असाच मी आईच्या मागं टुमणं लावून, ती नको नको म्हणत असताना, तरडगावातल्या गल्लीबोळात हिंडत व्हतो. हातात काठी व्हती. अंगावर भला मोठा अंगरखा, चड्डी नव्हतीच. मी चौथील गेल्यावर बानं मला चड्डी विकत घेतली. आता मी मोठा झालो व्हतो ना ? म्हणून आई मला पाट्या विकायला नेत नव्हती. नीट बोलत नव्हती. तू जा निरगुडीला, शाळा बुडवू नको म्हणून रागवत व्हती. तरी मी तिच्या मागं मागं हिंडत व्हतो. एक ठिकाणी माणसं जमली व्हती. मी तिकडं बगत व्हतो. आई दुसर्या बोळातनं पुढं गेली. मी पळायला लागलो. आणि काय सांगू सुप्रिया, कुत्र्यांनी अक्षरशः मला उताणा केला. हातातली काठी उडन गेली व्हती. कुत्र्यांनी पायाचा लचका घेतला व्हता. माणसं पळत आली. कुत्र्यांना हुसकावून लावलं. आई पळत आली. मी रक्तबंबाळ झालो व्हतो. आईनं केलेला आक्रोश आजही काळजाचा ठाव घेतो. तिनं पदरानं रक्त पुसलं. चुना लावला, रक्त थांबलं. सारे गावकरी मला एकट्याला सोडल्याबद्दल तिला नावं ठेवीत होते. तिनं मला एका घराच्या वसरीला बसवलं. 'उठू नको' म्हणून शिव्या देत बजावलं. डोक्यावर झाप, पाट्या घेतल्या आणि म्होरल्या आळीला गेली. माझ्या कानावर येत होतं, 'घेता का गं झाप, पाट्या, टोपल्या.' माझ्या पायाचं रक्त थांबलं होतं.
कुत्रं काही पहिल्यांदाच चावलं नव्हतं. मी उठलो आणि माणसं जमली व्हती तिथं गेलो. माणसं कुणाची तरी वाट बघत व्हती. कुणाची ते काही माहीत नव्हतं. थोड्या वेळानं एक गाडी आली. त्या गाडीत दोन-तीन बायका होत्या. दोन अगदी तरण्या. माझ्या आईच्या वयाच्या. एक होती त्या दोघींपेक्षा वयानं मोठी. साध्या, पण सुती साडीत ती बाई फारच छान दिसत व्हती. डोक्यावरला पदर अतिशय अदबीनं घेतला होता. कपाळावरचं कुंकू अतिशय ठसठशीत दिसत व्हतं. गळ्यातलं डोरलं, मणीमंगळसूत्र डोकावत व्हतं. पयात छान चपला व्हत्या. अतिशय सोज्वळ, शांत, घरंदाज चेहरा, अत्यंत बोलके डोळे, ओठांची हसरी ठेवण, थोडी आटोपशीर जिव्हणी, नाकात छानशी चमकी, नाक फार लांब नाही आणि फार आखूडही नाही अशी अत्यंत शालीन बाई गाडीतनं उतरली. तसं लोक घोषणा द्यायला लागले. 'यशवंतराव चव्हाणांचा विजय असो', 'वेणूताई चव्हाणांचा विजय असो.' मी गर्दीत पुढे सरकलो. बाईंनी घोषणा बंद करायला लावल्या. शांतपणे चालत एका घराच्या पडवीला बसल्या. तिथं हळदीकुंकू व्हतं. भराभर बाया-पुरुष जमले. गर्दी वाढू लागली. एक पुढारी भाषण करायला उभा राहिला. बाईंनी त्यालाही बोलू दिलं नाही. म्हणाल्या, 'मी काही पुढारीनाही. तुम्हाला भाषण ऐकायचं तर साहेबांचं ऐका. मी काही भाषण करीत नाही. आम्ही सार्याजणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू. पण एक निरोप सांगायला आलीय. म्हटलं तर साहेबांचा म्हणा किंवा माझाच प्रेमाचा आहे असं समजा. पंचायत समितीला निवडणुकीसाठी आपल्या पंचक्रोशीतला चांगला शिकलासवरलेला गरीब शेतकर्याचा पोरगा उभा राहिलाय. कृष्णचंद्र भोईटे. त्याला सर्वांनी मतं द्या. मोठ्या बहुमतानं निवडून यायला पाहिजे. मी कुणाचा प्रचार करत नाही. मी काही चांगलं भाषण करू शकणार नाही. पण माझा हा सांगावा सगळ्या मतदारांपर्यंत पोहोचवा. अडसूळअण्णा, तुम्ही आलं पाहिजे मला मुंबईला सांगायला, आपला कृष्णचंद्र निवडून आला...'
बाई बसूनच बोलत व्हत्या. गावकरी जिवाचं कान करून ऐकत व्हते. मला थोडं थोडं समजत व्हतं. बाईंनी चहा घेतला. हळदीकुंकू झालं. बाई उठल्या. सार्या बायांची रेटारेटी सुरू व्हती. जो तो म्हणत व्हता, वेणूताई कधी कुणाला मत द्या, असं सांगायला येणार्यातल्या नव्हत्या. त्या कधीही राजकारणात नसतात. भोईट्याचं भाग्य मोठं, ते निवडून आल्यातच हाय बगा. यशवंतरावांनी खेड्यापाड्यात पंचायतीचा धडाका उडवून दिलाय. आता मुंबईचं राज्य गावात आलं. लोकशाहीला कोंब फुटलं.
सुप्रिया, हे सारं चित्र आजही डोळ्यांपुढं आहे. फलटण आणि वेणूताई अशी फलटणची नवी ओळखं राज्यभर आणि देशभर झाली. चव्हाणसाहेबांची सासुरवाडी म्हणून आणि फलटणच्या मनमोहन राजवाड्यातली राजकीय खलबतं यासाठी फलटण प्रसिद्ध. मी वेणूताईंना पहिल्यांदा पाहिलं ते तरडगावांत. कुत्रं चावलं असताना. मात्र सारी टोपली विकून मला बसवलं होतं तिथं आई गेली तर मी गायब. ती मोठ्यानं रडत मला शोधत व्हती. मी गर्दीत तिला सापडत नव्हतो. ती फार कासावीस व्हती. मी तिला दिसलो. ती पळत आली. मला छातीशी कवटाळलं आणि रडायला लागली. बायाबापे आम्हांकडं कौतुकानं पाहत व्हती. ही सख्खी आई आणि पुढे जिनं माझ्यासारख्या लाखो पोरांवर प्रेम केलं, ती दुसरी आई मी पहिल्यांदा पाहिली. तरडगावच्या शेतकर्याच्या पोराच्या प्रचारात. तो पोरगा पुढे निवडून आला. पाच वर्ष तालुक्याचा सभापती झाला.
ती. सौ. वहिनींना, बाबांना सप्रेम जयभीम.
तुझा,
लक्ष्मणकाका