समाजपरिवर्तनाची प्रयोगशाळा.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. या महत्कार्यासाठी कर्मवीरांनी घाम व रक्त आटवून या संस्थेच्या रोपट्याचे रूपांतर महान वटवृक्षात केले. आयुष्यभर अनवाणी राहून कर्मवीरांनी या कामासाठी उभा महाराष्ट्र पिंजून काढला , परंतु निसर्गनियमानुसार ते आत थकले होते. कधी कधी ते ' आपल्यानंतर संस्थेचे काय होईल ?' या विचाराने अस्वस्थ व्हायचे. एखाद्या समर्थ व्यक्तीच्या खांद्यावर संस्थेची जबाबदारी सोपवावी असे त्यांना वाटू लागले. या कामासाठी त्यांनी मनोमन यशवंतरावांची निवड केली. व त्यांना तसा निरोप धाडला. अण्णांचा शब्द प्रमाण मानून यशवंतरावांनी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारले व आपल्या हयातभर हे पद त्यांनी अतिशय तोलामोलाने सांभाळले. अध्यक्षपद स्वीकारताना केलेल्या भाषणात ते म्हणाले, ' मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो त्यावेळी मला जेवढा आनंद झाला, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आनंद मला कर्मवीर अण्णाच्या रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद मिळाल्यावर झाला आहे ! '
आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी संस्थेच्या कामात कधीही हस्तक्षेप केला नाही. मात्र दरवर्षी मे महिन्याच्या नऊ तारखेला अण्णांच्या पुण्यतिथीला आणि वार्षिक सर्वसाधारण सभेला ते न चुकता उपस्थित राहून संस्थेच्या कामाला दिशा देत असत. ' रयत शिक्षण संस्था ही समाजपरिर्वतनाची एक प्रयोगशाळा व्हावी ' हा युगप्रवर्तक विचारही त्यांनी आवर्जून मांडला होता.
एका वार्षिक सभेत ते म्हणाले, ' रयत शिक्षण संस्थेने शहरांमधून शाळा- महाविद्यालये काढली त्याचे मला फारसे कौतुक वाटत नाही. महाराष्ट्रातील वंचित भागात शिक्षणप्रसाराचे काम संस्थेने करावे असा विचार कर्मवीर अण्णांचा होता, तेव्हा आदिवासी भागात शिक्षणप्रसाराचे काम आपल्या संस्थेने केले तर ते मला अधिक कौतुकास्पद वाटेल .'
अत्यंत कमी शब्दात अतिशय सखोल आशय मांडण्याची यशवंतरावांची वत्त्कृत्वशैली अद्वितीय होती.