कथारुप यशवंतराव-भावना उचंबळून येतात !

भावना उचंबळून येतात !

१९८४ मधील एक प्रसंग. उन्हाळ्याचे दिवस होते. औरंगाबाद येथे शे. का. पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई उद्धवराव पाटील यांचा सत्कारसमारंभ आयोजित केलेला होता. यशवंतरावांच्या हस्तेच आपला सत्कार व्हावा अशी उद्धवरावांची इच्छा होती. या सोहळ्यासाठी यशवंतराव दिल्लीहून आले होते. समारंभ संपल्यावर यशवंतराव श्रीरामपूर येथे असलेले त्यांचे मित्र श्री. आण्णासाहेब शिंदे यांच्या घरी गेले. तिथे जेवण करून पुढे शिर्डीला जायचा त्यांचा विचार होता. आण्णासाहेबांनी यशवंतरावांना मुक्कामाचा आग्रह केल्यावर साहेब म्हणाले, ' वेणुताईंच्या निधनामुळे माझे फायनान्स कमिशनचे काम व इतर बरीच कामे लांबली आहेत. ती मार्गी लावण्यासाठी मला लगेच गेले पाहिजे.'

त्यावर आण्णासाहेब म्हणाले, ' आपण आयुष्यभर धावपळच केलीत साहेब, एक दिवस निवांत राहिल्याने काही इकडची दुनिया तिकडे होत नाही.' या प्रेमाच्या सक्तीने यशवंतराव विरघळले व त्यांनी आण्णासाहेबांकडे मुक्काम केला. त्या रात्री त्यांच्या अनेक विषयांवर गप्पा झाल्या. बोलता बोलता संरक्षणखात्याच्या कारभाराविषयी चर्चा सुरू झाली. बन्सीलाल हे तत्कालीन संरक्षणमंत्री होते. संरक्षणखात्यातील शस्त्रास्त्र खरेदीच्या व्यवहारात संजय गांधी यांच्या अवास्तव हस्तक्षेपाची चर्चा वृत्तपत्रांतून होत होती. यशवंतरावांनी आपल्या कारकिर्दीत एक अतिशय नाजुक कालखंडात हे खाते सांभाळले होते. कमकुवत सैन्यदलाला त्यांनी अल्पकाळातच सामर्थ्यवान बनविले होते. देशाचे रक्षण करणा-या जवानांच्या जिवाशी खेळणा-या या भ्रष्ट व्यवहारांविषयीच्या बातम्या ऐकून त्यांना तीव्र वेदना झाल्या.

ते म्हणाले, ' आण्णासाहेब, संरक्षणमंत्री असताना मी स्वत: लेह - लहाखमधील आपल्या सैनिकांची स्थिती काय असते हे पाहिलेले आहे. तिथे इतकी थंडी असते की शरीराचा एखादा अवयव जर गरम कपड्याशिवाय उघडा पडला तर त्या अवयवाच रक्तच गोठून जाते. अशा जीवघेण्या थंडीत आपले सैनिक आपल्या प्राणांची बाजी लावून देशाचे रक्षण करीत असतात. त्यांच्या हातात जर दुय्यम प्रतीचा दारुगोळा पडला तर शत्रूशी लढताना त्यांचे नाहक बळी जातील. मी अनेकवेळा त्यांची अवस्था सरहद्दीवर जाऊन पाहिली आहे.

त्या सैनिकांबद्दल माझ्या मनात नितांत कळकळ आहे. अशा बातम्या ऐकून मला त्यांची काळजी वाटते, भावना उचंबळून येतात...! '

एवढे बोलून यशवंतराव भावविवश झाले, त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यांना पुढे बोलता येईना. हजारो मैल दूर असलेल्या आपल्या सैनिकांविषयीचे यशवंतरावांचे प्रेम पाहून आण्णासाहेब व रावसाहेब हे दोघेही अक्षरश: वितळून गेले. त्यांचेही डोळे पाणावले. काही क्षण वातावरण धीरगंभीर झाले. थोड्या वेळाने यशवंतराव उठून वॉश बेसीनकडे गेले व तोंड धुवून परत आले.

गांधी - नेहरूंच्या पिढीतील यशवंतरावांसारख्या देशभक्तांचे देशप्रेम किती उच्च प्रतीचे होते हेच वरील प्रसंगावरून दिसून येते.