुशीत बाच्या बरोबर तंबाकू मळत सांगत व्हता, 'बापू, दवंडी द्यायला सांगतूया गड्या महाराला. सरपंच म्हणाल्यात समद्या गावाला सांगायला पायजेल. दवंडी देऊन सांगा आज सार्याला गावातली लाईट सुरू होणार काय.' तान्या नाईक म्हारूड्याकडं गेला. बा आईला म्हणाला,
'आगं आयकलंस का, सांच्याला ह्या खांबावला लाईट लागणार हाय'.
दोन महिन्यापास्नं गावातल्या गल्ल्याबोळानं चौकाचौकांत खड्डे खांदून लोखंडी पोल रवायचं काम सुरू व्हतं. पाचपन्नास माणसं खांब रवीत व्हते. तारा वडीत व्हते. आड येणार्या झाडांच्या फांद्या कापीत व्हते. महिनाभर गावात एकच चर्चा व्हती. आपल्या गावात आता लाईट सुरू होणार हाय ! ज्यो त्यो लाईट कवा सुरू होणार म्हण वाट बगीत व्हता. आन् गजा म्हाराची दवंडी फिरू लागली. दिवस उगवून कासराभर आला व्हता. सकाळच्या उन्हात पोरं गल्ल्याबोळात गोट्या खेळत व्हती. दारातनी जनावरांचा शेणगोटा करत शेतकरी कामाला लागले व्हते. सकाळच्या गायांच्या धारा काढून दुधं चुलीवरती तापत व्हती. बाया घराघरांत लगबगीनं चुलीवर भाकरी भाजत व्हत्या. कुणी आंगुळी करीत व्हते. कुणी भाकरी बांधून लगबगीनं शेरडं सोडून रानात निघाला व्हता, तर कुणी म्हसरांना हागनदारीत हाकीत व्हता. बेंदतल्या हिरीवर बायांची मुरकंड वळली व्हती. प्रत्येकीला पाणी वडायची घाई झालीती. प्रत्येकीची बादली हिरीतनं पाणी काढायला खाली टाकलेली. सगळ्याजणी कंबरेत वाकून पाणी शेंदत व्हत्या. घागरी, हांडे, चरव्या, कळश्या भरत व्हत्या. एकमेकीला उचलू लागत व्हत्या. त्यानं एकच कालवा चाललाता. प्रत्येकीला रानात जायाची घाई व्हती. अन् तेवढ्यात गज्या म्हारतीची आरूळी आली.
'ऐका हो ऐका, आपल्या गावचे सरपंच मानसिंगराव सस्ते यांनी आज रोजी संध्याकाळी आपल्या गावातली लाईट सुरू होणार हाय म्हण सांगितलं हाय हो... ' म्हणत हातातलं डफलं वाजवीत व्हता. प्रत्येकजण कान दिवून ऐकत व्हता. आज लाईट सुरू होणार. मानसिंगराव लाईट सुरू करणार. वड्याला पूर यावा तसा दवंडीच्या बातमीचा पूर आला. गज्या सांगीत व्हता. घराघरावर गुढ्या उभारून, तोरणं बांधून स्वागत करा हो.... सारा गाव आनंदात नाचू लागला. पंचमीला बाया जमायच्या, अंगणाअंगणात फेर धरून नाचायच्या, फुगड्या खेळायच्या. सारं गाव खुळावलं. मानसिंगरावांनी सार्या गावातल्या बायांना कपूर मणेराकडं जाऊन फुकाट बांगड्या भरायला सांगितल्या. आन् प्रत्येकजण मणेराच्या म्हणजे गावातल्या कासाराच्या दारात बसू लागल्या. रानातल्या कामाला सुट्टी. बैलकं, कुळवाडी, रानात गेलं. जनावरं कुणी दावणीला उपाशी ठिवीत नाही. जनावरं रानात चरायला सुटली. मेंढक्यांनी खांडं वाडग्यातनं मोकळी केली. ती ब्यां ब्यां करीत रानात पळाली. मेंडकं मेंढराना हाकीत गावाबाहेर माळावर गेलं. मास्तरनी शाळंला सुट्टी दिली. त्यानं पोरं उंडारली. गावभर बायांनी रांगोळ्या घातल्या. सडं घातलं. कोतवालानं दवंडी दिली. सारं गाव कामाला लागलं. दिवसभर सारंजण वाट बगीत व्हते. संध्याकाळ कवा व्हणार ? गोरगरीब पोटामागं रानूमाळ गेली, तर गावच्या वरच्या आळीतल्या बायकांनी गावातल्या बायकांना गोळा केलं. सरपंच त्यांच्या आळीचा व्हता. मानसिंग सस्ता उंचापुरा, धिप्पाड माणूस. खादीचं धोतर, खादीचा नेहरू शर्ट, डोक्यावर गांधी टोपी. सणावाराला नेहरू शर्टावर जाकीट असा पोशाख असायचा. गावातली पाटीलकी आता संपली व्हती.
वतनानं येणार्या पाटलाला मान व्हता. पण नव्यानं आता सारा गावचा कारभार ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या सरपंचाच्या हातात गेला व्हता. गावकामगार पाटील, कुलकर्णी, देसाई, देशपांडे यांना आता काही सत्ता राहिली नव्हती. ती ग्रामपंचायतीला निवडून आलेल्या लोकांना मिळाली व्हती. कुळकरण वतनं गेली. सावकारी कायद्यानं मोडली. कुळांच्या नावानं जमीन झाली. कसंल त्याची जमीन. लाखो शेतकरी आपआपल्या वहिवाटीच्या जमिनीचे मालक झाले. पाटलांचा दरारा संपला. पाटलांच्या वाड्याचं वैभवही संपलं. गावाला नवा राजा आला. पण तो पाटलिणीच्या पोटी जलमाला येत नव्हता. तो मतपेटीत जलमाला येत व्हता.