मिस्टर चव्हाण कसे आहेत ?
भारताचे भारताचे ज्येष्ठ नेते माजी कृषिमंत्री ना. शरद पवारसाहेब यांनी सांगितलेली ही एक आठवण. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना ते एकदा इंग्लंडच्या दौ-यावर गेले होते. या दौ-यात लंडनमधील कॉमनवेल्थ लायब्ररीला त्यांनी भेट दिली. तिथे एक व्यक्ती पुस्तक चाळत उभी होती. त्यांना आपण कुठेतरी पाहिलयं असं पवार साहेबांना वाटलं. चेहरा ओळखीचा वाटला म्हणून त्यांनी बरोबर असलेल्या भारतीय दूतावासातील अधिका-यांकडून ती व्यक्ती कोण आहे याची खात्री करून घेतली. ते इंग्लंडचे माजी पंतप्रधान होते . मग त्यांच्याजवळ जाऊन पवारसाहेबांनी आपली ओळख करून दिली. मुंबई व महाराष्ट्राचा उल्लेख करताच ते उत्सुकतेने म्हणाले, ' आर यू फ्रॉम बॉम्बे ? हाऊ इज मिस्टर चव्हाण ?'
सातासमुद्रापार असलेल्या इंग्लंड देशाच्या माजी पंतप्रधानाने यशवंतरावांची आठवण काढलेली पाहून पवारसाहेबांना आनंद व अभिमान वाटला. पण दुर्दैवाने यशवंतराव तेव्हा हयात नव्हते. पवारसाहेब म्हणाले, ' ते आता हयात नाहीत. पण आपली व त्यांची मैत्री कशी ?'
ते माजी पंतप्रधान म्हणाले, ' मी परराष्ट्रमंत्री असताना आम्हाला पंधरा - पंधरा दिवस युनोच्या अधिवेशनाकरिता न्यूयॉर्कमध्ये जाऊन रहावे लागायचे. इकडे तिकडे फिरायला मला आवडत नसे. भारतातर्फे अधिवेशनासाठी आलेल्या परराष्ट्रमंत्री चव्हाणांनाही ते आवडायचं नाही. मग आम्ही दोघं पुस्तकांच्या दुकानात जायचो. चांगली पुस्तके पहायचो. चव्हाणांच्या बरोबर जगातल्या चांगल्या पुस्तकांसंबंधी चर्चा करण्याची जी संधी मला मिळाली, तशी संधी मला माझ्या देशातसुद्धा मिळाली नाही. '
एका थोर ग्रंथप्रेमीने दुस-या एका श्रेष्ठ ग्रंथप्रेमी व्यक्तिमत्वाला दिलेली ती दाद पाहून पवारसाहेब भारावून गेले.