देश म्हणून भारताचा विचार हा आज प्रामुख्याने आपणांसमोर आहे. स्वातंत्र्य प्राप्त होऊन १८ वर्षे झाली. या संदर्भात, आम्ही काय केले, काय प्रगती केली, असे प्रश्न विचारले जातात. पण देश म्हणून भारताचा विचार केला, तर निदान गेल्या हजार, दीड हजार वर्षांत या देशाची काही प्रगती झाली नाही, असे विद्वान इतिहासकार म्हणतात. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजीमहाराजांकडून किंवा अन्य प्रांतातून इतर काही प्रगतीचे स्वतंत्र प्रयत्न झाले असतील, परंतु एक देश म्हणून या देशाची प्रगती गेली दीडहजार वर्षे खुंटलेलीच आहे. याच संदर्भात स्वातंत्र्यानंतरच्या १० वर्षांचा विचार केला पाहिजे. शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रांत आम्ही प्रगती करीत आहोत. पण त्याचबरोबर या प्रगतीला मागे खेचण्याचेही कार्य सुरू आहे. कोल्हापुरातील रंकाळा तलावाच्या काठी एक नंदी आहे. त्याची एक कथा काहीजण सांगतात, की हा नंदी म्हणे वर्षभरात केसभर पुढे आणि गहूभर मागे सरकतो. हा नंदी जेव्हा रंकाळ्यात उडी घेईल, त्यावेळी जलप्रलय होईल, असे सांगितले जाते. आमच्या प्रगतीचेही असेच काहीसे चालू आहे.
देशापुढे महत्त्वाचे आर्थिक प्रश्न आहेत. टीका करून आर्थिक प्रश्न मिटत नाहीत किंवा मिटवता येत नाहीत. व्यक्ती काही प्रयत्नांनी लौकर श्रीमंत होऊ शकते, पण समाज तसा होऊ शकत नाही. ५० कोटींचा देश बदलावयाचा आहे. योजनापूर्वक काही गोष्टी केल्या व समाजाचे नियोजन केले, तर थोड्या काळात क्रांतिकारक बदल घडू शकतो, असा अनुभव इतर देशांतून आलेला आहे. समाजच्या समाज श्रीमंत, सुखी होऊ शकतो, हा आमच्या काळातील क्रांतिकारक विचार आहे. नवनव्या शोधांनी समाजातील गरिबी व दारिद्र्य हटविता येते, असे अनुभवाने सिद्ध झालेले आहे. आपल्या देशात या कामाला प्रयत्नपूर्वक लागण्याची आवश्यकता आहे.
रशियासारखे देशही विधायक वृत्तीने शेती, शिक्षण यांसारख्या प्रश्नांच्या प्रगतीचा विचार करतात. केवळ राजकीय विचारानेच हे केले जाते किंवा करावे लागते, असे नाही.
वैज्ञानिक दृष्टिकोणातून ही प्रगती साध्य करता येते. आम्ही आमच्या देशातील राजांची राज्ये लोकराज्यात विलीन करण्याची क्रांती केली. इतर देशांतही राजांची राज्ये नष्ट करणा-या क्रांत्या झाल्या. पण मानवी जीवन बदलण्याची क्रांती यापुढे करावयाची आहे. हिंदुस्थानातील आर्थिक व सामाजिक गरिबी नाहीशी झाल्याशिवाय या देशातील लोकशाहीला अर्थ राहणार नाही. आज महागाई आहे, गरिबी आहे, इतरही अनेक प्रश्न आहेत. परंतु त्याचबरोबर देशाचाही प्रश्न आहे आणि या प्रश्नाच्या संदर्भांतच इतर प्रश्न सोडवावयाचे आहेत.
स्वातंत्र्य मिळून २८ वर्षे झाली, याचा अर्थ आपण आता सज्ञान झालो आहोत. सज्ञानाप्रमाणेच आपण यापुढे वागले पाहिजे. सज्ञानाप्रमाणेच राजकारण केले पाहिजे. राष्ट्र वाढते आहे. त्याच्या गरजाही वाढल्या आहेत. संकटाचा काळ समोर दिसतो आहे. म्हणून नेत्यांचीही गरज आहे. पराक्रमाला जागा आहे, असा हा काळ. यावेळी राष्ट्राला बळकट करण्याचे कामच तुम्ही-आम्ही करावयाचे आहे.