यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ११-२६०७२०१२

पत्र-११
दिनांक - २६-०७-२०१२

चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.

आमची बिर्‍हाडं तेव्हा बडेखानाच्या माळावर उतरली व्हती.  या माळावर चिटपाखरू राहत नव्हतं.  माणसांची वस्ती नव्हती.  मात्र माळ अठरापगड जातींच्या माणसांनी फुलून गेला व्हता.  ज्वारीच्या काढण्या सुरू झाल्या ना, की बिनभिकाराला ऊत आलेला असायचा.  बडेखान म्हंजी अगदी मनातल्या वार्‍यानं बेभान झालेल्या वारुचा माळ.  चारी वाटांचा मेळ-साखरवाडी, सुरवडी, काळज, हिंगणगाव, तरडगाव, आदर्की, लोणंदपर्यंत पाट्या विकायला जाता यायचं.  पाचदहा कैकाड्यांची बिर्‍हाडं.  रस्त्याच्या कडेला झाडाखाली उतारलेली.  घाणेरीच्या फोका काळजच्या ओढ्याला खच्चून भरलेल्या.  त्यानं सारे कैकाडी खूश.  तुला गंमत सांगू, आमच्यात बी इनाम असत्यात.  इनाम काय फक्त पाटलानाच असतात ?  आमची इनामं म्हणजे भीक मागण्यासाठी पाट्या, टोपल्या विकण्यासाठी एकाएका कुटुंबाला दिलेली गावं.  ते त्याचं इनाम.  त्यात दुसरा कैकाडी जात नाही.  आणि गेला तर पंचायतीत कज्जा जातो.  इनामदार भटके म्हंजे परंपरेनं नियमित वेळेला नियमित वेळी ठरलेल्याच गावाला जातात.  ठरलेल्या गावी आपला माल विकून, काम करून कमाई करतात.  ते त्या गावचे इनामदार.  आता तुझ्या लक्षात येईल, आमची आडनावं मराठे असलेल्या गावच्या इनामदारासारखी का असतात ते.

अशा रीतीनं जे बिनपावसाच्या काळात, सुगीच्या दिवसांत अनेक गावी नियमित जातात आणि पावसाळ्यात त्या गावी स्थायिक झाले असतील ते मिळेत तो काम धंदा करून राहतात.  त्यांना 'फिरस्ते' असं म्हणतात आन् जे फिरस्ते किंवा भटके नेमलेल्या गावी वहिवाटीप्रमाणे न राहता वाटेल तिथे भटकतात त्यांना 'उपलाने' किंवा 'उपरे' म्हणतात.  भटक्यांचे असे दोन प्रकार पडतात.  तिसरा प्रकार आहे तो गुन्हेगार जमातींचा.  ते पोटासाठी चोर्‍यामार्‍या करतात.  तर, बडेखानाच्या माळावर आम्ही उतरलो होतो.  सारा माळ बिर्‍हाडांनी भरून गेलाता.  घिसाडी, बेलदार, वडार, कैकाडी, लमान, नेवाती, वैदू, गोंड, मांगगारूडी, भिल्ल, गोपाळ, कोल्हाटी, हरदास, दरवेशी, बंदरवाले मुसलमान, गारुडी, माकडवाले, कंजारभाट, नंदीबैलवाले, तिरमल, चित्रकथी, फोसपारधी, बहुरूपी, रायरंद, भोपे, भगत, आराधी, वाघे, मुरळ्या, जोगती, हिजडे, जोगतिनी, कानकाडणी, भराडी, वासुदेव, पांगूळ, गुरू बाळसंतोषी, राऊळ, मेढगी (आपल्या बारामती तालुक्यात यांची संख्या मेडद, माळेगाव, जळोची या गावी मोठ्या संख्येनं आहे.)  ठोके जोशी, कुडमुडे जोशी, पोतराज, कानफाटे, गोसावी, उदाशी, अंधोरी आंधळेपांगळे, नाथपंथी डवरी गोसावी, वारकरी, कबीरपंथी, संन्याशी, घरभारी, तीर्थयात्रा करणारे काशी कापडी, नाना तर्‍हेचे गोसावी, बैरागी, जातीजातीचे गुरू व मागते.  मानभाव, नानक, फकीर शिद्धी, इराणी, बलुची, अफगाणी, मरीआईवाले, मसणजोगी असे शेकडो जमातींचे वेगवेगळ्या वेशातले लोक.  वेगवेगळ्या भाषा बोलणारे, चालीरितीनं भिन्न भिन्न; पण तीन दगडांच्या चुलीवर शिजवून खाणारे लोक.  काही जाती गाढवं पाळणार्‍या, त्यांचं गोत्र गाढव, म्हणून ते गाढव गोती.

जातवार, जातीच्या लोकांची बिर्‍हाडं एकत्र लावत असत.  आमच्या बिर्‍हाडाशेजारी मात्र दोन घिसाड्यांची बिर्‍हाडं व्हती.  ते आमच्यासारखे उघड्यावर राहत नव्हते.  त्यांची बिर्‍हाडे बारदान्याची व्हती.  दोन लाकडं उभी मेढ्यासारखी एकामागे एक ठोकलेली, त्यावर आडवं लाकूड बांधलेलं आणि त्यावर वढून बारदान बांधीत.  चारी कोपर्‍यांना चार लोखंडी मेका ठोकून त्याला खाली ओढून बारदान बांधलेलं असे.  त्यानं त्यांची दोन्ही पालं खूप छान दिसत.  त्यांच्याकडेही पाचसात गाढवं, एकदोन खाट म्हशी होत्या.  त्यांची गाढवांची पारख फार चांगली असते.  उंच काठेवाडी गाढवं यांच्याकडे असतात.  ती फार उठून दिसत. अतिशय देखणी असतात गाढवं.  बकरी, कोंबड्या, कुत्री म्हंजे यांचा संसार.  नांगराचा फाळ, कुर्‍हाडी, कुदळी, वसू, खुरपी, ऐरण, धाबा, सुळे, पळ्या विहे, वायकांडे शिळ्यांचे खुळखुळे, सुकल्या, खोरी, टिकाव, बैलगाडीच्या चाकाच्या धावा, कोयते असे.  शेतकर्‍याला लागणारे हरप्रकारचे जिन्नस हे तयार करतात.  यांच्या पालाच्या पुढच्या भागात भाता लावलेला असतो.  भात्यावर कोळशाचा बारकासा ढीग घालायचा.  भात्याची काठी दोरीनं ओढत कोळसा चिंधीनं पेटवला जायचा.  जाळ सुरू झाला की, लोखंडी काम सुरू व्हायचं.  भाता फुकत भला मोठा घण घेऊन पुरुषासारखं कंबरेला पिळोखे घालीत गरागरा फिरवीत बायका घण मारीत.  लालबंद लोखंड आकार बदलायचं.  घिसाडी मोठ्या खुशीत ऐरणीवर तापलेलं लोखंड फिरवीत राही.  त्याला पाहिजे तो आकार देऊन नव्या नव्या वस्तू त्यातून ते तयार करत.  हा नवनिर्मितीचा उद्योग त्यांच्या पालापुढे तासन् तास बसून मी पाहत राही.  आमच्या बिराडाच्या दुसर्‍या बाजूला पंधरा वीस माती वडारांची बिर्‍हाडं व्हती.  प्रत्येकाकडं शेळ्या,कोंबड्या, गाढवं, कुत्री आणि डुकरे असतात.  वडार, कैकाडी एकत्र राहतात.  कारण ते दोघंही डुकरं पाळतात आणि डुकरं खातात.  मोठी कष्टाळू जमात.  विहिरी खणणं, घरं बांधणं, पार बांधणं, बांधबंदिस्ती करणं, गाढवांच्या पाठीवरून मातीची वाहतूक करणं, वाळूची वाहतूक करणं, दगड काढणं-फोडणं, दगड घडवणं, मूर्ती करणं, जाती-पाटे-वरवंटे-उखळी तयार करणं. जाती उखटणं, चौरंग तयार करणं, विकरणं, बाया-पुरुष मिळून गावांत हिंडून जाती उखटून देतात.