यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र १२-७८२०१२

पत्र - १२
दिनांक - ०७-०८-२०१२

चि.सुप्रिया,
सप्रेम जयभीम.

मागे एका पत्रात मी तुला, कोयनेची लाईट येणार तेव्हा शिवारात नव्यानं तारा ओढायचं काम कसं सुरू होतं त्याची हकिकत सांगितली आहे.  त्याकाळी फलटणला फक्त लाईट असावी.  माझ्या आठवणीप्रमाणे रात्रीच्या वेळेला फक्त फलटणच दिसायचं.  शहराचा पुंजका सोडला तर बाकी सारा भाग काळ्याकुट्ट अंधारात गुडूप झालेला असायचा.  काही कारणानं फलटणवरनं निघायला उशीर झाला म्हणजे लोक एक तर उघड्या मारुतीच्या मंदिरात झोपायचे किंवा एकाला दोघं असतील तर बोलत बोलत निघायचे.  फलटण निरगुडी तेव्हा गाडवाट व्हती.  झिरपवाडीच्या माळावर संस्थानचा सैतान बंगला व्हता.  त्या बंगल्यात भूतं राहतात असा आजही समज आहे.  तेव्हा तिथून भुताच्या पालख्या निघतात, अमावास्येला तर भुतांच्या पंगती बसतात अशा गोष्टी मोठी माणसं आम्हाला सांगत असत.  तानाजी रामोशी तर म्हणे एकदा त्यांच्या पालखीत सामील झाला.  दिवटी धरून चालत व्हता.  भुतं पंगतीला बसली.  ही पंगत कोणत्यातरी ओढ्याला बसली व्हती.  तानाजी रामोशी कशाला बी न घाबरणारा माणूस.  तो पंगतीला बसला.  तो हे सगळं सांगत व्हता, तवा बी आमची पाचावर धारण बसलेली.  जाम घाबरलो व्हतो.  तुला सांगतो, काळ्या रंगाचा तानाजी अंधारात भुतांच्या पंगतीत कसा दिसत असेल ?  त्याच्या आकडेबाज मिश्या, भलं मोठं पागोटं, अंगावरली घोंगडी, हातातली काठी, भुतांना दिसत नसंल का ?  मी विचारलं तसं म्हणाला, 'घोंगडीची खोळ पांघरली व्हती ना, मंग कसा दिसंल ?  त्यांचं पाय उलटं असत्यात.  म्हण म्या बी पायतान उलटी घातलीती.  बोलायचं न्हाय.  बोललं की खलास.  तिथल्या तिथं मरून पडणार.  बसलो जेवायला. लाडू आन् काय काय, नको म्हणायचं न्हाय.  वाढत्याल ते सारं घोंगडीच्या खोळीत भरत गेलो.  पंगती उठल्या. भुतं निघून गेली.  मी तिथंच बसलो व्हतो.  पहाटं झुंजमुंजू व्हताना उठलो.  तर घोंगडीतनं सारं दगाडं न गोटं.  लाडू कुठं गेलं कोणास ठाव ?  पण, तवापास्न ह्यो हात गेला त्यो गेलाच.'  अशा गोष्टी आम्हां पोरांना खूप आवडायच्या.  पण रस्त्यानं निघालो की त्या नजरंम्होरं यायच्या आन् मग काय ?  सुसाट पळत सुटायचं !!

मर सांगायचा मुद्दा काय, सारं अंधाराचं साम्राज्य.  त्यानं चोर्‍या, दरोडे, मोठ्या प्रमाणात व्हायचे.  रामोशी, कैकाडी, मांग- आमच्या गावात टोळ्या व्हत्या यांच्या.  दहशत बी मोठी व्हती.  तान्या रामोशी आता थकला व्हता.  त्याच्या तरुणपणच्या संस्थान काळातल्या गोष्टी तो सांगायचा.  'सांगून-सवरून, दवंडी देऊन तेव्हा दरोडे पडायचे.  पाचपन्नास तरुण पोरं एकत्र टोळी करायचे.  खडान्खडा माहिती काढायचे.  कोणत्या पाटलाचं वागणं गैर आहे,  कोणाकडं पैका आहे, याची माहिती घ्यायची.  त्या गावात दवंडी देऊन गावाला सावध करायचं !  'ह्या महिन्यात तुमच्या गावावर तान्याचं बंड पोचणार हाय.  गाव-कामगार-पाटलानं शहानं व्हायचं.  न्हायतर गावावर दरूडा पडंल याची नोंद घ्यावी हो...' म्हण दवंडी द्यायची.  अशी दवंडी झाल्यावर गावचा वतनदार पाटील तान्या रामोशाला शरण जायचा.  आसंल ती खंडणी द्यायचा.  नाही तोड निघाली तर दरोडा पडायचा.  पाटलाचा वाडा, श्रीमंतांची घरं लुटून टोळी पसार व्हायची. मुद्देमाल काही जावायचा न्हाय.  गरिबांना त्रास नव्हता.  गावात दरोडा आला तरी तो गरिबाघरी नसायचा.  गरिबांची सहानुभूती दरोडेखोरांना असायची.  गावचा रामोशीच माग काढायचा.  त्यानं टोळी घावायची न्हाय.  तान्या रामोश्याच्या टोळीत किसन नाईक नावाचा गोफण्या होता.  त्याला लोक 'गोफण्या किसन' म्हणून हाक मारायचे.  दिवसभर त्यो माळावर वड्याला बारक्या दगडांची शोधाशोध करायचा.  माळावर ढीग लावून ठेवायचा.  दरोड्याला निघताना समद्या गड्यांनी हे दगडाचं गोटं पाटकुळीवर घोंगड्याच्या खोळीला भरून घ्यायचं.  प्रत्येकाच्या कंबरंला गोफण असायची.  दरोडा घालायच्या जागेपास्नं तिकाटन्यावर गोफण्या किसन उभा राहायचा.  झोळीत गोटे असायचे.  दुसर्‍या वाटंनं दुसरा गडी, जेवढ्या वाटा तेवढं गडी गोफणी घिवून उभं राहायचं.  ह्या चौघांच्या जिवावर बाकीचे गडी वाड्यावर चढून जायाचे.  कानास कु होणार नाही, याची प्रत्येकजण काळजी घ्यायचा.  कुत्रीसुद्धा दरोड्यात सामील असायची.  एक गडी कुत्र्यामागं असायचा.  दिसला कुत्रा की, टाक बैलाचं हाडूक !  हाडूक चघळीत कुत्रं बसायचं गपचीप.  त्यातनं कुणी काळ्याकुट्ट अंधारातनं जाग झालंच, तर किसन गोफणीच्या दगडात येणार्‍याचं आकाळ फोडायचा.  जागेवरच गडी उताना.  आख्खं गाव आलं तरी गडी गोफण फिरवीत गाव आडवायचा.