६७
लोकशाहीतील प्रशासन
राज्यशास्त्र व प्रशासन ह्या दोन्हींचा एकमेकांशी फार निकटचा संबंध आहे. राज्यशास्त्राचा मी विद्यार्थी होतो व अद्यापही आहे आणि प्रशासनाचा मी अभ्यास केला नसता, तरी गेल्या काही वर्षांपासून प्रत्यक्ष प्रशासनाच्या क्षेत्रात मी काम करीत आहे. लोकशाहीतील प्रशासनासंबंधी जेव्हा आपण बोलतो, त्या वेळी त्यासंबंधीच्या आपल्या कल्पना स्पष्ट असणे जरुरीचे आहे, असे मला वाटते. लोकशाहीची कल्पना हीच मुळी बदलत जाणारी कल्पना असून, तशी ती असणे अगदी स्वाभाविक आहे. लोकशाही हा शब्द शेकडो वर्षांपूर्वी ज्या मानवाने प्रथम उच्चारला, त्याने कोणत्या अर्थाने तो उच्चारला असेल, हे नक्की सांगता येणे आज अशक्य आहे. परंतु लोकांशी ज्याचा प्रत्यही संबंध येतो व जे जनमनाचे प्रतिनिधित्व करते, असे शासनाचे तंत्र म्हणजे लोकशाही, अशी लोकशाहीसंबंधी एक कल्पना पूर्वी सर्वत्र प्रचलित होती. तथापि, इतिहासाच्या ओघात लोकांच्या विचारात परिवर्तन झाले. त्याच्या सभोवतीची परिस्थिती बदलली, त्यांच्यापुढील प्रश्न बदलले आणि त्यांच्यांतील संबंधात देखील बदल घडून आला. त्यामुळे त्यांच्या राजकीय कल्पनांत उत्क्रांती होऊन लोकशाहीबद्दलच्या त्यांच्या कल्पना साहजिकपणेच बदलत गेल्या. आपण जेव्हा एखाद्या सामाजिक शास्त्राचा विचार करू लागतो, तेव्हा आपण बदलत्या जगात राहत आहोत व सामाजिक जीवन परिवर्तनशील आहे, हे सत्य आपल्याला लक्षात घ्यावे लागते. ह्या परिवर्तनाच्या बरोबरीने त्या सामाजिक शास्त्राने आपली पावले टाकली पाहिजेत, हे ओघानेच आले. राज्यशास्त्र हेही एक सामाजिक शास्त्र असल्यामुळे निरनिराळ्या काळी आणि निरनिराळ्या देशांत लोकशाहीची कल्पना निरनिराळी असावी, यात आश्चर्य नाही. आपल्या देशात आपण ज्या संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला आहे, ती सुद्धा लोकशाहीची एक विशिष्ट पद्धत असून, तिचेही स्वरूप पुढे हेच राहील, अशी खात्री मी तरी देऊ शकणार नाही. कारण भविष्यातील बदलत्या परिस्थितीत तिचे स्वरूप हेच राहिले, तर तिचे प्रातिनिधिक स्वरूप नष्ट होऊन भावी पिढ्यांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब तिच्यात पडू शकणार नाही.
लोकांचे, लोकांसाठी आणि लोकांनी चालविलेले शासन म्हणजे लोकशाही असे लोकशाहीचे वर्णन करता येते. परंतु ही औपचारिक स्वरूपाची व्याख्या आहे. कारण या व्याख्येवरून लोकशाही सरकारच्या कार्यपद्धतीचा नक्की बोध होत नाही. माझ्यापुरते मी असे म्हणेन की, प्रशासनातील लोकशाही म्हणजे एकमेकांच्या सतत विचारविनिमयाने चालणारा राज्यकारभार होय. कोणत्याही प्रकारचा साचेबंद दृष्टिकोन न ठेवता लोकांचे प्रतिनिधी एकत्र येऊन जेथे विचारविनिमय करतात, अशा शासनाच्या पद्धतीला मी लोकशाही म्हणतो. लोकशाहीत जनतेच्या मूलभूत प्रश्नांसंबधी एकवाक्यता व्हावी व ते सोडविले जावेत, म्हणून चर्चा करून मार्ग काढण्याचा लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत असतात. पण लोकशाहीच्या ह्या किंवा आताच मी उल्लेख केलेल्या दुस-या व्याख्येत, शासन आणि प्रशासन यांचाच विचार प्रामुख्याने आहे, असे आपणांस आढळून येईल. परंतु लोकशाहीचे तत्त्व ज्या वेळी आपण मान्य करतो, तेव्हा आपण शासनाचे फक्त बाह्य स्वरूपच मान्य करतो, असे मला वाटत नाही. लोकशाहीचा अर्थ, केवळ एक शासनाचा प्रकार, असा होत असेल, तर अशा लोकशाहीसंबंधी मला बिलकूल आकर्षण वाटणार नाही.
या प्रश्नाचा अधिक खोल विचार करण्यापूर्वी शासन आणि प्रशासन या दोन निराळ्या गोष्टी आहेत, हे प्रथम समजून घेणे आवश्यक आहे. एखादी व्यक्ती यशस्वी प्रशासक आहे, असे म्हटले जाते, तेव्हा शासन म्हणून जी कल्पना आहे, ती डोळ्यांपुढे उभी राहत नाही. प्रशासन म्हणजे राज्यकारभार, ही शासनाची फक्त एक बाजू आहे. शासनाची दुसरी बाजू राजकीय आहे. राजकीयदृष्ट्या म्हणजे जनतेच्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा लोकशाहीसंबंधी बोलतो आणि हुकुमशाहीपासून ती निराळी आहे, असे आपण मानतो, तेव्हा राज्यकारभाराच्या यशापयशाचे मूल्यमापन एक विशिष्ट कसोटी लावून आपण करतो.