या वयात भरपूर वेळ मिळत असतो; पण तो वेळ आपण कारणी लावतो का? पत्ते, क्लब, गप्पा, झोप यांतच बराचसा वेळ जातो. मनाला उगीचच थकल्यासारखं वाटत राहतं. कंटाळा, दमल्याची भावना, अशक्तपणा, किरकोळ आजार यांचं कौतुक करता-करता वर्षामागं वर्ष निघून जातात.
हा रूक्षपणा घालविण्यासाठी मिळत असलेला वेळ आणि स्वास्थ्य यांचा चाळिशीच्या उंबरठ्यावर आलेल्या व्यक्तीनं फायदा करून घ्यायला हवा. त्याला घरापासूनच सुरुवात करता येईल. नव्या-जुन्या पिढींतलं अंतर तुम्ही घरातच नाहीसं करण्याचा प्रयत्न केलात, तर घर आहे त्यापेक्षा कितीतरी आनंदी, समाधानी दिसू लागेल आणि म्हातारपणी तुम्हांला समजून घेण्याचीही वृत्ती मुलांमध्ये निर्माण होईल.
पण तुमचं घर म्हणजे संपूर्ण जग नव्हे, हेही तुम्ही जाणून घ्यायला हवं. ते तुम्हांला आता या चाळिशीत जाणवलं नाही, तर पुढं कळूनही वळणार नाही. म्हातारपणी एकाकी पडू नये, असं वाटत असेल, तर समाजात मिसळण्याची सवय आतापासून अंगी बाळगायला हवी.
आपणही समाजाचे घटक आहोत. समाजाचं आपल्यावर ॠण आहे, ही भावना मनात आणली, तर तुम्हांला या समाजासाठी कितीतरी गोष्टी करता येतील. समाजॠण हे केवळ पैसा देऊनच फेडायला लागतं, असं नाही, तर काही प्रेमाचे शब्द, आपुलकीची भावना, थोडे-फार कष्ट आणि याबरोबरच समाजाविषयीची तळमळ असली, तरी कितीतरी कामं करता येणं सहज शक्य आहे.
तेव्हा या वयात आपण आपल्या कुटुंबाचा दीपस्तंभ तर बनायला हवंच, पण त्याच वेळी समाजासाठीही आपल्या आयुष्यातला काही काळ द्यायला हवा, विशेषतः, आर्थिक दृष्टीनं कमकुवत असलेल्या समाजासाठी, अपंगांसाठी, अशिक्षितांसाठी आपल्याला घरबसल्या कितीतरी गोष्टी करता येतील, या करण्यातूनच पुढं मोठ्या संस्था उभ्या राहत असतात. चळवळी फोफावतात, सामाजिक बदल दृष्टिपथात येतात. बाबा आमट्यांची कुष्ठरोग्यांची संस्था, अनाथ बालगुन्हेगारांसाठी चालविलेल्या महाराष्ट्रातल्या शेकडो संस्था, मूकबधिर, अंध, मतिमंद पंगू मुलांसाठी उभ्या केलेल्या संस्था - किती म्हणून उदाहरणं द्यावीत ! अशिक्षित, आदिवासी दलितांसाठी उभ्या केलेल्या चळवळीही काही कमी नाहीत. ज्यांच्यासाठी या संस्था उभ्या केल्या, ती माणसं संस्था उभारणार्यांची कोणी नातेवाईक होती का? कोणीही नव्हती. रक्ताची नाती नव्हती - पण माणुसकीची नाती होती! या संस्थेच्या पायाचा दगड असणारी मंडळीही तशी कोणी श्रीमंत, राजकारणी होती का? नाही. सर्वसाधारण माणसं, श्रीमंती त्यांच्या विचारात आणि कर्तृत्वात होती. म्हणूनच त्या त्या व्यक्ती म्हणजे संस्था झाल्या.
आपल्या भारतीय संस्कृतीत मातृॠण पितृॠण हा अत्यंत उच्चकोटीचा संकेत आहे. ज्यांनी जन्म दिला, ज्यांनी वाढवलं, लहानाचं मोठं केलं, जगात राहायला, चालायला, संकट झेलायला शिकवलं, त्या आईवडिलांचं ॠण आपण मानतो. आपण कितीही मोठे झालो, तरी आईवडिलांना आपण लहानच असतो. ते आपल्यावर सतत प्रेमाचाच वर्षाव करतात. त्यांच्यासाठी आपण काही करणं हे आपलं कर्तव्य असतं, प्रेमापोटी आपण ते करतो.
समाजॠणाचंही तसंच असतं, आपल्याला जरी वाटत असलं की, समाजानं आपल्याला काहीही दिलं नाही, तरी ते तसं नसतं, आईवडील संस्कार देतात. समाज संस्कृती देतो. आईवडील प्रेम देतात. मायेची पाखर घालतात. समाज आपल्याला सामाजिक रूप देतो. बरे-वाईट अनुभव देतो. त्या समाजाचं आपण ॠणी असायला हवं.