यशवंतराव व राजकीय चळवळ
हा काळ (१९३२-४२) अतिशय महत्वाच्या राष्ट्रीय घडामोडींचा होता. महात्मा गांधींची सविनय कायदेभंगाची चळवळ, चले जाव चळवळ ह्यांत यशवंतरावांनी सक्रिय भाग घेतला व त्यांना त्याकरता सक्तमजुरीची शिक्षाही झाली.
तुरुंग हा एका अर्थाने यशवंतरावांची ज्ञानगंगोत्रीच ठरली. तुरुंगात त्यांना जो ज्येष्ठ राजकीय पुढा-यांचा सहवास मिळाला त्यामुळेच त्यांना विविध क्षेत्रांतील नवविचारांचा परिचय झाला व प्रगल्भताही वाढली. त्यांना मनात त्यामुळे एक वैचारिक वादळ, द्वंद्व सुरू झाले. गांधीवाद, मार्क्सवाद, समाजवाद, हिंदुत्ववाद ह्यांच्या स्वरुपात त्यांच्यापुढे वैचारिक आव्हाने उभी ठाकली व अखेर १९३९ साली त्यांनी इतर विचारांशी सहमत न झाल्यामुळे कॉंग्रेसला निष्ठा वाहिली.
यशवंतराव व संसदीय राजकारण
१९३७ साली प्रांतिक स्वायत्ततेखाली कॉंग्रेसने अधिकार स्वीकार केला व त्यावेळी ते सातारा मतदारसंघातून निवडून आले. श्री. बाळासाहेब खेरांनी त्यांची संसदीय सचिव (Parliamentary Secretary) म्हणून नेमणूक करून त्यांच्याकडे होमगार्ड व गृहखाते सोपविले. होमगार्ड ही संस्था आणीबाणीत बंदोबस्तकरता माणसे उपलब्ध व्हावीत म्हणून बाळासाहेब खेर व मोरारजी देसाई ह्यांनी सुरू केली होती. १९४६ नंतर १९५२ साली बाळासाहेब खेरांचे दुसरे मंत्रिमंडळ स्थापन झाले. त्या मंत्रिमंडळात यशवंतराव चव्हाण कॅबिनेट दर्जाचे नागरी पुरवठा मंत्री होते. अर्थात त्यावेळी त्रैभाषिक मुंबई राज्य होते. महात्मा गांधींच्या आग्रहामुळे ह्यावेळी नियंत्रणे उठविली गेली. यशवंतराव स्थानिक स्वराज्य खात्याचेही मंत्री होते. अर्थात सत्ता विकेंद्रीकरणाचे चव्हाण पुरस्कर्ते होतेच. कारण ते एक विकासाचे व लोकशाही तंत्राचे शिक्षण देण्याचे साधन आहे अशी त्यांची भावना होती.
यशवंतराव मुख्यमंत्री होतात
राज्य पुर्नरचना आयोगाच्या शिफारशीनुसार कर्नाटक महाराष्ट्रापासून वेगळा झाला. येथे द्विभाषिक राज्य आले. महागुजरातकरता गुजरातमध्ये चळवळ झाली, तर संयुक्त महाराष्ट्राकरता मुंबई व महाराष्ट्रात चळवळीचा जोर वाढला. एकमताने व बिनविरोध निवड होणार असेल तर द्विभाषिकाचे मुख्यमंत्री होण्याची मोरारजींची तयारी होती. परंतु श्री. भाऊसाहेब हिरे हे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते. ह्या वादात मुख्यमंत्रिपदाची माळ यशवंतरावांच्या गळ्यात पडली. परंतु जनादेशाविरुध्द जाणे मला जमणार नाही असे यशवंतरावांनी श्रेष्ठींना सांगितले. आणि द्विभाषिक राज्य चालविण्यास मी असमर्थ आहे असेही बजावले. परिणामी १९६० साली (मुंबईसह) संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला. अशा त-हेने यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले.
मुख्यमंत्री होण्याची यशवंतरावांची ही दुसरी खेप. १९५६-६० ह्या काळात द्विभाषिक असताना ते द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री होते, तर १९६०-६२ ह्या काळात ते संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. असा त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा काळ सहा वर्षांचा आहे. १९६२ साली चीन युध्दाच्या वेळी ते केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीस गेले.