अगोदर विद्यापीठ, नंतर महाविद्यालये !
समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेला मराठवाडा आर्थिक, औद्योगिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मात्र मागासलेलाच राहिला होता. द्वैभाषिक मुंबई राज्यात हा मराठवाडा नुकताच सामील झाला होता. त्यापूर्वी शेकडो वर्षे हैदराबाद संस्थानच्या जुलुमी राजवटीत भरडला गेल्यामुळे हा प्रदेश सर्वांगाने खंगला होता. द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावर यशवंतरावांनी मराठवाड्याच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार सुरू केला.
मराठवाड्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षणाचा जास्तीत जास्त प्रसार होणे आवश्यक होते. एकदा शैक्षणिक प्रगती झाली की इतर क्षेत्रातही प्रगतीचे वारे वाहू लागेल असा यशवंतरावांचा विचार होता. यासाठी मराठवाड्यास स्वतंत्र विद्यापीठ देण्याचे यशवंतरावांनी ठरवले. परंतु विद्यापीठाच्या स्थापनेसाठी किमान साठ महाविद्यालये आवश्यक होती. इतकी महाविद्यालये त्यावेळी मराठवाड्यात नव्हती.
महाविद्यालयांची वाढ अगोदर झाली पाहिजे व नंतर विद्यापीठ स्थापन केले गेले पाहिजे असा विचार काही शिक्षणतज्ञांनी मांडला. याच पद्धतीने पुणे, नागपूर व इतर काही विद्यापीठे स्थापन झाली होती. पण मराठवाड्याच्या बाबतीत आपण याच मार्गाने गेलो तर त्या प्रदेशाच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होईल, अशी भीती यशवंतरावांना वाटत होती. त्यामुळे अपवाद म्हणून मराठवाड्यात अगोदर विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला व त्याप्रमाणे १९५८ साली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. पुढील दोन- तीन वर्षांत मराठवाड्यात साठपेक्षा अधिक महाविद्यालये निघाली.