यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र १२-७८२०१२-३

सुप्रिया, ही क्रांती व्हती आणि ती यशवंतरावांनी केली होती.  स्वराज्य आलं, ते माझं आहे ही जाणीव प्रत्येकाला व्हत व्हती.  सगळ्या जातीधर्मातल्या पोरांना शाळंत घालायला पाहिजे, हे कळालं.  शाळंचं नांव बदललं.  आता नवा बोर्ड शाळांवर लागला.  'जीवन शिक्षण मंदिर'.  आता कोणाचंही पोरगं शाळेबाहेर वरांड्यावर बसणार नाही.  शिवताशिवत, माणसांना माणसांचा विटाळ व्हता तो कायद्यानं गेला.  आता कुणी उच्च नाही, कुणी नीच नाही.  कुणी खालचा नाही, कुणी वरचा नाही.  सारं वातावरण स्वप्नवत.  आडावरचं पाणी मागून घ्यायचं, हिरीला शिवायचं नाही, सावली सुद्धा पडू द्यायची नाही.... बाटाबाट झाली की मरणाचा मार, शिव्या, 'भाड्याहो पायरीनं र्‍हावा' हे वाक्य तुझ्या पिढीला ऐकायलाही येत नाही.  त्याचं कारण स्वातंत्र्य मिळालं.  स्वराज्य आलं. बाबासाहेबांनी एका कलमात सारी माणसं एका रांगेत बसवली.  हा सारा काळ तुला सांगतो, मंतरलेला काळ होता.  हजारो वर्षांच्या रूढी, परंपरा, खुळचट कल्पना, अंधश्रद्धा मोडू लागल्या. गावागावांत हे चित्र निर्माण झालं.  एकट्या यशवंतरावांनी हे केलं, असं मी म्हणत नाही.  भारतानं जे संविधान स्वीकारलं, त्याला याचं श्रेय आहेच.  यशवंतरावांना ते राबवण्याचं आहे.

.....आज सांच्यापारी येरवाळीच सारं गाव रानातनं गावात यायला लागलं.  येरवी तिन्हीसांजला येणारं गाव येरवाळी गावात येत व्हतं.  ज्याला-त्याला ओढ लागली व्हती ती लाईटीची.  दिस मावळतीला गेला.  दिवसाची कोवळी उन्हं पाटलांच्या वाड्याच्या चिरेबंदी कळसावर चमकू लागली.  किलबिलाट करत पिंपळावर, लिंबावर, वडावर थवंच्या थवं येऊन बसू लागलं.  बगळ्यांच्या माळा तोरणासारख्या महादेवाच्या देवळावरल्या वेलावर बसू लागल्या.  गाई, गुरं हंबरत रानातनं येऊ लागली.  त्यांच्या  पायांचा फुफाटा पावडर मारावी तसा धुरळा उडवीत वाडग्यात, गोठ्यात जावू लागलं.  प्रत्येकजण रोजची कामं करत व्हता, पण प्रत्येकजण कडूस पडायची वाट बगीत व्हता.  आजपास्नं गज्या म्हाराला चौकाचौकातलं, खांबावरलं कंदील लावायला लागणार नव्हतं.  आता त्याला दवंडी द्यावी लागणार नव्हती.  तान्या नाईकाला गावची राकान करायची नव्हती.  हजारो वर्षांची गुलामी संपणार व्हती.  वतनं गेली, गुलामी गेली, गुलामीचा अंधार व्हटणार व्हता.  बापे सारे चावडीवर शाळंम्होरं जमू लागले.  बाया, पोरी महादेवाच्या देवळाम्होरं, भेरूबाच्या देवळाम्होरं येताळाच्या  पटांगणात आल्या.  आळ्यातल्या बाया जमून फेर धरून नाचायला लागल्या.  आम्ही पोरं हुंदडत गावभर नुसतं धिंगाणा घालीत पळत व्हतो.  घराघरावर पाडव्याला लागतात तशा गुढ्या उभ्या राहिल्या व्हत्या.  दिवाळी साजरी व्हावी, तसं गावं आनंदात बुडालं व्हतं.  मानसिंग सस्ते, नरसिंगराव सस्ते, रामभाव सस्ते, गावाची कर्ती माणसं जमलीती.  नरसिंग गुरुजी जरा बोबडे बोलत.  ते तसे तालुक्यातले मोठे पुढारी.  त्यांनी सभा सुरू केली.  अंधार पडू लागला आणि गावचे सरपंच मानसिंगराव सस्ते यांनी खटका वडला.  सारा गाव लखलखीत लाईटींनी चमकू लागला !  ज्यो त्यो नाचत होता.  'म.गांधी की जय', 'जवाहरलाल नेहरू की जय', 'यशवंतराव चव्हाण की जय' अशा घोषणा चालू झाल्या.  गावभर मिरवणूक निघाली.  प्रत्येकाच्या अंगणात उजेड पडला व्हता.  सारं गाव त्यात न्हालं व्हतं.  क्षीण आवाजात 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय' आसं बी कुणी कुणी म्हणत व्हता.  हाळूहाळू 'गाव तिथं लाईट' गेली.  यशवंतरावांनी खुद्द अंधार पाहिला आन् ते उजेडातही न्हाऊन निघाले.  सारी रात्र बायापोरं, म्हातारेकोतारे, पोरंबाळं कुणी बी झोपलं नाही.  रात्रभर चौकाचौकांत बसून स्वराज्य, गांधी, नेहरू, आंबेडकर, यशवंतरावांचं गुण गाईत व्हते. दिवसरात्र धिंगाणा करून मी कवा झोपलो ते कळलंच नाही.

सुप्रिया, यशवंतराव नुसता माणूस नव्हता.  तो एक विचार व्हता.  एक आचार व्हता.  प्रगतीची स्वप्न बघणारा महाराष्ट्राचा कर्ता पुरुष व्हता.

ती. सौ. वहिनींना, बाबांना सप्रेम जयभीम.

तुझा,
लक्ष्मणकाका