कथारुप यशवंतराव-विभाग पहिला-कृष्णाकाठ-आईच्या प्राणांची साक्ष

विभाग पहिला - कृष्णाकाठ

( १९१३ ते १९४६ )

आईच्या प्राणांची साक्ष

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात देवराष्ट्रे नावाचं एक छोटंसं गाव आहे.  हे यशवंतराव चव्हाण यांचं आजोळ. याच गावात १२ मार्च १९१३ रोजी यशवंतरावांचा जन्म झाला. इथेच त्यांचं बालपण गेलं. लहानपणापासूनच यशवंता जिज्ञासू आणि चौकस होता. तो आठ-दहा वर्षांचा असताना एकदा त्याने आजीला विचारले, ' आज्जी, आीचं नाव तू विठाई असं का ठेवलंस ?'
आजी म्हणाली, ' आक्काचं ( विठामातेचं ) नाव देवाचं आहे. विठाई आपला देव आहे.' आजीच्या बोलण्याचा अर्थ यशवंताला तितकासा समजला नाही. त्याने काही वेळ मनाशी विचार केला व मग पुन्हा विचारले, ' आणि मग माझं नाव यशवंत कोणी ठेवलं ?'

' मीच ठेवलं. तुझ्या जन्माच्या वेळी आक्काला फार त्रास झाला. ती बेशुद्ध झाली. आपलं गाव हे असं खेडेगाव. दवापाण्याची सोय नव्हती. घरगुती औषधपाणी केलं, पण गुण येईना. माझ्या जीवाला घोर लागला. शेवटी मी सागरोबाला साकडं घातलं. देवाला हात जोडलं, देवा सागरोबा, अक्काला जगविण्यात माझ्या हाताला यश दे. तुझी आठवण म्हणून मुलाचं नाव आम्ही यशवंत ठेवू. सागरोबानं माझं गा-हाणं ऐकलं. आक्काची सुखरूप सुटका झाली. माझ्या हाताला यश आलं म्हणून तुझं नाव यशवंत ठेवलं  !'

असे म्हणून आजीने यशवंताच्या गालावरून बोटे उतरली आणि कडकड मोडली. तिच्या डोळ्यात पाणी तरारले. आपल्या नावामागचा हा इतिहास ऐकून यशवंता शहारला. आईविषयीच्या कृतज्ञतेने त्याचे बालमन भरून आले. आईच्या प्राणांची साक्ष म्हणून आपले नाव यशवंत आहे हे कळाल्यापासून आई हाच यशवंताचा प्राण झाली  !