कथारुप यशवंतराव-त्यागाचे तेजोवलय

त्यागाचे तेजोवलय

सन १९२९ सालची गोष्ट. कराड शहरात प्लेगची साथ आली. प्लेगच्या भीतीने माणसे रानावनात झोपड्या बांधून राहू लागली. शाळांना सुट्ट्या जाहीर झाल्या. पण शाळेत जायला व अभ्यास करायला यशवंताला मुळात वेळच कुठे होता ? त्यावेळी देशातील क्रांतीकारकांनी सशस्त्र लढ्याचा मार्ग अवलंबून इंग्रज सरकारला जेरीस आणले होते. जुलुमी सरकार व बंडखोर देशभक्त यांच्यातील विषम लढाईने देश ढवळून निघाला होता. सरकारविरुद्ध शूरपणाने लढणा-या देशभक्तांविषयीची माहिती जाणून घेण्याची अनावर इच्छा यशवंताला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यावेळी आजच्यासारखी दळणवळणाची प्रगत साधने उपलब्ध नव्हती. कराडात त्यावेळी केसरी, ज्ञानप्रकाश व नवाकाळ एवढीच वर्तमानपत्रे वाचायला मिळत असत. ती वाचण्यासाठी यशवंता दररोज दोन- तीन मैलांचे अंतर चालून गावात येत असे. वर्तमानपत्र विकत घ्यायला त्याच्याकडे पैसे नसायचे. मग गावात ज्यांच्या घरी वर्तमानपत्र येत असे तिथे जाऊन यशवंता ताटकळत उभा रहायचा. घरमालकाचे व इतर प्रौढ लोकांचे वाचन संपल्यावरच पेपर त्याचा हातात मिळायचा. यशवंता अधाशासारखा चळवळीच्या बातम्या वाचायचा.

त्यावेळी बंगालमधील क्रांतीकारक जतींद्रनाथ दास यांच्या आमरण उपोषणाची बातमी देशभर गाजत होती. लाहोर कटाशी संबंध नसतानाही सरकारने त्यांना तुरुंगात डांबले. तिथे राजकीय कैद्यांना निर्ढावलेल्या गुन्हेगाराप्रमामे वागविले जात आहे हे पाहून सात्विक संतापाने जतींद्रांनी तुरुंगातच अन्नसत्याग्रह सुरू केला. अगोदरच तोळामासा असलेली त्यांची तब्येत झपाट्याने खालावू लागली. उपोषणाला एक महिना उलटून गेला तरी सरकारला घाम फुटेना. एक एक दिवस वाढत होता आणि जतींद्रांचे काय होणार या धास्तीने यशवंता कासावीत होत होता. दररोज कमरेइतक्या पाण्यातून नदी ओलांडून चिखल तुडवत यशवंता कराडात यायचा. धडधडत्या अंत:करणाने वर्तमानपत्र हातात घ्यायचा आणि क्षणाक्षणाने मृत्युच्या जबड्यात शिरणा-या जतींद्रविषयीच्या बातम्या वाचून सुन्न व्हायचा. देशासाठी प्राण पणाला लावणारे जतींद्रनाथ आपले कोणीतरी जवळचे आप्त आहेत अशी यशवंताची भावना झाली आणि तो त्यांच्यासाठी मनोमन प्रार्थना करू लागला. पण दोन महिने उलटून गेले तरी तोडगा निघेना. शेवटी १३ सप्टेंबर १९२९ रोजी उपोषणाच्या बासष्टाव्या दिवशी जतींद्रांनी प्राणत्याग केला.

दुस-या दिवशीच्या वर्तमानपत्रात यशवंताने जतींद्रांच्या मृत्यूची बातमी वाचली आणि तो भांबावून गेला. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. आपल्या घरातलेच कोणीतरी मरण पावले आहे असे त्याला वाटले. काही वेळाने तो घरी जायला निघाला आणि चालता चालता रडायला लागला. काही केल्या रडू थांबेना तशाच अवस्थेत तो घरी गेला. भूक लागली होती, पण जेवण्याची इच्छा होईना. यशवंताच्या रडण्याचे कारण विठामातेला समजेना. यशवंताचा इतका व्याकुळ चेहरा त्या माऊलीने कधीही पाहिला नव्हता. तिनं काळजीनं विचारलं, ' येस्वंत्ता, लेकरा काय झालं ? कोण काय म्हणालं का तुला ?'
यशवंताने आीला जतींद्रांच्या बलिदानाविषयी सांगितले, पण विठामातेला अर्थातच त्यातलं काही कळालं नाही. कलकत्त्यात एक माणूस मरण पावला म्हणून कराडातल्या आपल्या मुलानं रडावं ही गोष्ट विठामातेच्या आकलनापलिकडची होती. यशवंताला लागीर झाली असावी किंवा आपल्या मुलावर कोणीतरी करणी केली असावी असे तिला वाटले. ती अंगारेधुपारे शोधू लागली. शेवटी यशवंताने तिला समजावले, ' मला काहीही झालेले नाही. तू काळजी करू नकोस.' तेव्हा कुठे तिचा जीव भांड्यात पडला.

जतींद्रनाथांच्या देहत्यागाचे तेजोवलय यशवंताचे अंत:करण भेदून गेले. देशासाठी आयुष्य वेचण्याचा निर्धार त्याने केला आणि पुढच्याच वर्षी यशवंता राष्ट्रीय चळवळीत सामील झाला  !