यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ११-२६०७२०१२-१

सुप्रिया, या लोकांनी जाती तयार केली नसती, तर माणसांनी धान्य काय कडाकडा फोडून खाल्लं असतं ?  प्रत्येकाच्या दारात जातं होतं.  ते ज्याच्याकडे नाही, असा फक्त गुरव.  तो सोडला तर सारे पीठच खातात.  पण त्याची आठवण गावाला, गावकर्‍यांना कधीच होत नाही.  बांध घालणं, ताली बांधणं, तळी खोदणं, देऊळं-राऊळं बांधणं, मोठमोठे वाडे बांधणं, किल्ले बांधणं, याला लागणारे दगड घडवणं, माती भिजवणं, मातीचा काला करून माती कमावणं, गवतांच्या तसूच्या तसू महिनोन् महिने तुडवणं, त्याआधी माती बारीक करणं, ही सारी गावाची कामं, राजांची कामं.  नक्षीची कारागिरी करणारे वडारांचे अनेक प्रकार.  कैकाडी मातीची वाहतूक करत. वडार माती तयार करत.  मोठ्या कष्टाचं काम.  त्यांच्याही अनेक जाती आहेत.  बेलदार, गाडी वडार, माती वडार, पाथरूट, कैकाड्यांच्यात गावकैकाडी, चोर कैकाडी, माकडवाले, पामलोर, या उपजाती तर वडारांच्यातली संता मुचलर ही अगदी बारकी जमात चोर्‍या करणारी.  बाकी सारे काबाडकष्ट करणारे.  पण हे सारे चोरीसाठी बदनाम.  जाती, उखळ, पाटे, वरवंटे या वस्तू घरोघर जाऊन विकणं, बदल्यात धान्य गोळा करणं, गावात भाकरी मागणं, मागून खाणं, डुकरं पाळणं यातच त्यांचं उत्पन्न.  डुकरांचे केसही विकले जातात.  पावसाळ्यात पोटासाठी हे लोक चोर्‍या करतात.  मेंढरं, बकरी, कोंबड्या चोरणं, देव विकणं, कणगी फोडणं, घरफोडी करणं, हातोहात वस्तू लांबवणं यात कैकाडी माहीर.  ज्या घरात माणसं कमी असतात, त्या घराच्या परसदारात चारपाच कैकाडणी बसतात.  काहीजणी पुढल्या दारी खोटी भांडणं करून एकमेकाला रक्त निघेतोवर मारतात.  घरातली माणसं तंटा सोडवायला घराबाहेर गेली म्हणजे मागच्या दारी बसलेल्या आमच्या बाया आत शिरून हाती लागेल ते घेऊन पसार व्हतात.  काही कैकाडी माकडांचा खेळ करतात.  साळी, धनगर, कोष्टी, मोमीन यांना गवताच्या मुळापासून तयार केलेल्या कुंच्या बांधून विकतात.  बायकांना छान गोंदणं काढता येतात.  राजापासून रंकापर्यंत सर्व बायका त्या काळी गोंदून घेत असत.  आपला बाप किंवा नवरा हातावर गोंदून घेणं, कपाळावर टिकली गोंदून घेणं, हातावर साप गोंदून घेणं ही त्या काळी बायकांमध्ये मोठी वहिवाट होती.  समाजाची केवढी सेवा ही माणसं करत होती.  पण गाव कायम त्यांना गावाबाहेरच्या माळावर, हागणदारीत ठेवत होतं.

असंच एक आणखी दुसरं बिर्‍हाड माझ्या लक्षात राहिलं ते वैदूंचं.  वैदू ही अशीच शिकार करत हिंडणारी जमात.  रानूमाळ हिंडून, जंगम पायाखाली घालून झाडपाल्याची औषधं शोधत असत.  जंगली जनावरांच्या शिकारी करत.  त्या जनावरांच्या रक्त, मांस, हाडे, कातडी यापासून कितीतरी औषधं आणि त्यांचे औषधी गुण परंपरेनं त्यांना अवगत असत.  ते कधी एकटेदुकटे राहत नाहीत.  चांगली शंभर दोनशे माणसं, शेकडो कुत्री, शेकडो गाढवं एकत्र हिंडत असत.  उसाच्या फडातून ससे, कोल्हे, रानमांजरं यांच्या शिकारी, खोकडांच्या शिकारी, खोलखोल पाण्यातल्या मगरी मोठ्या खुबीनं हे वैदू पकडत असतात. गाढवं, कोंबड्या, शेळ्या आणि कुत्री ही या जमातीची संपत्ती.  ज्याच्याकडे कुत्री जास्त तो श्रीमंत.  त्याच्याकडे हक्कानं मुलगी देणार.  ज्याच्याकडे कुत्री नाहीत, तो श्रीमंत असला तरी त्याच्या घरी मुलगी देणार नाहीत.  जो कुत्र्याला खाऊ घालत नाही, तो माझ्या लेकीला काय खायला घालील,  असा त्यामागे विचार.

यांच्या पंचायती आजही चालू आहेत.  कोणाच्या घरी साप निघाला, तर पायलीभर दाणे घेऊन ते साप पकडून देतात.  पुरुष-बाईचं औषध, वाताचं औषध, आसं म्हणत गावोगाव हिंडतात.  पुरुष तुंबड्या काढण्यात तरबेज असतात.  स्त्रिया शीलवान असून पातिव्रत्याचं पालन कसोशीनं करतात.  सुया, दोरं, मणी, पोत, दाभण, पोरांच्या मनगट्या, वाळे, बायांच्या कानातली फुलं, रिबीनी, रांगोळ्या विकतात.  धान्य, भाकरी भीक मागून आणतात.  सर्व घरदार भीक मागतं.  ताज्या भाकरी स्वतःसाठी ठेवतात.  शिळ्या भाकरी, अगदी भुरा आलेल्या भाकरीही झोळीत घेतात.  त्या कुत्र्यांसाठी.  वैदूंच्या दोन जाती,  एक संचिवाले वैदू आणि दुसरे झोळीवाले वैदू.

सांगत होतो ते राहिलंच बघ बाजूला.  तर सुप्रिया, एव्हाना तुझ्या लक्षात आलं असेल, मी असा का आहे.  चौथीपर्यंत मला शिकायचं नव्हतं.  माझं फिरस्त्यांचं मस्त मौजेचं आयुष्य होतं.  अठरापगड जातींची आम्ही पोरं माळावर गाढवं राखत सुखात होतो.  बाच्या डोक्यात मात्र मला शाळेत घालायचं, शिकवायचं खूळ होतं.  दररोज फोकांचा वळ उठेपर्यंत मी शाळेत जात नव्हतो.  चौथीपासून उलटं झालं.  मला शिकायचं होत आणि बाला फोका, पाट्या वळण्यात, विकण्यात मला घालायचं होतं.  सुप्रिया, माझी आई फार कर्तबगार.  तिनंच खरं तर मला घडवलं.  ती अतिशय सुंदर आवाजात गायची.  बायांबरोबर फेर धरून नाचायची.  आम्ही आठ भावंडं.  सगळ्यांना गरिबीतही तिनं मायेनं वाढवलं.  मी तिच्या हाताला धरून पाट्या, टोपली विकायला जायचो.  तुमच्या पवारांच्या मळ्यातही यायचो.  मेडदला माझे मामा राहायचे तर काट्याची वाडी माझं आजोळ. अगदी लहान असताना आई मला घेऊन वाड्यावस्त्यांवर पाट्या टोपली विकायची.  सर्वत्र मागून आणलेल्या भाकर्‍या.  तुझ्या आजीच्या, बाईंच्या वसरीला बसून आम्ही जेवायचो.  त्या आईला आनवरी म्हणून हाक मारत.  घरातल्या भाकर्‍या, ताक आणि शेवग्याच्या शेंगाचं पिठलं किंवा शेवग्याच्या शेंगाची आमटी देत असत.  आजही मी तुझ्या मळ्यात गेलो ना तर मला दिसतात त्या बाई आणि त्यांनी तेव्हा वाढलेल्या शेवग्याच्या शेंगा.