शब्दाचे सामर्थ्य २००

या ग्रंथाच्या संगतीत गेलेला वेळ माझ्या दृष्टीने संस्मरणीय आहे.

आत नुकतेच मी वाचून संपविलेले दुसरे नवे पुस्तक अमेरिकन 'बेस्ट सेलर्स' - पैकी एक आहे. 'रूट्स' हे पुस्तकाचे नाव. लेखक अलेक्स हॅली आहे. पुस्तक उत्तम कादंबरीसारखे रसाळ आहे, पण कादंबरी नाही. ग्रंथकार हॅली यांनी आपल्या कुटुंबाचा दोनशे वर्षांचा इतिहास दिला आहे. त्यांच्या कुटुंबाचा आफ्रिकन मूळपुरुष कुंटा. कुंटे हा अमेरिकेत आला कसा व कुठून, या प्रश्नाने त्याची जिज्ञासा जागी झाली; आणि वर्षानुवर्षाच्या संशोधनानंतर हा काळ्या अमेरिकेचा प्रतिनिधी लेखक एक दिवस पश्चिम आफ्रिकेच्या किना-यावरील गॅम्बिया देशातील जुफुरे या गावी आपल्या रक्ताच्या नात्याच्या सात पिढ्यांनंतरच्या भाऊबंदांना भेटला. त्यांच्याशी बोलला. लेखक अलेक्स हॅलीने आपल्या लहानपणी आपल्या आजीच्या तोंडून पिढ्यान् पिढ्या चालत आलेली आफ्रिकन मूळपुरुषाची कहाणी ऐकली होती. आपण समुद्राच्या पार असलेल्या मुलखातून आलो. वयाच्या सोळाव्या वर्षी एक दिवस जंगलात आपल्या ढोलासाठी (ड्रम) बांबूच्या झाडाच्या बुंधा तोडून आणण्यासाठी गेलो असता आपली शिकार झाली. गुलाम म्हणून साखळदंडाने बांधलेल्या स्थितीत या देशात आलो. 'आपला मुलुख समुद्रपार असून कॅनिबोलोंगोच्या शेजारी आपली वस्ती होती.' त्या कहाणीचा एवढाच सारांश हॅलीच्या सातव्या पिढीपर्यंत पोहोचला होता. पंरतु अलेक्स हॅलीने हा धागा पकडून आपल्या कुटुम्बवृक्षाच्या मुळ्या शोधून काढण्यासाठी प्रयत्‍नांचे पर्वत रचले. पाच लाख मैलांचा प्रवास केला. लागोपाठ दहा वर्षे याच गोष्टीचा ध्यास घेऊन संशोधन केले. पण त्याचे फलित त्याला मिळाले. त्याने ऐकलेली माहिती, मिळालेल्या कागदपत्रांचा आधार, मुलाखती घेऊन जमा केलेला तपशील यांचा एक मेळ घालून त्याने सात पिढ्यांचा हा इतिहास रचून उभा केला. लेखक म्हणूनही ते अप्रतिम काम पार पाडल्याबद्दल तो अभिनंदनास पात्र आहे. पण त्यापेक्षाही अडीच कोटी काळ्या अमेरिकन मानवांचा हा प्रतीकात्मक इतिहासच मानला, तर माणूस म्हणून त्याने इतिहासाची फार मोठी सेवा केली आहे. त्याबद्दल सर्वांवरच त्याचे ॠण आहे. हा अमेरिकेतील काळ्या लोकांपुरता मर्यादित प्रश्न नाही.

भारतातील शेकडो कुटुंबे अनेक देशांत विखुरली गेली आहेत. दक्षिण पॅसिफिकमधील फिजी बेटापासून ते दक्षिण अमेरिकेतील गियाना व सुरीनाम या देशापर्यंत शे-दीडशे वर्षांपूर्वी सक्तीने मजुरीसाठी हे लोक दंडेलीने नेले गेले. त्यांतील कित्येकांच्या घरांत या ग्रंथातील मूळ आफ्रिकन पुरुषासारख्या सांगितलेल्या कहाण्या आज आजीबाई नातवाला सांगतील, की – 'आपला मूळ पुरुष साता समुद्रांपलीकडून आला आणि तो तिथे कोठेतरी गंगेच्या शेजारी राहत होता.'

सतत गेली जवळजवळ दोन वर्षे माझ्या मनाला बोचत असलेला एक अनुभव नमूद केला पाहिजे. १९७५ च्या सुरुवातीला मी गियानाला परराष्ट्रमंत्री म्हणून अधिकृत भेटीसाठी गेलो होतो. गियानामध्ये अर्ध्याहून अधिक लोक भारतीय वंशाचे आहेत. भेटीचे पहिले दोन दिवस औपचारिक सरकारी चर्चा, गाठीभेटींमध्ये गेल्यानंतर जॉर्जटाऊन या राजधानीच्या शहरापासून दीड-दोनशे मैलांवर असलेल्या बॉक्साइटच्या खाणी पाहण्यासाठी हेलिकॉप्टरमधून गेलो. तेथे मार्गदर्शक म्हणून एक तरुण अधिकारी बरोबर होता. तरतरीत नाका-डोळ्यांचा व सावळ्या वर्णाचा हा तरुण हुशार व कार्यतत्पर वाटला. तो माझ्याशी अधिक आपुलकीने वागत होता. सर्व काम संपले व तेथून निघण्यापूर्वी मी कारणाशिवाय त्याला तो प्रश्न केला, 'तुझे पूर्वज भारताच्या कोणत्या प्रदेशातून आले?'

तो एकदम शांत झाला. काही क्षण बोललाच नाही. त्याचे डोळे माझ्याकडे होते. परंतु नजर कुठेतरी दुसरीकडे काही तरी शोधीत होती.

ब-याच वेळानंतर तो उत्तरला. 'माहीत नाही, कुठे तरी गंगेच्या काठावरून, बहुधा-बिहारमधून'.

त्याच्या शून्य नजरेत क्षणभर पाहिलेले कारुण्य मला अजून सतावत असते. मग अलेक्स हॅलीने आपल्या 'रूट्स' मध्ये जीव ओतून आपल्या कुटुंबाच्या मुळाचा शोध केला, त्याला काही एक नवा अर्थ माझ्या दृष्टीनेही प्राप्त होतो.