कथारुप यशवंतराव-' असे दबून कसे चालेल ?'

' असे दबून कसे चालेल ?'

१९२६ सालची गोष्ट. यशवंता तेव्हा तेरा - चौदा वर्षांचा होता. आई विठोई गरीबीचा संसार चालवून मुलांचे शिक्षण करीत होती. यशवंतापेक्षा चार-पाच वर्षांनी मोठे असलेल्या गणपतरावांना नेहमी असे वाटायचे की आपली आई सर्वांसाठी एकटीच इतके कष्ट उपसते. तिला आपण मदत केली पाहिजे. एकदा गावातल्याच त्यांच्या एका मित्राने एक नवीन प्रस्ताव गणपतरावांसमोर मांडला. ' इंदूर संस्थानात भरपूर शेतजमीन उपलब्ध असून शेती करण्याची तयारी असणा-यांना तिथे भरपूर जमीन दिली जाते ' असे तो म्हणाला. आपण इंदूरला जावे, भरपूर शेती मिळवून मेहनत करावी आणि पैसे कमवावेत असे गणपतरावांना वाटले. त्यांनी इंदूरला जायचे ठरविले. विठामातेला ही कल्पना पसंत नव्हतीच ; पण गणपतरावांनी आईचे म्हणणे ऐकले नाही. इंदूरला गेल्यावर सुमारे एक महिन्यानंतर गणपतरावांचे पत्र आले की, इंदूर सरकारने त्यांना गरोढ या गावी दीडशे एकर जमीन कसण्यासाठी दिली असून ते खुशाल आहेत. सर्वांनाच खूप आनंद झाला. ' आपण आता जमीनदार झालो ' असे यशवंताच्या बालमनाला वाटून गेले.

पुढे चार- सहा महिन्यांनी गणपतरावांबरोबर गेलेला त्यांचा स्नेही कराडला परत आला. ' गणपाला तिथं एकटाच सोडून तू परत कसा आलास ?' असे विठामातेने विचारले असता तो म्हणाला, ' मी शेतीसाठी लागणारं सामान न्यायला आलोय. काही दिवसांनी परत जाणार आहे, आणि गणपत तिथं खुशाल आहे.' पण पुढे महिना उलटून गेला तरी तो मित्र परत जायचे नाव घेत नव्हता. काही दिवसांनी तर त्याने लष्करातली नोकरी धरली आणि निघून गेला. इकडे विठामातेचा जीव वा-यावर उडत होता. त्या परमुलखात आपलं लेकरू एकटं काय करत असेल या चिंतेनं तिला अन्नपाणी गोड लागेना. भावाच्या काळजीनं यशवंताही कासावीस झाला. अशातच गणपतरावांचे पत्र आले की ' बाबुराव अजून परत का येत नाही ? मी इथे एकटाच पडलोय, आणि माझी प्रकृतीही बरी नाही. माझ्याजवळ साधनेही नाहीत.' भावाची ही अवस्था पाहून यशवंताचे मन कळवळले. त्याने साध्या पोस्टकार्डावर पत्र लिहून गणपतरावांना सांगितले की ' तुम्ही असाल तसे परत या. आम्हाला जमीन नको, पैसा नको, तुम्ही हवे आहात.' पण हाती आलेली पिके सोडून तरी कसे जाणार असा प्रश्न गणपतरावांनाही पडला होता. अर्थात पिके काढण्यासाठी त्यांच्याकडे पैसे व साधने नव्हती ही वस्तुस्थिती होतीच. मात्र दूरदेशी असलेला आपला भाऊ अडचणीत आहे आणि आपण त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही या भावनेने यशवंता विमनस्क बनला.

पुढे काही महिने उलटल्यानंतर एके दिवशी शरीराने खंगलेल्या आणि मनाने खचलेल्या अवस्थेत गणपतराव कराडला परत आले. आपल्या भावाला त्या अवस्थेत पाहून यशवंताने त्यांना मिठी मारली आणि रडायला सुरुवात केली. भावाने सोसलेल्या यातनांबद्दलचे दु:ख आणि इतक्या यातनांतून भाऊ पुन्हा परत घरी आल्याचा आनंद या दोन्हीचा संगम यशवंताच्या अश्रूंमध्ये झाला होता.
यशवंताला धीर देत गणपतराव म्हणाले, ' अरे, असं दबून कसं चालेल ? यातून मला नवीन काहीतरी शिकायला मिळालं हे काही कमी नाही...  !'