८) “शिक्षम संपल्यानंतर नोकरी करणार नाही. अशी प्रतिज्ञा करा. बुद्धी व हात यांचा उपयोग करा. शौर्याला आम्ही कमी पडलो नाही, तर शास्त्राला कमी पडलो. नव्या आकांक्षांनी पेटलेले तरूण आता पुढे आले पाहिजेत. कर्तृत्वाचे पीकच महाराष्ट्रात उभे राहिले पाहिजे. गुणी व बुद्धिमान असा महाराष्ट्र उभा राहिला पाहिजे. नवीन घडणारा महाराष्ट्र Sky is the limit असा आदर्श ठेवणारा होवो.”
९) “जाणीवपूर्वक सत्तेचा उपयोग समाजाच्या परिवर्तनासाठी करायचा असा माझा प्रयत्न आहे. दलिताबद्दल कणव माझ्या मनात कायम आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे ही माझी धारणा आहे.”
(यशवंतरावजींनी वेणुताईला लिहिलेल्या एका पत्रातून)
१०) “अस्पृश्योद्दाराकरिता विचारांच्या दृष्टीने पहिला प्रयत्न करणारे ज्योतिबा फुले हे प्रवर्तक होते. त्यांनी काही क्रांतिकारक विचार सांगितले. पण या प्रश्नाला संघटितरीत्या तोंड दिले पाहिजे, असा प्रयत्न करण्यासाठी एक संस्था उभी करावी, असा प्रयत्न करणारे माझ्या कल्पनेप्रमाणे हिंदुस्थानामध्ये कोणी असतील मला माहीत नाही, माझे अज्ञान मी कबूल करतो, पण या महाराष्ट्रामध्ये विठ्ठल रामजी शिंदे हे पहिले गृहस्थ होते. त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था काढली आणि हे कार्य सुरू केले. पुढे त्यांच्या कार्याला किती यश आले किंवा अपयश आले याचे मूल्यमापन करणे फार कठीण आहे.” “अस्पृश्यता निवारणाचा मोठाच प्रश्न आपल्यासमोर आहे. त्यासाठी सरकारने अनेक कायदे केले आहेत. प्रत्येक गावातील सार्वजनिक विहिरी व मंदिरे हरिजनांसाठी कायद्याने खुली झाली आहेत. परंतु अद्यापही अशी अनेक गावे आहेत की, जेथे हरिजनांना हे हक्क आजसुद्धा उपभोगता येत नाहीत. याचे कारण हे आहे की, कायदा हा अनुज्ञापक स्वरूपाचा असतो. जो कोणी हक्क धसाला लावील त्याच्या रक्षणासाठी कायदा उभा आहे. नाही तर कायदा काहीच करू शकत नाही. सामाजिक सुधारणांच्या खास प्रयत्नांनी आपण ही उणीव भरून काढली पाहिजे. आपले हक्क आपण बजावू शकू असा हरिजनांत विश्वास निर्माण करणारे वातावरण पैदा व्हावयास पाहिजे. भारत हा खेड्यांचा देश आहे व म्हणून ग्रामीण भागातून सामाजिक सुधारणेचे पाट आपण कसे खेळवतो यावर सामाजिक क्षेत्रातील आपल्या श्रमाचे साफल्य अवलंबून आहे.”
११) “राष्ट्रीय ऐक्यास पोषक होईल अशा त-हेने आपणास महाराष्ट्र राज्यातील सर्व वर्गाचा विकास व उन्नती घडवून आणावयाची आहे. सामाजिक एकात्मतेच्या बाबतीत आपले काही खास प्रश्न असून ते सोडविण्यासाठी आपण योग्य ते उपाय शोधून काढले पाहिजेत. नव्या राज्यामधले काही प्रदेश आर्थिकदृष्ट्या अविकसित व मागासलेले आहेत. स्वाभाविकपणेच तयांचा विकास ही महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीने खास विचारांची बाब आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विभागांव्यतिरिक्त, राज्यातील काही वर्ग हे मागासलेले आहेत. त्यांच्या प्रगतीसाठीसुद्धा आपणास विशेष प्रयत्न केले पाहिजेत. या मागासलेल्या वर्गात केवळ सामाजिकदृष्ट्य मागासलेल्या लोकांचाच नव्हे तर आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांचाही मी समावेश करतो. समान संधी ही सामाजिक न्यायाच्या कल्पनेतील महत्त्वाची बाब आहे आणि म्हणून बुद्धी असूनही केवळ पैशाच्या अभावामुळे तिला वाव मिळत नाही असे होता कामा नये. महाराष्ट्रात अशा प्रकारे सर्वांना सामाजिक व आर्थिक न्याय मिळेल अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपण झटले पाहिजे.”
(इंडियन कमिटी फॉर कल्चरल फ्रीडम व साधना साप्ताहिकाने आयोजित केलेल्या परिसंवादातून)