६५
हिंदीची प्रगती कशी होईल ?
सध्या हिंदी भाषा एका मोठ्या संक्रमणावस्थेतून जात आहे. यापूर्वी हिंदी साहित्याच्या इतिहासात अशा प्रकारच्या संक्रमणावस्थेचा काळ कधी आला नसेल. दुस-या प्रांतिक भाषांशी तुलना करता, हिंदी भाषा बोलणारे लोक देशाच्या निरनिराळ्या भागांत अधिक प्रमाणात असल्यामुळे या भाषेला राष्ट्रभाषा बनण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. तथापि, या थोर मानाची जिम्मेदारी चांगल्या प्रकारे पार पाडण्याचे काम विशेषतः हिंदी साहित्यिकांचे आहे. आज देशाच्या कोनाकोप-यांतून हिंदी भाषेचा प्रसार करण्याची आवश्यकता तर आहेत. परंतु त्याहीपेक्षा हिंदी भाषेतील शब्दसंपत्ती आज अशा प्रकारे वाढविली पाहिजे की, ज्यामुळे आधुनिक विचारप्रवाह, शास्त्रीय व
तांत्रिक विषय आणि त्याचप्रमाणे राज्यकारभार यांची संपूर्ण गरज ती चांगल्या प्रकारे भागवू शकेल. या दिशेने केंद्रीय सरकारतर्फे उच्च पातळीवर बरेच कार्य चालू आहे. तथापि, हे महान कार्य त्वरित पूर्ण होण्यासाठी सर्वच हिंदी साहित्यिकांच्या हार्दिक सहकार्याची विशेष आवश्यकता आहे.
इतर प्रांतिक भाषांशी हिंदी भाषेचे अधिक प्रमाणात साहचर्य व्हावयास पाहिजे. तसे झाल्यास, सगळ्या प्रांतिक भाषांबरोबर हिंदीचीही ख-या अर्थाने प्रगती होऊ शकेल. प्रांतिक भाषांतील चांगल्या व मौलिक साहित्याचा हिंदी भाषेत अनुवाद व्हावयास पाहिजे, त्याचप्रमाणे हिंदी भाषेतील मौलिक साहित्याचाही प्रांतिक भाषांतून अनुवाद झाला पाहिजे. साहित्याच्या या देवाणघेवाणीबरोबर शब्दसंपत्तीचीही देवाणघेवाण झाल्यास परस्परांमधील जिव्हाळा वाढविण्याच्या दृष्टीने बरीच मदत होईल. जितक्या अधिक प्रमाणात प्रांतिक भाषांतील शब्द हिंदी भाषेत रूढ होतील, तितकी हिंदी भाषा त्या त्या प्रांतातून अधिक सहजगत्या समजू शकेल. त्याचप्रमाणे हिंदीतील शब्द व वाक्यप्रचार यांचा इतर प्रांतिक भाषांतून अधिक प्रमाणात समावेश झाल्यास त्या त्या भागातील लोकांना हिंदी शिकणे अधिक सोपे जाईल. संस्कृत भाषेचा फार मोठा प्रभाव हिंदीसहित सर्व प्रांतिक भाषांवर पडला आहे. त्यामुळे चांगल्या संस्कृत कलाकृतींचा हिंदी अनुवाद देशात सर्वत्र लोकप्रिय होऊ शकेल. इंग्रजी, फ्रेंच, जर्मन वगैरे प्रमुख परदेशी भाषांमध्ये फार मोठे ज्ञानभांडार भरलेले असून, त्या भाषांतील निवडक ग्रंथांचा संक्षिप्त रूपाने हिंदीत अनुवाद झाल्यास हिंदी साहित्य अधिक संपन्न होऊ शकेल. अशा प्रकारच्या अनुवादित साहित्याबरोबरच नवीन विचारप्रवाहास स्फूर्ती देणा-या मौलिक साहित्याचीही हिंदी भाषेत निर्मिती होणे आवश्यक आहे. अशा नवीन साहित्यात पौर्वात्य जीवनातील चांगल्या गोष्टींसंबंधीचेही ज्ञान त्यात असले पाहिजे. विज्ञानाच्या प्रगतीबरोबर जीवनमूल्यांतही आश्चर्यकारक असे बदल होत असून, त्यांचे यथोचित मूल्यमापन नव्या हिंदी साहित्यात होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नवीन हिंदी साहित्यिकांना योग्यतेनुसार प्रोत्साहन मिळाले पाहिजे आणि त्यांच्या कलाकृती सुलभरीत्या प्रकाशित होण्याच्या दृष्टीने त्यांना आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.