भूमिका-१ (17)

चीन सैन्य घेऊन भारतावर चाल करून आला आणि आपण होऊनच परत गेला ही घटना नीटपणे समजावून घेतली पाहिजे. तो काय हौस म्हणून भारतावर चालून आला होता? पण तो परत गेल्यामुळे लढायचे कोणाशी, असा प्रश्न माझ्यापुढे पडला. मी नंतर असे पाहिले, की लढाई संपलेली नाही. हिमालयात सुरू झालेली लढाई थांबली होती; पण संपलेली नव्हती. आजच्या लढायांमागे केवळ सैनिकी लढाई एवढाच हेतू नसतो. या लढायांमागे राजकीय हेतू असतात. ज्यांचा परिणाम जागतिक स्वरूपात होईल, अशा काही गोष्टी त्यात दडलेल्या असतात. लढायचे असेल, तर लढणारा कशासाठी लढणार आहे, याचा आढावा घ्यावा लागतो. तसा तो घेतल्याशिवाय आजकाल लढता येत नाही.

चीनचा लढाईमागचा हेतू स्पष्ट होता. आशिया व आफ्रिका खंडांतील देशांसमोर त्याला एक सामर्थ्यवान देश म्हणून जावयाचे होते. आग्नेय आशिया खंडात त्याला नेतृत्व करावयाचे होते. ते करण्यासाठी, भारताशी धक्काबुक्की करून, भारत हा दुबळा देश आहे, असे जगाला दाखवून द्यावयाचे होते.

दुस-या महायुद्धानंतर दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. जनसंघटनेतून व जनसंघर्षांतून स्वातंत्र्याची क्रांती जन्माला आली होती व या क्रांतीद्वारे राष्ट्रे स्वतंत्र होऊ लागली होती. लोकशाही मार्गाने राष्ट्रे स्वतंत्र होण्याचा हा मार्ग चीनला अर्थातच रुचणारा नव्हता, म्हणून लोकशाही मार्गाने क्रांती यशस्वी होऊ शकत नाही, असेही त्याला सिद्ध करावयाचे होते.

स्वातंत्र्यानंतर आम्ही आमची सर्व शक्ती विकासाच्या कामासाठी लावली. आम्हांला कोणी शत्रू असण्याचे कारण नाही, याही समजुतीत आम्ही होतो. पंडित नेहरूंसारखे पुरोगामी नेतृत्व या देशाला लाभलेले असल्याने सर्वांगीण विकासाचे धोरण नजरेसमोर ठेवून आम्ही पुढे चाललो होतो. मधुचंद्राच्या अवस्थेचा काळ मी म्हणतो, तो हाच. परंतु त्याच वेळी चीन दुसरा विचार करीत होता. भारतापुढे युद्धसमान किंवा लष्करी संकटांसारखे प्रश्न उभे केले, तर भारतात अंतर्गत आर्थिक प्रश्नांचा ताण वाढत राहील, विकास योजना कोसळतील व आर्थिकदृष्ट्या ताणला गेलेला देश तुटून फुटून पडेल, असे वाटत होते. भारत हा एक दुर्बल देश आहे, असे काही देशांना वाटते. याच समजुतीवर त्यांची लष्करी तयारी चाललेली असते. याच वृत्तीतून ते भारतामधील लष्करी संकटे वाढवण्याचाही प्रयत्न करतात. भारताने तटस्थ नीतीचा अवलंब केलेला असल्याने या तटस्थतेच्या व्रतापासून त्याला बाजूला करावयाचे, हाही चीनचा एक हेतू होता.

भारताने कोणत्याही लष्करी गटापासून अलिप्तच असले पाहिजे, याबद्दल नेहरूंचे धोरण आणि मन खंबीर होते. मित्र राष्ट्रांच्या युद्धखोर नीतीविषयी त्यांच्या मनाला खंत वाटत होती. परंतु लष्करी करारात सामील न होण्याच्या धोरणापासून ते कधीच विचलित झाले नाहीत.

मला आठवते, मी दिल्लीत गेलो, त्या दिवशी रात्री पंडितजींना दिल्लीत पोहोचल्याचे मी कळविले. रात्री भेटावयाला या, असे त्यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत ते कचेरीत काम करीत बसलेले असत. मी त्यांच्याकडे गेलो, त्यावेळी ते असेच काम करीत होते. लढाईचा जोर वाढलेला होता. एकापाठोपाठ एक युद्धवार्ता येत होत्या. कोणत्या परिस्थितीत आपणांला काम करावयाचे आहे, हे पंडितजी मला समजावून देत होते. तटस्थतेच्या धोरणाबद्दलही त्यांनी सांगितले, राष्ट्रावर भयानक संकट कोसळले असतानाही ते आपल्या तटस्थपणापासून यत्किंचितही ढळले नव्हते. त्यावेळी त्यांच्याच एका वचनाची मला आठवण झाली. 'मला राग लवकर येतो; पण धैर्य नाही खचत', असे ते म्हणाले होते. पंडितजींचे तटस्थतेचे धोरण योग्य होते, हे आम्हांस आज पटते.