कथारुप यशवंतराव-मी यशवंतराव चव्हाण होणार !

मी यशवंतराव चव्हाण होणार  !

यशवंता कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये शिकत असताना घडलेला हा प्रसंग. एकदा शेणोलीकर सरांनी वर्गातल्या सर्व मुलांना सांगितले, ' तुम्हाला प्रत्येकाला पुढच्या आयुष्यात काय व्हायचे आहे, ते तुम्ही एका कागदाच्या चिठ्ठीवर लिहून द्या.'

वर्गातले विद्यार्थी थोर पुरुषांची नावे आठवू लागले. त्यापैकी काही नावे कागदावर लिहू लागले. यशवंताने मनाशी विचार केला की, कुठल्यातरी मोठ्या पुरूषाचे नाव लिहून देणे म्हणजे आपली स्वत:ची फसवणूक करून घेणे होय. मोठी माणसे आपल्या कर्तृत्वाने मोठी झालेली असतात. त्यांच्यासारखे आपण होऊ हा विचार चांगला असला तरी तसा निर्णय घेणे चुकीचे ठरेल. म्हणून यशवंताने आपल्या चिठ्ठीवर एकच वाक्य लिहिले, ' मी यशवंतराव चव्हाण होणार.'

थोड्या वेळाने शेणोलीकर सरांनी सर्व मुलांच्या चिठ्या पाहिल्या. यशवंताची चिठ्ठी पाहून ते म्हणाले, ' अरे , तू तर चांगलाच अहंकारी दिसतोस. तू सार्वजनिक कामात रस घेतोस हे चांगले आहे, पण त्यामुळे तू निदान देशातील मोठ्या माणसांचा आदर्श तरी आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजेस.' यशवंता स्वत:च्या निर्णयाशी ठाम होता. पण त्याला सरांशी वाद घालायचा नव्हता. तो म्हणाला, ' सर तुमचे म्हणणे खरे आहे पण मला वाटले ते मी लिहिले, झाले  ! ' हा विषय तिथेच संपला. नंतर शेणोलीकर सरांनी स्टाफमधील इतर सहका-यांना हा प्रसंग सांगितला. मुख्याध्यापक पाठक सरांना ही घटना कळल्यावर त्यांनी यशवंताला बोलावून घेतले. त्याचे कौतुक केले व म्हणाले, ' यात काय गैर आहे ? आपले व्यक्तिमत्व वाढविण्याचा प्रयत्न करण्याची तुझी इच्छा आहे आणि ते योग्यच आहे.'
मोठेपणी आपल्याला काय व्हायचे आहे हे इतके स्पष्टपणे पाहू शकणारा यशवंता म्हणूनच पुढे ' यशवंतराव चव्हाण ' म्हणून जगाला माहित झाला. मोठी माणसे मोठे होण्याचा निर्णय लहानपणीच घेत असतात... !