आमचे मुख्यमंत्री -२४

यशवंतरावांचे मुख्यमंत्रिपदातील कार्य

संयुक्त महाराष्ट्राविषयी यशवंतरावांची भूमिका स्पष्ट होती. त्यांना मराठ्याचे राज्य नको होते, तर म-हाठ्यांचे राज्य पाहिजे होते. त्यांना बेरजेचे राजकारण करावयाचे होते. श्री. विठ्ठलराव पाटलांनी त्यांच्या भूमिकेचे उत्तम वर्णनल केलेले आहे. ते म्हणतात, यशवंतरावांची भूमिका ही शिल्पकाराची होती. द्रष्टा राजकारणी व विकासाच्या आशयाची पूर्ण कल्पना असलेले ते धुरंधर राजकारणी होते. त्यामुळे शिक्षण, शेती, उद्योग, स्त्रियांचा उध्दार, अस्पृश्यता निवारण, विज्ञाननिष्ठा व ज्ञानी समाजनिर्मिती, सांस्कृतिक विकास, दलितांचा उध्दार, ग्रामीण व नागरी भागांतील विकासाचा समतोल, सत्तेचे विकेंद्रीकरण हे त्यांचे ध्येय होते व ह्यांचा त्यांना ध्यास होता.
त्यांनी ग्रामीण भागाकरता अनेक आखल्या. साखर-सूत-शेतीमालावर प्रक्रिया ह्यांना सहकारी तत्वाची बैठक, सहकारी तत्त्वावर कर्जपुरवठा, सहकारी मार्केटिंग ह्या प्रमुख गोष्टी सांगता येतील. यशवंतरावांच्या मते सहकार ही ग्रामीण भागातील लोकशाहीचे शिक्षण देणारी बालवाडीच होती. एका अर्थाने यशवंतरावांनी शेतीप्रधान उद्योगांच्या विकासाला दिशा व वेग दिला.

सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे अशी यशवंतरावांची धारणा होती. त्यातून ग्रामीण विकासाची तळमळ असलेले नेतृत्व निर्माण होणार होते. ह्याकरता त्यांनी ग्रामपंचायत, तालुकापंचायत व जिल्हा परिषदा ह्या संस्था स्थापण्यास उत्तेजन दिले.

शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांची प्रमुख कामगिरी म्हणजे मराठवाडा व शिवाजी विद्यापीठांची स्थापना. कमी उत्पन्न असलेल्या लोकांकरता मोफत शिक्षणाची सोय, नवीन शिक्षण संस्था स्थापण्यास उत्तेजन, ग्रामीण भागात शिक्षणाच्या सोयीकरता वसतीगृहांची सोय इत्यादी कामांचा उल्लेख करता येईल. सैनिकी शिक्षणाकरता त्यांनी साता-यास सैनिकशाळा सुरू केली. कारण सातारा सैन्याच्या भरतीचे एक प्रमुख केंद्र होते. मातृभाषेत पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावीत म्हणून त्यांनी ते कार्य भाषा संचालनालयाकडे सोपविले. त्याबरोबर मराठीत पुस्तके तयार करण्याकरता एक समिती नेमली. भाषा संचालनालयाने वेगवेगळ्या भाषांतील पारिभाषिक शब्दांचे कोश तयार केले. वैचारिक चलनवलन वाढविण्याकरता त्यांनी साहित्य संस्कृती मंडळ स्थापन केले. त्याचबरोबर त्यांनी पंडित लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांच्या अध्यक्षतेखाली विश्वकोश मंडळाची स्थापन केली. हेतू एकच होता – वाढत्या ज्ञानाच्या कक्षांची माहिती व ओळख बहुजासमाजाला व्हावी. आदिवासी मुलांना शिक्षण घेण्याकरता उत्तेजन द्यावे म्हणून त्यांनी अनेक सवलती आदिवासींना दिल्या.

सामाजिक सुधारणेच्या दृष्टीने त्यांनी महार वतने खालसा करून अस्पृश्यांची दास्यातून सुटका केली (१९५८). अनेक अस्पृश्यांनी डॉ. आंबेडकरांच्या धुरिणत्वाखाली बौध्द धर्माचा स्वीकार केला होता. त्यावेळी या नवबौध्दांना त्याच सवलती उपलब्ध झाल्या पाहिजेत अशी त्यांची भूमिका होती. ते जातिभेदाच्या विरुध्द होते. कारण त्यामुळे उच्च-नीच ह्या भावनेला उत्तेजन मिळते व म्हणूनच त्यांनी शेतमजूर, हरिजन, गिरीजन, दीनदलित ह्या सर्वांना शैक्षणिक, राजकीय व सामाजिक संधी उपलब्ध करून देण्यास उत्तेजन दिले.