आमचे मुख्यमंत्री -२१

आणीबाणी

१९७६ साली श्रीमती इंदिराजींनी आणीबाणी जाहीर केली. आणीबाणी उठवल्यानंतर १४-३-१९७७ रोजी निवडणुका होऊन मोरारजी बिगर कॉंग्रेसचे पंतप्रधान झाले व पंतप्रधान होण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली. ते वयाच्या ८१ व्या वर्षी पंतप्रधान झाले, परंतु त्यांची वागण्याची त-हा, कार्यपध्दती, हट्टी स्वभाव ह्यांत कोणताच फरक झाला नाही. त्याचबरोबर त्यांच्या मुलाच्या उद्योगधंद्यांबद्दलही बरीच टीका झाली. परिणामी त्यांना १५-७-१९७९ रोजी बहुमत नसल्यामुळे राजीनामा द्यावा लागला. १०-१-१९९५ रोजी त्यांचे निधन झाले.

मोरारजींचे कार्यक्षेत्र – मूल्यमापन

मोरारजींनी अनेक क्षेत्रांत काम केले. ते गुजराथ विद्यापीठाचे कुलगुरू होते. प्रशासन सुधारणा मंडळाचे अध्यक्ष होते. १९४६-५२ ह्या काळात ते विधिमंडळाचे सदस्य होते. १९५६ ते १९६७ आणि १९७१ ते १९७७ या काळात ते पार्लमेंटचे सदस्य होते. केंद्रात ते वाणिज्य व अर्थमंत्री होते. गांधी स्मारक निधी, गांधी पीस फौंडेशन, हिंदुस्थानी प्रचारसभा ह्या संस्थांचे अध्यक्ष होते. कर्नाटक विद्यापीठाने त्यांना डी. लिट. पदवी दिली होती, तर भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा किताब दिला होता. पाकिस्तान सरकारने निशान ए पाकिस्तान या किताबाने सन्मानित केले होते.

व्यक्ती म्हणून मोरारजींविषयी परस्परविरोधी मते आहेत. त्यामुळे कदाचित हट्टीपणा असेल. कारण अपेक्षा नसली तर मनधरणी करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. शिवाय ते स्पष्टवक्ते होते. तत्वाबाबत कोणतीही तडजोड करण्यास ते कधीच तयार नसत व त्याकरता त्यांना मोठी किंमत द्यावी लागली आणि त्यांनी दिलीही. असे करताना त्यांनी अनेक विरोधकही निर्माण केले. परंतु थातुरमातुर बेरजेचे राजकारण करण्याची त्यांची तयारी नव्हती. लोकांच्या बरोबर मतभेद असताना जाणे हे कसब त्यांच्यात नव्हते. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व वादग्रस्त झाले. जनमानसात त्यांची प्रतिमा हट्टी व हेकेखोर अशी निर्माण झाली.

कम्युनिझम हे तत्त्वज्ञान प्रतिगामी आहे असे ते मानत. गांधी-तत्त्वावर त्यांची अढळ श्रध्दा होती. त्यांची लोकशाहीवर नितांत श्रध्दा होती. गरीब व श्रीमंतांमधील दरी त्यांना मान्य नव्हती. लोककल्याणाकरता राजकारण हे साधन आहे हे त्यांचे मार्गदर्शक तत्व होते. एकूण ते अत्यंत कर्तबगार, उत्तम, प्रामाणिक, चारित्र्यवान प्रशासक होते ह्याबद्दल दुमत होणार नाही. म्हणूनच त्यांच्या मृत्युनंतर कोणीही त्यांच्याबद्दल अपमानकारक उद्गार काढत नाही.

संदर्भसूचीः
कवडी नरेश – मोरारजी देसाई १९७८ – कॉटिनेंटल प्रकाशन, विजयनगर, पुणे ३०.
कराका डी. एफ. – मोरारजी १९६५ – टाईम्स ऑफ इंडिया प्रेस.
देसाई मोरारजी – स्टोरी ऑफ माय लाईफ -१-२.
मेहोदळे विश्वास – पंडितजी ते अटलजी (पुणे).