भूमिका-१ (34)

९. बांधिलकीचे राजकारण

अखिल भारतीय काँग्रेसच्या फरिदाबाद
अधिवेशनातील भाषणाच्या आधारे (२७-४-६९)

गेल्या दोन वर्षांतील राजकीय घडामोडींचे विहंगमावलोकन केल्यास आपल्याला काही अत्यंत विलक्षण गोष्टी दिसून येतात, काही अतिशय अर्थपूर्ण राजकीय घटना आढळतात. (मी केवळ या अहवालाची पार्श्वभूमी सांगत आहे. या समितीने देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली, तेव्हा तिने गेल्या दोन वर्षांत घडलेल्या विशेष महत्त्वाच्या व अर्थपूर्ण राजकीय घटनांचा विचार केला. आणि या घटनांच्या व गेल्या दोन वर्षांत आम्हांला आलेल्या अनुभवांच्या आधारेच आम्ही प्रस्तुत निवेदन केलेले असून त्यात काँग्रेसची वरील घटनांविषयीची भूमिका स्पष्ट करून, भावी काळातील धोरणाची रूपरेषा दिली आहे.)

१९६७ मधील निवडणुकीनंतरची सर्वांत महत्त्वाची राजकीय घटना म्हणजे १९६९ मधील मुदतपूर्व निवडणूक ही होय. या निवडणुकीविषयी व्यासपीठावरून व नियतकालिकांतून इतकी मल्लिनाथी झालेली आहे, की १९६९ मध्ये काय घडले व राजकीय दृष्ट्या त्याचा अन्वयार्थ काय, याचा आपण स्वत: आढावा घेणे आवश्यक होऊन बसले आहे.

पाच निवडणुकांपैकी बंगाल व पंजाबमध्ये आपण हरलो, हे खरे. हरियाणात आपण निर्विवाद जय मिळविला. उत्तर प्रदेशात आणि बिहारमध्ये आपण काही नव्या महत्त्वाच्या जागा जिंकल्या. आता आपण तेथे मंत्रिमंडळ बनवू शकलो नाही, हे खरे. परंतु ६७-६९ च्या निवडणुकांत काँग्रेसने सपशेल आपटी खाल्ली, असे मानण्याची प्रवृत्ती दिसून येते. काँग्रेसने प्रगतीच केली, असे आकडेवारी देऊन सिद्ध करायची माझी इच्छा नाही, पण तरीही ६९ साली जे घडले, त्याचा समतोल दृष्टीने विचार करणे अगत्याचे आहे. ६९ च्या निवडणुकींचा अर्थ लावताना भविष्यात अधिकच पराजय होण्याची शक्यता व्यक्त केली जाताना दिसत आहे. आणि या प्रवृत्तीपायी काँग्रेसच्या लहानमोठ्या कार्यकर्त्यांच्या मनातील आत्मविश्वास ढासळू पाहत आहे. या प्रतिक्रियेची अंतिम परिणती सर्वसाधारण जनतेच्याच मनात आत्मविश्वासाचा अभाव निर्माण करण्यात होणार आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेश व हरियाणा या प्रांतात काँग्रेसने प्रगती साधली असल्याचे (प्रस्तुत निवेदनाने) दाखवून देण्यात आले आहे. इतरही कित्येक प्रांतांत काँग्रेसचे बळ चवथ्या सर्वसाधारण निवडणुकीतल्याहून वाढलेलेच आहे.

या निवडणुकांचा आपण तपशिलवार विचार करू या. आपण बंगालमध्ये हरलो, हे मी सांगितलेच. तो पराजय आपल्याला मान्य करायलाच हवा. पण  त्याबरोबरच बंगाल्यात जे घडले, त्याचा राजकीय अन्वयार्थ शोधायचाही प्रयत्न आपण करायलाच हवा. बंगालमधील ५० लाखांहून अधिक मतदारांनी आपल्याला मते दिली, हे आपण जाणतो. जागांच्या दृष्टीने आपण हरलो असू, पण अडचणीच्या काळातही ५५ लाख लोक काँग्रेसच्या बाजूने उभे राहिलेले होतेच. त्यांना वा-यावर सोडून आपण असे म्हणणार का, की 'आम्ही हरलो, तर आता आम्ही अज्ञातवासात राहू !' या लक्षावधी लोकांच्या पाठीशी राहून आगामी काळात मार्गदर्शन करणे, हे आपले कर्तव्य ठरते. ते आपले राजकीय दायित्व आहे. काही अंशी उत्तर प्रदेशात आपली स्थिती सुधारली आहे, हेही आपल्याला विसरता येत नाही.