यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र १३-२०८२०१२-१

सुप्रिया, ही फी माझ्या वेळेला १२०० च्या आत उत्पन्न असणार्‍यांना, सर्व जातिधर्मातील मुलामुलींना मिळत व्हती.  खरं सांगू, ही सवलत नसती तर हे पत्र लिहिण्यासाठीची अक्षरं माझ्या हातात आणि डोक्यात आली असती का ?  आज जे काही दोन घास मिळताहेत.  उत्तम बंगल्यात राहतोय. गाडीतून फिरतोय हे सारं मिळालं ते कुणामुळे ?  पहिल्यांदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे. त्यांनी घटना लिहिली नसती, जन्मानं सारे समान ठरवले नसते, तर ना चव्हाणसाहेब झाले असते, ना सवलत मिळाली असती.  ही आम्ही आमची सारी जीवनं या महापुरुषांच्या झोळीत टाकली ना, तरी त्यांचे उपकार फिटणारे नाहीत.  पुढे मी शिकत गेलो.  मोठा झालो, वयानं, विचारानं, वाचनानं, चिंतनानं वाढलो.  थोरामोठ्यांच्यात वावरू लागलो, अधिकार, हक्क, कर्तव्यं समजू लागली.

त्या काळात आमच्या शाळेच्या गॅदरिंगला तेव्हाचे शिक्षणमंत्री मधुकररावजी चौधरी आले होते.  चव्हाणसाहेबांच्या शाळंत आलो, याचं फार मोठं समाधान त्यांच्या चेहर्‍यावर दिसत व्हतं. मी कळीत झाल्यानं मला आता यशवंतरावांबद्दल फार कुतूहल व्हतं.  त्यांचा विषय कुठं बी निघाला, की माझी पावलं आपोआप थांबत.  कान टवकारून मी ऐकत राहत असे.  मधुकररावजी बोलले ते आजही मी अंतःकरणात खोलवर जपून ठेवलं आहे.  खरं तर या सर्व आठवणी मी कधी लिहिल्या नसत्या.  त्या माझ्या वैयक्तिक, माझ्यापुरत्या ठेवण्याचा माझा निर्णय व्हता.  परंतु जन्मशताब्दी आणि मिळालेलं बोनस आयुष्य यामुळे तुम्हा तरुण मुलांना त्या सांगाव्यात म्हणून लिहिण्याचा निर्णय केला. कित्येकदा राजकारणातल्या माणसाबद्दल चांगलं लिहिणं हेतूबद्दलच संशय निर्माण करू शकतं, म्हणूनही टाळत आलो.  पण आता खरं सांगू, कुणाच्याच दारात उभं राहायचं नाही, कुणाकडेच काही मागायचं नाही. ज्यांच्यासंबंधी लिहायचं आहे ते जाऊनही आता पंचवीस वर्ष उलटून गेलीत.  म्हणून मनाला वाटलं सुप्रियाला लिहावं.  अपघातात आणि त्या अगोदरही तू उभी राहिलीस ना खंबीरपणे, भाई, समता, शशी यांच्या पाठीशी.  तुम्हा सर्वांमुळे पुनर्जन्मच झाला ना.  म्हणून तुला लिहिण्याचा निर्णय केला.... हे पुन्हा भलतीकडेच गेलो.... तर सांगत काय व्हतो, ही बाराशे रुपयांची सवलत कशी आली, ते शिक्षणमंत्री ना. मधुकरराव चौधरी सांगत व्हते.

'यशवंतरावांच्या मंत्रिमंडळातील त्यांचा एक सहकारी, संघटनेतला कार्यकर्ता म्हणून कितीतरी हृद्य प्रसंग त्यांच्या सहवासात अनुभवले.  ते सारे सांगणं शक्य नाही.  तुम्हा मुलांना ते तेवढे समजणारही नाहीत.  पण ही मोठी माणसं आहेत.  काही त्यांच्यासाठीही सांगावयाचे आहे.'  मधुकरराव चौधरी म्हणजे साक्षात सौजन्यमूर्ती.  पांढरंशुभ्र धोतर, पांढरा नेहरू शर्ट, त्यावर जाकीट, डोक्याला पांढरीशुभ्र कडक इस्त्रीतली, तिरकी घातलेली.  टोपी ही त्यावेळी चव्हाण स्टाईल म्हणून प्रसिद्ध होती.  आम्हीही तशाच टोप्या घालत होतो.  माझ्या माध्यमिक शाळेत टोपी सक्तीची होती. आणि ती तिरपी घालायची.  डोळ्यांना सोनेरी कडांचा चष्मा, भव्य कपाळ, बोलके डोळे, अत्यंत शांत, सोज्वळ, सात्त्वि चेहरा.  कोणाही माणसाला आपलंसं करणारा.  सारी सभा शांत होती.  ते चव्हाणसाहेबांच्या आठवणी सांगत होते-

'चव्हाणसाहेबांचे मंत्रिमंडळ म्हणजे केवळ राजकीय लोकांचा मेळा नसे, तर कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध असलेले एक मोठे कुटुंबच असे.  ते त्यांच्या सहकार्‍यांच्या जीवनात सहज व सहृदयतेने प्रवेश करत व त्यांच्या सुखदुःखाशी समरस होत.  मराठी, गुजराती मंत्री असेल तरी आणि मतभेद झाले तरी ते खेळीमेळीने सर्वांना बरोबर घेत. जसे कुटुंबप्रमुख म्हणूनच वावरत.  त्यांचा दराराही तसाच होता.  प्रत्येकाला आपले मत मांडता येत असे. ते सर्वांचे शांतपणे ऐकून घेत.  सर्वांना पुरेसा वेळ मिळत असे.  घाईगर्दीनं चर्चा लवकर आटपा, उरका, असे कधी होत नसे.  उलट, कुणी बोलले नाही तर ते शांतपणे त्याला बोलते करून त्याचेही मत जाणून घेत.  सर्व निर्णय एकमताने होत असत.'

मधुकररावांनी सांगितलेली एक आठवण कधी बी विसरता येणार नाही अशी व्हती. ते अत्यंत तळमळीनं बोलत व्हते.  काळजाला हात घालून भावनांच्या हिंदोळ्यावर पालक आणि मुलं डोलत व्हती.  मध्ये मध्ये टाळ्यांचा गजर होत व्हता.  काही माणसांचं बोलणं मनाची विलक्षण पकड घेतं.  मधुकररावांचे बोलणं अदबीचं तर होतेच, पण एखाद्या उत्तम शिक्षकानं शिकवावं तसं ते शिकवत.  त्यांना 'सानेगुरुजींच्या धडपडणार्‍या मुलांतला एक' असं लोक म्हणत ते उगीच नाही.

दुसरी आठवण सांगताना ते म्हणाले,

'१९५८-५९ चा सुमार असेल.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लक्षावधी अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा देऊन हिंदू धर्मातून बाहेर काढले.  त्यानंतर मागासवर्गीयांना अनुसूचित जाती म्हणून घटनेनुसार मिळत असलेल्या सवलती द्यायच्या का, असा प्रश्न मंत्रिमंडळासमोर आला.  घटनेनुसार तसे बंधन सरकारवर नव्हते.  डॉ. बाबासाहेबांचा काँग्रेसविरोध आणि धर्मांतराच्या त्यांच्या प्रक्षोभक निर्णयामुळे त्यावेळच्या बैठकीसमोर प्रश्न आला.  अत्यंत कडाक्याची चर्चा झाली.  मते अजमावण्यात आली.  यशवंतरावजींसह आम्ही चारच सदस्य सवलती सुरू ठेवाव्यात या मतांचे होतो. कारण, धर्मबदल झाला म्हणून लगेच मागासपण गेले असे होत नाही.  कायदेशीर बंधन नसले तरी नैतिक व सामाजिकदृष्ट्या सवलती सुरू ठेवणेच न्यायाचे आहे असे आमचे मत होते. मात्र मुख्यमंत्रीच अल्पमतात असे चित्र होते.  यशवंतराव खूप दुःखी झाले.  त्यांनी अत्यंत तळमळीने बाजू मांडली.  शेवटी विषय तहकूब ठेवण्यात आला.  मुख्यमंत्र्यांनी पंडितजींशी याबाबत आधी चर्चा करावी असे ठरले.  पुढच्या बैठकीच्या वेळी यशवंतराव अतिशय आनंदी दिसले.  सुरुवातीलाच त्यांनी पं. जवाहरलाल नेहरूंशी झालेल्या चर्चेचा वृत्तांत कथन केला.  पंडितजींनी सवलती सुरू ठेवण्याला अनुकूल असल्याचे सांगितले.  नवबौद्धांना मागासवर्गीयांच्या शक्य त्या सर्व सवलती चालू ठेवण्याचा मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय झाला.  'आज आपणाला कृतार्थ वाटते' असे यशवंतराव म्हणाले.  राजकारणी विचारावर सामाजिक न्यायभावनेने मात केली असेच मला वाटते.'