कथारुप यशवंतराव-माफी कशासाठी मागायची ?

माफी कशासाठी मागायची ?

१९३० सालच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत यशवंता सामील झाला. त्याने व त्याच्या सहका-यांनी टिळक हायस्कूलसमोरच्या कडुनिंबाच्या झाडावर तिरंगा फडकावला. ' वंदे मातरम ' च्या घोषणा दिल्या. या कृत्याबद्दल मॅजिस्ट्रेटने यशवंताला १८ महिन्यांची शिक्षा सुनावली. शिक्षा झालेल्या कैद्यांची रवानगी पुण्याला येरवडा तुरुंगात व्हायची होती. त्यावेळी टिळक हायस्कूलमधील एक शिक्षक यशवंताच्या घरी गेले आणि मुलाला भेटण्यासाठी विठामातेला घेऊन आले. फौजदाराने पोलीस पहा-यात दोघांची भेट घडविली. आईचे डोळे पाण्याने भरले. शिक्षक सांत्वन करू लागले आणि यशवंताला म्हणाले, ' हे पहा, फौजदार साहेब दयाळू आहेत. माफी मागितली तर सोडून देऊ म्हणतात.'

यशवंता काही बोल्यापूर्वीच विठाईमाता कडाडल्या, ' काय बोलता मास्तर ? माफी मागायची ? कशासाठी ? काही माफी बिफी मागायची नाही. यशवंता, तब्येतीची काळजी घे म्हणजे झालं.  परमेश्वर आपल्या पाठीशी आहे. ' असे म्हणून त्या परत फिरल्या. आईच्या कृश पाठमो-या आकृतीकडे पहात यशवंता मनात म्हणाला, ' आपल्याला वाटते तितकी आपली आई दुबळी नाही.'
असा स्वाभिमानाचा संस्कार करणारी विठाई जेथे असते, तिथेच ' यशवंतराव चव्हाण ' जन्म घेतात.