कथारुप यशवंतराव-अगोदर लोकमातेचं दर्शन घेऊया !

अगोदर लोकमातेचं दर्शन घेऊया !

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षणाची गंगा गरीबाच्या झोपडीपर्यंत नेली. सन १९१९ साली एका बोर्डिंगच्या रूपाने सुरू झालेल्या या संस्थेचे हळूहळू विशाल वटवृक्षात रूपांतर झाले.

शिक्षण प्रसारासाठी आपला पहाडासारखा देह झिजविणारे कर्मवीर आण्णा आता थकले होते. आपल्यानंतर या संस्थेची धुरा समर्थपणे कोण पेलेल याचा विचार करीत असताना त्यांच्या डोळ्यासमोर नाव आले- यशवंतराव चव्हाण. आण्णा त्यांना भेटले. संस्थेचे अध्यक्ष होण्याची विनंती केली. त्या महापुरुषाचा शब्द हीच आज्ञा मानून यशवंतरावांनी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना एकदा यशवंतराव सातारा जिल्ह्याच्या दौ-यावर आले होते. विश्रामगृहावर असताना त्यांना कोणीतरी सांगितले की, आण्णांच्या मातोश्री आजारी आहेत. साहेब अस्वस्थ झाले. बरोबरच्या लोकांना म्हणाले, ' चला, आपण आण्णांच्या घरी जाऊ आणि त्यांच्या मातोश्रींचे दर्शन घेऊ.' तेवढ्याच यशवंतरावांचा स्वीय सहाय्यक ( पीए ) म्हणाला, ' पण साहेब, आता आपले राजमाता सुमित्राराजेंना भेटायला जायचं नियोजन आहे.'

यावर साहेब म्हणाले, ' राजमातांकडे तर जायचंच आहे, पण तत्पूर्वी लोकमातेचं दर्शन घेतलं तर दुधात साखरच पडेल.'

मातेची महती काय असते हे यशवंतरावांना माहित होते. ते स्वत: एक श्रेष्ठ मातृभक्त होते म्हणूनच कर्मवीरांची आई त्यांना लोकमातेसमान वाटली.