शब्दाचे सामर्थ्य २०६

हे चुकीचं आहे. काळानुसार माणसं बदलणारच. तो दोष त्यांचा नाही. परिस्थितीच त्यांना तसं बनविते. जग सध्या इतक्या झपाट्यानं बदलत आहे, इतक्या वेगानं जवळजवळ येतं आहे, पन्नास वर्षांपूर्वीच्या कल्पनाच ढासळून पडत आहेत. सध्याचं जीवनच इतकं वेगवान झालं आहे की, त्यात सामील न होणारा बाजूला फेकला जातो. तेव्हा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच या वयात बदलायला शिकलं पाहिजे, तरच जीवन सुसह्य होईल. एकदा का माणसानं पन्नाशी ओलांडली, की मत, विचार, स्वभाव, कल्पना बदलताच येत नाहीत. त्यामुळं, आपलं तेच खरं, ही वृत्ती अधिक कणखर, अधिक घट्ट बनत जाते. जगात असलेली सुसंगती, विसंगती पाह्यला शिकलं पाहिजे. दोन पिढ्यांमधील जी दरी आहे, ती कशा त-हेने दूर करता येईल, त्याचाही प्रत्येकानं विचार करायला लागलं पाहिजे.

शहरात आणि खेड्यात झपाट्यानं होत चाललेल्या बदलाची चाहूल जाणीवपूर्वक घेण्याची वेळ आता आलेली आहे. चाळिशीच्या माणसानं आताच ती चाहूल घ्यायला हवी.

देश पारतंत्र्यात होता, तो काळ मला आता पुन्हा आठवतो. तो काळ कसा भारावलेला होता! हजारो-लाखो तरुण, स्त्री-पुरुष, वयोवृद्ध, प्रौढ, स्वातंत्र्याच्या प्रेरणेनं ब्रिटिशांविरुद्ध लढायला उभे होते. कितीतरी जणांनी आपल्या प्राणांच्या आहुती स्वातंत्र्यसंग्रामात दिल्या. त्या काळात स्थापन झालेल्या प्रत्येक संस्थेच्या पुढे स्वातंत्र्यासाठी चळवळ हा प्रमुख हेतू होता. स्वत:च्या घराला, शिक्षणाला, संपत्तीला तिलांजली देऊन विविध वयांतले, विविध जातिधर्मांचे स्त्री-पुरुष स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झगडत होते. ... तो काळच मंतरलेला होता.

आताच्या पिढीसमोर तो विषय नाही. स्वातंत्र्यप्राप्ती हे ध्येयही नाही. स्वातंत्र्य मिळालं. त्या काळातले अनुभव आम्हाला मिळाले. ते आमचं रिवॉर्ड आहे. आताच्या पिढीला, मिळालेले स्वराज्य टिकवायचं, वाढवायचं, समृद्ध करायचं ध्येय समोर ठेवता येईल. कोणीतरी म्हणतं, सगळा समाजच नीतीभ्रष्ट झाला आहे. प्रत्येकजण मग तो लहान-मोठा, कोणत्याही वयाचा असो, स्वार्थी झाला आहे. समाजमूल्यं बदलली आहेत, पण यात संपूर्ण सत्य नाही आणि बदल हा अटळच असतो. पिढीपिढीत नीति-अनीतीच्या कल्पना बदलत जाणारच, या सगळ्याचे परिणाम आता दिसतात. पण म्हणून संपूर्ण समाजच सडला आहे, असं म्हणणं अत्यंत चुकीचं आणि अन्यायाचं होईल. या पिढीला - विशेषतः, ज्यांना आता स्वास्थ्य लाभत आहे, त्यांना देश-विकासासाठी, सामाजिक सुधारणांसाठी निश्चितपणे भरीव असं कार्य करता येईल. समाजाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी, तो एकरूप व्हावा, यासाठी खूप करता येण्याजोगं आहे.

पुरुष असो किंवा स्त्री असो, चाळिशीत कोणालाही समाजासाठी बरंच काही करता येतं. मात्र एक गोष्ट नक्की, पुरुष चाळीशीत आला, की कुटुंबापासून काहीसा दूर राहू शकतो. त्याला इच्छा असेल, तर कुटुंबाव्यतिरिक्त समाजासाठी काही करण्यासाठी वेळ मिळू शकतो. पण स्त्री मात्र चाळिशीत घरामध्ये आणखीनच अडकत जाते. आई म्हणून तिच्यावर खूपच जबाबदा-या पडत राहतात. घरातला तीच महत्त्वाचा घटक असते. घरावर तिचा खूपच प्रभाव पडत असतो आणि यातूनही वेळात वेळ काढून हल्ली कितीतरी स्त्रिया समाजकार्यासाठी बाहेर पडत असतात. मग ती कोणतीही समस्या असो. झोपडपट्टीतलं आरोग्य, बालवाडी, यांपासून मतिमंद, अंध, मूकबधिर मुलांच्यासाठी ज्यांनी काम करायला सुरुवात केली, त्यांत जवळजवळ सगळ्याच स्त्रिया आहेत. घरच्या अडचणी बाजूला ठेवून त्यांनी या कामाला सुरुवात केली. अजूनही करताहेत.

जेव्हा स्त्रीत बदल होत जातो, तेव्हा समाजातही बदल होणं अटळ असतं. समाजबदलाची प्रक्रिया ही स्त्रीच्या बदलात प्रतिबिंबित होत असते. समाजबदलाची ती इंडेक्स असते. कोणत्याही समाजात बदल होतो आहे, की नाही, होत असेल, तो किती, कसा होतो आहे, हे जर अभ्यासायचं असेल, तर स्त्रीमधील बदल लक्षात घेतला, तरी कळू शकतं.

म्हणून म्हणावंसं वाटतं, भारतीय समाजात निश्चितपणे बदल घडू पाहताहेत, कारण भारतीय स्त्री बदलते आहे. हुंडाविरोधी, बलात्काराविरोधी आंदोलन करायला घरातील स्त्री आता रस्त्यावर येत आहे. समाजात बदल घडवायला, समाजातील दीनदुबळयांना प्रेम द्यायला ती हिरिरीनं पुढं सरसावली आहे. स्त्रीनं पुरुषाला संसारात सुखदुःखांत साथ दिली. आता पुरुषानं तिलाही साथ देण्यासाठी आपणहून पुढं यायला हवं. या कामासाठी चाळिशी ही सुवर्णसंधीच नाही का?