९. श्री. यशवंतराव चव्हाण
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री
(१-११-५६ ते १-५-६०) (१-५-६० ते १९-११-६२)
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ
यशवंतराव १९५६ साली द्विभाषिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पण महाराष्ट्रात हा काळ चळवळीचा होता. १०५ लोकांनी संयुक्त महाराष्ट्राकरता बलिदान केले. लोकांचा क्षोभ वाढला होता. यशवंतरावांना महाराष्ट्रद्रोही म्हणून लोक संबोधू लागले. अशा परिस्थितीत यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्राकरता प्रयत्न तर केलाच, पण त्याबरोबर महाराष्ट्राच्या विकासाचे सर्वांगीण चित्र जे त्यांच्या मनात होते, त्याला दृश्य स्परूप देण्याचाही प्रयत्न केला ही एक गौरवास्पद बाब आहे. एका अर्थाने महाराष्ट्राच्या जडणघडणीचे ते एक शिल्पकार होते.
जन्म व शिक्षण
यशवंतरावांचा जन्म १२-३-१९१३ रोजी त्यांच्या आजोळी खानापूर तालुक्यातील देवराष्ट्र ह्या गावी झाला. दुर्दैवाने त्यांच्या वडिलांचे अकस्मात निधन झाले. तेव्हा शिक्षणाचे महत्व जाणून त्यांच्या आईने क-हाडास बि-हाड केले व तेथूनच ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी १९३०-३२ च्या चळवळीत कारावास सोसला होती, तरी त्यांनी आपले शिक्षण पुरे केले. ते १९३८ साली कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजातून बी.ए. झाले व १९-७-१९४१ रोजी पुण्यातून एल.एल.बी. झाले. अर्थात त्यांची शैक्षणिक कारकीर्द सामान्यच होती.
क-हाडला आल्यामुळे यशवंतरावांचा अनेक दृष्टींनी फायदा झाला. त्यावेळी होणा-या वैचारिक चळवळीची त्यांना माहिती झाली. मग ते स्त्रियांचे प्रश्न असोत, सत्यशोधक चळवळ असो वा इतर सामाजिक –राजकीय प्रश्न असोत.
वाचन व वक्तृत्व ह्याबाबत शिक्षण त्यांना क-हाडच्या वातावरणात मिळाले. चव्हाणांची सामाजिक कार्यात भाग घेण्याची सुरुवात क-हाडला झाली. युगपुरुषांचे उत्सव साजरे करताना त्यानी लोकाभिसरणाला चालना दिली. त्यांनी केशवराव जेधे व विठ्ठलरामजी शिंदे ह्यांच्या तत्वावर आधारित ग्रामीण जागृती करण्याचा प्रयत्न केला. पुढे महात्मा गांधींच्या चळवळीमुळे सत्यशोधक चळवळीचा जोर कमी होऊन बहुजन समाज राष्ट्रीय चळवळीत सामील झाला ही गोष्ट वेगळी. परंतु लोकमान्यांचा स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे हा संदेश सामान्य लोकांपर्यंत पोहोचविला पाहिजे ही त्यांची धारणा होती.