सह्याद्रीचे वारे - १३१

समाजवादाचा आमचा मार्ग

आमच्या राज्याचें अधिकृत धोरण समाजवादी आहे. म्हणून समाजवाद हा शब्द आम्ही हेतुपुरस्सर वापरतों. परंतु समाजवादाबद्दल आही बोलावयास लागल्यानंतर कांहीं माणसांना अगदीं अवघडल्यासारखें वाटूं लागलें. त्यांना असें वाटूं लागलें कीं हे लोक समाजवादाबद्दल बोलावयास लागले तर आमचें सगळें संपलेंच; आम्ही मग काय बोलावयाचें ? परंतु मी त्यांना सांगूं इच्छितों कीं त्यांचा समाजवाद वेगळा आहे आणि आमचा समाजवाद वेगळा आहे. आम्ही जो समाजवाद मानतों तो त्यांच्या समाजवादासारखा नाहीं. ते म्हणतात, त्यांचा समाजवाद खरा आहे. त्यांचा समाजवाद त्यांना लखलाभ होवो.

समाजवादाची आमची जी कल्पना आहे ती मी येथें मांडतों. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही लोक ग्रंथनिष्ठ नाहीं. मार्क्सनें सांगितलेलें सगळें खरें आहे असें आम्ही मानीत नाहीं. ग्रंथांत सांगितललेलें सगळेंच खरें नसतें असें स्वतः मार्क्सनेंच सांगितलें आहे. मीं मार्क्स थोडाफार वाचला आहे. मी त्यांतील तज्ज्ञ आहें असें मी म्हणत नाहीं. पण असें एक वय असतें कीं ज्या वेळीं मनुष्य असें ग्रंथ वाचतोच. त्याप्रमाणें मी देखील मार्क्स वाचण्याचा प्रयत्न केला, समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचे कांहीं दृष्टिकोन बरोबर असून त्यांच्याकडे कोणता आधुनिक माणूस दुर्लक्ष करूं शकेल ? पण तत्त्व म्हणून त्यानें सांगितलेली समाजवादाची कल्पना सगळीच खरी आहे असें म्हणतां येणार नाहीं. मार्क्सिझमची आमची कल्पना तशा त-हेची नाहीं. समाजवादाची माझी कल्पना मार्क्सनें सांगितलेल्या तराजूवर जोखून घेणारा मी नाहीं. हिंदुस्तानांतील समाजवादाची कल्पना हिंदुस्तानांतील जनतेच्या विशिष्ट अनुभवावरच आधारावी लागेल. आर्थिक विकास आणि आर्थिक परिवर्तन यांची अत्यंत वेगवान प्रक्रिया येथें सुरू झाली असतांना, दुनियेच्या इतिहासामध्यें अशाच परिस्थितींत इतर लोकांना जे धडे शिकावे लागले त्यांची पुनरावृत्ति आम्ही येथें करूं इच्छित नाहीं.

आमच्या देशांत अर्थरचनेची, आर्थिक शक्तीची जी एक नवीन वेगवान गति सुरू झाली आहे तिला, इतर देशांना अशा परिस्थितींत शिकावा लागलेला अनुभव लक्षांत घेऊन आमच्या देशाच्या विशिष्ट परिस्थितीला अनुरूप अशा पद्धतीचें वळण आम्ही देणार आहोंत. आमच्या या सगळ्या प्रयत्नांच्या पाठीमागें, खाजगी नफ्याच्या जागीं सामाजिक नफ्याचा पाया अधिक घट्ट करण्याचा आमचा खरा उद्देश आहे. यासाठीं दोन गोष्टींची आवश्यकता आहे. पहिली गोष्ट म्हणजे भिन्न भिन्न व्यक्तींच्या आर्थिक परिस्थितीमध्यें आज जी मोठी दरी आहे ती जास्तींत जास्त कमी करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. तो प्रयत्न कसा करावयाचा हा अर्थात् स्वतंत्र प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समाजांतील सर्व वर्गांना एक प्रकारची, एकसारखी आणि समान त-हेची संधि मिळेल अशा प्रकारची, परिस्थिति निर्माण झाली पाहिजे. समाजवादी जीवनाकडे घेऊन जाणारे हे दोन मार्ग आहेत. कोठलीहि एक व्यक्ति किंवा व्यक्तींचा समूह अथवा गट अगर वर्ग दुस-याची पिळवणूक करीत नाहीं अशा प्रकारचें समाजवादाचें चित्र मी पाहत असतों.  घोडेस्वारासारखा, एक दुस-याच्या पाठीवर बसला आहे, अशी परिस्थिति ज्यांत नाहीं, अशा त-हेचें आर्थिक समतेवर आधारलेलें समाजवादाचें चित्र माझ्यासमोर आहे. तें चित्र केव्हां येईल, कोणत्या परिस्थितींत येईल, कोणत्या मार्गानें येईल हा दैनंदिन प्रयत्नांचा, अनुभवांचा प्रश्न आहे. अमुकच मार्गानें तें येईल किंवा त्यांने आलें पाहिजे असा आग्रह धरणारा मी नाहीं. कारण इतिहास हा आंधळा पीर नाहीं. कोणींतरी सांगितलेल्या ठराविक मार्गानेंच तो जात नसतो. घाण्याचा बैल जसा ठराविक मार्गानेंच घाण्याभोवतीं फिरतो, तसा मार्ग इतिहासाचा नाहीं. इतिहासाची स्वतःची अशी स्वतंत्र प्रकिया असते आणि त्यानुसार त्याचा प्रवास चाललेला असतो. म्हणून मार्क्सनें सांगितला आहे तेवढाच समाजवाद आहे अशी माझी कल्पना नाहीं. आमचा समाजवाद हिंदुस्तानच्या विशिष्ट अनुभूतींतून निर्माण झालेला, ऐतिहासिक परिस्थितींतून घेतलेला आणि लोकशाही मूल्यांवर आधारलेला असा समाजवाद आहे. पण समाजवादाचा म्हणून जो उल्लेख करतों तो निवडणुकीच्या दृष्टीनें करीत नाहीं, ही गोष्ट मी स्पष्ट करूं इच्छितों. कारण निवडणूक एवढ्याच एका गोष्टीवरून जिंकली जाणार नाहीं याची आम्हांला कल्पना आहे, विरोधी पक्षालाहि ती असावी. आम्ही काय बोलतों हें महाराष्ट्रांतील जनतेला चांगलें समजतें. महाराष्ट्रांतील जनता शहाणी आहे. आम्हांला महाराष्ट्रांतील जनतेनें कधी शिव्या दिल्या तरी आमचीं धोरणें काय आहेत हें आपल्या बुद्धीच्या कसोटीवर घासून पाहण्याइतकी ती शहाणी आहे. परिपक्व आहे. तिला फसविण्याचा प्रयत्न करण्याची आमची इच्छा नाहीं, तशी तिची फसवणूक आम्ही करूंहि शकणार नाहीं. जनतेवर आमची पूर्ण श्रद्धा असून ती योग्य तोच निकाल देईल असा आमचा पूर्ण विश्वास आहे.